पोलाद, गृहवित्त कंपन्यांवरच ‘लक्ष्य’ हवे | पुढारी

पोलाद, गृहवित्त कंपन्यांवरच ‘लक्ष्य’ हवे

डॉ. वसंत पटवर्धन

आपल्याकडे    मराठीत एक म्हण आहे, ‘जमिनीवर पडलले शेण माती घेऊन ऊठते.’  पंजाब नॅशनल बँकेतील  11,500 कोटी रुपयांच्या अफरातफरीचे गोमय शेअरबाजारावर पडले आणि निर्देशांक 33713 पर्यंत उतरला. निफ्टीही 10350 पर्यंत खाली आला. येस बँक, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, मु शूट फायनान्स, ओ एनजीसी, बजाज फायनान्स, ग्राफाईट इंडिया, देग, फिलिपकार्बन, जेके टायर्स, एल अँड टी फायनान्स, स्टर्लाईट टेक्नॉलॉजी, हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल, गुजरात नर्मदा फर्टिलायझर्स (GSFC) एपीएल अपोलो ट्यूब्ज, चेन्‍नई पेट्रो, बोडल केमिकल्स, कल्याणी स्टील्स, 

किर्लोस्कर फेरस, इंडुसिंड बँक, कर्नाटक बँक, आरती ड्रग्ज, तिरुमलाई केमिकल्स फोर्स मोटर्स, आरएसडब्ल्यू एम नावकर कार्पोरेशन, ऑईल इंडिया रेप्को होम्स, विसाका इंडस्ट्रीज, हे गुंतवणुकीस दीर्घ मुदतीसाठी योग्य असलेले शेअर्स गुंतवले व आणखी थोडे उतरले तर त्यात खरेदीची उत्तम संधी मिळेल. नव्याने गुंतवणुकीसाठी हिमाद्री स्पेशॅलिटी केमिकल्स, अहलुवालिया कॉन्ट्रॅक्टर्स, एशियन ग्रॅनिटो हे शेअर्स चांगले आहेत. 

गोदावरी पॉवर अँड इस्पातने काही कंपन्यांच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवल्याने तो शेअर 510 रुपयांच्या असपास गेल्या आठवड्यात होता. या कंपनीच्या व्यवस्थापनाबद्दल कधीकधी प्रवाद ऐकू येतात. पण कंपनीची कामगिरी हीही गुंतवणूकदारांनी बघायची असते. पुढील काही वर्षे तिची लोह गोळ्यांचा (Iron Pellets) व्यवसाय जोरात असणार आहे. एकूणच  पोलाद कंपन्यांची पुढील दोन वर्षे चलती असणार आहे. त्यामुळे शेअरचा भाव वर्षभरात निदान 35 टक्के वाढून 700 रुपये व्हावा. 

टाटा स्टीलने नुकतेच भागधारकांना 510 रुपये भावाने 25 शेअर्समागे 4 शेअर्स हक्‍कभाग दिले होते. तसेच भूषण स्टील या डबघाईला आलेल्या कंपनीचे आग्रहण करण्यासाठी तिने बाली लावली आहे. इंग्लंडमधल्या कोरस कंपन्यांवर मोठ्या आग्रहणाची ही दुसरी वेळ आहे. पण कोरसचा व्यवहार जर भूषण स्टील्स टाटानी घेतली तर तिच्या कर्जाचा दोरही कंपनीच्या गळ्याभोवती असणार आहे. भूषण स्टील व भूषण स्टील अँड पॉवर अशा दोन कंपन्यांसाठी टाटांना 55000 कोटी रुपये गुंतवावे लागतील. शिवाय खेळत्या भांडवलासाठी वेगळी सोय करावी लागेल. पण भूषण समूहाचे आग्रहण झाल्यानंतर कंपनीच्या पोलास उत्पादन क्षमतेची पातळी 2.5 कोटी टन (वर्षाला) इतकी होईल. पण सध्याचे 76000 कोटी रुपयांच्या वर्षाचा बोजा 1.3 लक्ष कोटी रुपये इतका होईल. भूषणच्या दोन कंपन्यांसाठी टाटा स्टीलने 24500 कोटी रुपये व 35000 कोटी रुपयांचा प्रस्ताव दिला आहे. (Offer) एक भाग काढून तिने 12500 कोटी रुपयांची सोय केली आहे. भूषणच्या बँकांनी दिलेली कर्जे फेडण्याची हमी देऊन ती Roll over केली जाईल असे  विश्‍लेषकांना वाटत आहे. 

