खातेदाराच्या मृत्यूनंतर… | पुढारी

खातेदाराच्या मृत्यूनंतर...

खातेदाराच्या मृत्यूनंतर –  संदीप म्हैसकर

कोरोना काळात अनेकांनी स्वकीय गमावले आहेत. या स्वकीयांचे जनधन किंवा बचत खातेदेखील होते. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांंच्या खात्यातील रक्‍कम काढण्यासाठी अशिक्षित, गरीब शेतकरी आणि मजूर वारसदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. खातेदाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या खात्यातील पैसे कोण काढू शकतो, त्याच्यावर कोणाचा अधिकार आहे, त्याची प्रक्रिया काय आहे, हे ठाऊक असतेच असे नाही.

देशात जनधन योजना लागू झाल्यानंतर आतापर्यंत 45 लाखांपेक्षा अधिक लोकांनी बचत खाते सुरू केले आहे. बँक सेवा आता देशाच्या दुर्गम भागातही पोहोचल्या आहेत. यानुसार गरीब, मजूर, शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळत आहे. यातील बहुतांश खातेदार अशिक्षित आहेत आणि त्यांना बँकांच्या नियमांची माहिती असतेच असे नाही. म्हणून खातेधारकाचा मृत्यूू झाल्यास त्याच्या खात्यातील रक्‍कम कोण काढू शकतो किंवा कोणाचा अधिकार आहे, हे इथे सांगता येईल.

खात्यातून पैसे काढू नका

एखाद्या खातेदार व्यक्‍तीचा मृत्यू झाला असेल, तर त्याची माहिती तत्काळ बँकेला देणे गरजेचे आहे. बँकेला सूचना दिल्यानंतर काही औपचारिकता पूर्ण कराव्या लागतात. त्यामुळे त्यांच्या खात्यातून वारसदाराने किंवा नातेवाईकाने कोणत्याही प्रकारचे व्यवहार करू नयेत. मृत व्यक्‍तीचे नातेवाईक त्यांच्या एटीएमचा पासवर्ड जाणून असतील तर त्यातून पैसे काढू नयेत.

संयुक्‍त खाते असल्यास काढू शकता पैसे

दोन व्यक्‍तींचे संयुक्‍त खाते असेल तर अशा स्थितीत दोन्हीपैकी एकाचा मृत्यू झाल्यास संयुक्‍त खात्यातील दुसरा खातेधारक हा पैसे काढू शकेल. याशिवाय मृत झालेल्या संयुक्‍त खातेधारकाचे मृत्यू-प्रमाणपत्र बँकेकडे जमा करावे लागेल. ते खाते एकल करण्याबाबतही अर्ज करावा लागेल.

नॉमिनी असेल तर

बँक खाते सुरू करताना बँकांकडून नॉमिनीचे नाव देण्यास सांगितले जाते. यासाठी नॉमिनीचे नाव, पत्ता, खातेधारकसंबंधी माहिती भरावी लागते. खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्या खात्यातील रकमेवर संपूर्ण अधिकार हा नॉमिनीचा राहतो. शेवटी प्रत्येक व्यक्‍तीने योग्य व्यक्‍तीला वारसदार करणे गरजेचे आहे. नॉमिनी असल्याने खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याला पैसे काढताना कोणतीही अडचण येत नाही. आतापर्यंत नॉमिनी केले नसेल, तर त्याने बँकेशी संपर्क करून खात्याशी संबंधित नॉमिनीचे नाव जोडणे गरजेचे आहे. नॉमिनी अल्पवयीन आहे, तर बँकेच्या अर्जावर आई किंवा वडील यापैकी एकाचे नाव नॉमिनी म्हणून निश्‍चित करावे लागेल. जर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास आणि नॉमिनी अल्पवयीन असेल, तर त्याच्या खात्यातील रक्‍कम पालकाला दिली जाते.

नॉमिनी नसेल तर

एखाद्या व्यक्‍तीने आपल्या बँक खात्याला नॉमिनी दिला नसेल, तर त्याच्या खात्यातील रक्‍कम काढणे अतिशय कठीण काम आहे. त्याच्या नातेवाईकांना त्याची बरीच औपचारिकता करावी लागते. मृत खातेधारकाने मृत्युपत्र लिहिलेले असेल, तर त्याच्या खात्यातील रक्‍कम ही मृत्युपत्रात उल्लेख असलेल्या व्यक्‍तीला दिली जाईल. मृत्युपत्र नसेल, तर त्याच्या कायदेशीर वारसाला रक्‍कम दिली जाईल. परंतु त्यास वारसप्रमाणत्र सादर करावे लागेल. मृत व्यक्‍ती तरुण असेल, तर त्याचे कायदेशीर वारस पत्नी आणि मुले असतील. जर पत्नी आणि मूल नसतील तर त्याचे आई-वडील, भाऊ-बहीण हे कायदेशीर वारस असतील.

आरबीआयचे नियम काय सांगतात?

आरबीआयने अशा प्रकरणात कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर बँकेला माहिती देण्याबाबत कोणतीही कालमर्यादा निश्‍चित केलेली नाही. पीडित कुटुंब जेव्हा मानसिकद‍ृष्ट्या तयार होईल, तेव्हा बँकेच्या प्रक्रिया पूर्ण करता येईल. आरबीआयच्या मते, जर कुटुंबातील सदस्य पैसे काढण्यासाठी अर्ज देत असतील तर बँकांना पंधरा दिवसांत ती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.

Back to top button