विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी | पुढारी

विदेशी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी

गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 जूनला निर्देशांक 52,728 वर बंद झाला तर निफ्टी 15,699 वर स्थिरावला.

जगभर सध्या सर्व शेअर बाजारांत थोड्याफार प्रमाणात अस्थिरतेचेच वातावरण आहे. भारतही त्याला अपवाद नव्हता. जगातील सर्वच शेअर बाजारांत कमी- अधिक प्रमाणात भागविक्री करून थोडीफार नफावसुली केली गेली. गेल्या शुक्रवारी शेअर बाजार बंद होताना काही शेअर्सचे भाव खालीलप्रमाणे होते.

हेग 985 रु., जिंदाल स्टेनलेस (हिस्सार) 201 रु., मन्‍नापूरम 87 रु., बजाज फायनान्स 5587 रु., इंडियन ऑईल कॉर्पोरेशन 108 रु., जे. कुमारइन्फ्रा 290 रु., जिंदाल स्टील 317 रु., मुथुट फायनान्स 985 रु.

देशात औद्योगिक उत्पादन वाढीसाठी सतत ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर सतत पुरवठा लागतो. सुदैवाने भारतात पवन आणि सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात मिळू शकते. पण त्यासाठी पुढील काही वर्षांत भारताला 223 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गरज भासेल. गेल्या काही दिवसांत डॉलर महाग होत चालल्याने मोठ्या प्रमाणावर रुपयातील त्याचे मूल्य वाढेल.

रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षातील पहिली सार्वभौम सुवर्णरोखे योजना गेल्या आठवड्यात बाजारात आणली होती. त्यातील पहिला टप्पा 24 जूनला बंद झाला. दुसरा टप्पा 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या काळात बाजारात येईल. या योजनेत बाजारभावापेक्षा सोन्याचा भाव कमी ठेवल्यामुळे गुंतवणूकदारांना स्वस्त दरात सोने अप्रत्यक्षरीत्या खरेदी करण्याची संधी लाभली/लाभेल. पहिल्या मालिकेसाठी सोन्याचा भाव प्रती ग्रॅम 5041 रुपये निश्‍चित केला होता. सोन्याचा भाव प्रती ग्रॅम 5081 रुपये वायदेबाजारात होता. ऑनलाईन खरेदी करणार्‍यांना त्यात प्रती ग्रॅम 50 रुपयांची सवलत होती.

भांडवल बाजार नियंत्रक सेबी (डएइख) ने देशातील म्युच्युअल फंडांना विदेशी कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. जानेवारी 2022 मध्ये अशा खरेदीला मनाई होती; परंतु ती आता उठवली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना विदेशी समभागात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून गुंतवणूक यापुढे करता येईल. जानेवारी 2022 मध्ये या फंडांनी 7 अब्ज डॉलर्सची सीमा ओलांडली होती. सध्या जागतिक शेअर बाजारातील अनिश्‍चिततेमुळे अनेक विदेशी कंपन्यांचे समभाग कोसळले होते. या पार्श्‍वभूमीवर सेबीच्या नव्या धोरणामुळे म्युच्युअल फंडांना आणि त्याद्वारे गुंतवणूकदारांना हे पथ्यावरच पडणार आहे.

पावसाळा आता सुरू झाला असल्याने आणि तो मोठ्या प्रमाणावर चालू होणार असल्यामुळे कृषी उत्पादनात चांगली वाढ होईल. त्यामुळे महागाई आटोक्यात येईल. पेट्रोल व डिझेलचे भाव केंद्र सरकारने नजीकच्या भविष्यात कमी केले तर महागाई लवकर आटोक्यात येईल.

कोरोना काळात सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीवर विपरीत परिणाम झाला होता. तरीही देशातील बँका आणि अन्य वित्त संस्था यांच्या कामगिरीवर त्याचा परिणाम झाला नव्हता. राष्ट्रीयीकृत बँकांतील एक मोठी बँक – बँक ऑफ महाराष्ट्राने आगामी दोन वर्षांत 200 ते 300 शाखा नव्याने सुरू करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. गेल्या दोन वर्षांतही अशाच 200 शाखा सुरू केल्या होत्या. कार्यक्षमतेच्या बाबतीत देशातील पहिल्या तीन बँकांमध्ये स्थान मिळविण्याचे तिचे उद्दिष्ट आहे. गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडांच्या नव्या योजना (न्यू फंड ऑफर – एनएफओ) 1 जुलैपासून उपलब्ध होणार आहेत. 1 जुलैपासून एनएफओ आणण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड उत्सुक आहेत. त्यामुळे सेबीच्या आदेशानुसार या फंडांनी आपापल्या प्रणालीमध्ये योग्य बदल केले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खाद्य तेलांच्या किमती कमी झाल्या आहेत. भरीला केंद्र सरकारने आयात करांच्या स्वरूपात दिलेल्या दिलाशांमुळे खाद्यतेलांचे भाव थोडेफार कमी झाले आहेत. त्याचा ग्राहकांना फायदा व्हावा. दहा दिवसांत 15 किलोच्या डब्यामागे 250 रु. कमी झाले आहेत. हे भाव आणखीसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाईफ इन्श्युरन्सने सर्व पात्र पॉलिसीधारकांना आर्थिक वर्ष 2021-22 साठी 968 कोटी रु. वार्षिक बोनस जाहीर केला आहे. बोनस देण्याचे हे सलग 16 वे वर्ष आहे. जाहीर झालेला हा बोनस विक्रमी आहे. आर्थिक वर्ष 2020-21 पेक्षा हा बोनस 12 टक्क्यांनी जास्त आहे.

डॉ. वसंत पटवर्धन

Back to top button