या कंपन्यांच्या आग्रहणाशिवाय, ओडिशातील कलिंगनगर इथल्या कारखान्याची उत्पादन क्षमता 50 लक्ष टनाने वाढवण्याचा तिचा विचार आहे. हक्‍कभागाची सर्व रक्‍कम इथेच खर्च होणार आहे. या सर्व खटाटोपामुळे सध्याचे कंपनीचे भागभांडवलाशी असलेले प्रमाण एकास एक असे आहे ते दोनस एक होईल. (भांडवलाच्या दुप्पट कर्ज होईल.) कलिंगनगरला 23500 कोटी रुपये लागतील व हक्‍कभागांनी  त्यातील निम्मी रक्‍कमच मिळाली आहे. कोरसचे आग्रहणही त्यावेळचे कंपनीचे अध्यक्ष श्री. रतन टाटा यांच्या प्रतिष्ठेचा विषय होता. भूषणच्या आग्रहणामध्ये विद्यमान अध्यक्ष श्री. चंद्रशेखरन यांची प्रतिष्ठा इरेस पडली आहे. फरक एवढाच की कोरसचे आग्रहण परदेशात व खूप रक्‍कम देऊन होते. भूषण समूहाचे अग्रहण भारतात आहे व गुंतवणुकीची रक्‍कमही रास्त व आटोक्यात आहे. शिवाय यावेळेला जिंदाल स्टील वर्क्सही भूषण समूहासाठी आग्रही आहे. भूषण स्टीलच्या आग्रहणानंतर टाटा स्टीलचे उत्पादन 21 लक्ष टन व्हावे. सध्या त्यांचे उत्पादन 13 लक्ष टन वर्षाला आहे. 

टाटा स्टीलचे विस्ताराचे स्वप्न बघता दीर्घ मुदतीने गुंतवणुकीसाठी तो जास्त विचारात घ्यावा. सध्या (शुक्रवारी 22 फेब्रुवारीला) सध्या भाग 637 रुपये आहे. वर्षभरात तो निदान 800 रुपये व्हावा असे मत ग्लोबल रिझर्व कंपनी क्रेडिट सुसीस (Credit suisse) ने व्यक्‍त केले आहे. कंपनी 90 कोटी डॉलर्स (5850 कोटी रुपये)चे कर्ज विदेशातून घेण्याची शक्यता आहे. तिथे व्याजाचे दर खूपच कमी आहेत. नुकतेच तिने 250 कोटी डॉलर्सचे एक कर्ज कमी दराच्या कर्जात बदलून  दिले घेतले आहे. 

जेएसडब्ल्यू स्टीलही परदेशातून 150 कोटी डॉलर्स ( 9620 कोटी रुपये)चे कर्ज घेण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने नुकतेच विदेशातून कर्ज घेण्याबद्दलचे विषय शिथिल केले आहेत. टाटा समूहाचे नवे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर यांनी गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीला अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्याला आता एक वर्ष झाले आहे. टाटा समूहाच्या बाहेरची ही पहिलीच व्यक्‍ती अशी अध्यक्ष म्हणून आली आहे. टाटा स्टीलच्या शेअर्सचे भाव गेल्या वर्षात वाढल्याने कंपनीचे शेअर्सचे बाजारमूल्य 25,600 कोटी रुपयांनी वाढले आहे. या शेअर्समध्ये सध्याच्या आयात जरूर गुंतवणूक करावी. 

दिवाण हाऊसिंग फायनान्सचा शेअर कासवाच्या गतीने पण नक्‍की वाढत आहे. वर्षभरात तो 700 रुपयांवर नक्‍कीच जाऊ शकेल. सध्या तो 550 रुपयाला उपलब्ध आहे. 

ग्राफाईटच्या देशांतर्गत किमती कमी कराव्यात व निर्यातही कमी करावी असे सरकारने निर्देश दिल्याने ग्राफाईट इंडियाना शेअर गेल्या  गुरुवारी 606 रुपयांपर्यंत उतरला. तो 550 रुपयांपर्यंत आला तर दीर्घ मुदतीसाठी जरूर द्यावा. वर्षभरात त्यात 35 टक्के वाढ दिसेल. हेगही गेल्या गुरुवारी सुमारे 2521 रुपयांपर्यंत उतरला होता. तो 2400 रुपयाला आला तर जरूर घ्यावा. वर्षभरातही तोही 35 टक्के वाढ देऊन जावा. 

शेअरबाजाराने पंजाब नॅशनल बँकेचा धक्‍का पचवला न पचवला, तोच रोटोमॅक कंपनीचा 3695 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांना मार्च 2018 तिमाहीसाठी  प्रचंड तरतुदी कराव्या लागणार आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांनी हे क्षेत्र किमान दोन वर्षासाठी वर्ज्य करायला हवे. रुक्मिणी, सत्यभामा सोडून कुबेरकडे जाणार्‍या श्रीकृष्णाला ‘सोडुनी दे ती कुब्जा काळी! सोडुनी दे श्रीधरा!’ असे सांगायची वेळ आली तशी वेळ निदेशकांना, राष्ट्रीयीकृत बँकांबद्दल सांगायची आली आहे. सध्या पोलाद व गृहवित्त कंपन्यांवरच लक्ष केंद्रित हवे.
 

Back to top button