बाऊन्स बॅक  | पुढारी | पुढारी

बाऊन्स बॅक  | पुढारी

भूषण गोडबोले

मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 34142 अंकाला तसेच निफ्टी 10491 अंकाला बंद झाला. सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने 322 अंकांची तसेच निफ्टीने 108 अंकांची तेजी  दर्शवली. पुढील कालावधीसाठी निफ्टीची 10276 ही महत्त्वाची आधार पातळी आहे. साप्ताहिक आलेखानुसार निर्देशांक मंदी नंतरची तात्पुरती उसळी म्हणजे बाऊन्स  दर्शवत आहे .पंजाब नॅशनल बँकमधील घोटाळा जाहीर झाल्यानंतर पीएनबीच्या शेअर्सने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली आहे, यामुळे पूर्वीपेक्षा शेअर्सचा भाव स्वस्त झाला आहे. म्हणून गुंतवणूकदारांनी खरेदीची गडबड करू नये कारण घसरण वाढल्यास स्वस्त शेअर्स आणखी स्वस्त होतो. तसेच  मोठ्या पडझडीनंतर शेअरने तेजी दर्शविल्यास अशा प्रकारची तेजी केवळ  मर्यादित काळासाठीची तात्पुरती उसळी ठरू शकते. यशस्वी ट्रेडिंग करण्यासाठी तेजीचा व्यवहार करताना मंदीचा कल दर्शविणार्‍या शेअर्सपेक्षा तेजीचा कल दर्शविणार्‍या शेअर्समध्ये जोखीम स्वीकारणे योग्य ठरते.

तांत्रिक विश्लेषणानुसार माईंड ट्री ,पर्सिस्टंट सिस्टम,वेंकीज  इत्यादी कंपन्यांचे शेअर्स तेजीचा आलेख दर्शवत आहेत. आलेखानुसार माईंड ट्री या कंपनीच्या शेअर्सने मागील आठवड्यात 784 या महत्त्वाच्या अडथळा पातळीवर 811 रु. ला बंद भाव देऊन आगामी कालावधीसाठी  तेजीचे संकेत दिले आहेत . यामुळे 728 या पातळीचा बंद भाव तत्त्वावर स्टॉप लॉस ठेवून माईंड ट्री  या कंपनीच्या शेअर्समध्येे  तेजीचा व्यवहार करणे फायदेशीर ठरू शकेल.  मात्र सद्य:स्थितीमध्ये  निर्देशांक केवळ  मंदीनंतरची तात्पुरती उसळी म्हणजे बाऊन्स  दर्शवत असल्याने तसेच निर्देशांकाचे   किंमत उत्पादन गुणोत्तर महाग असल्याने व्यवहार करताना मर्यादितच धोका स्वीकारून  स्टॉप लॉस तंत्राचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.    

 – सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार

Back to top button