बचतीकडून गुंतवणुकीकडे जाण्यासाठीच्या टिप्स | पुढारी | पुढारी

बचतीकडून गुंतवणुकीकडे जाण्यासाठीच्या टिप्स | पुढारी

दीपाली चांडक

बचतीतून योग्य गुंतवणुकीकडे जाण्याचा प्रवास गुंतवणूकदाराने स्वतः ठरवावा. प्रत्येक व्यक्‍तीने आपले वय, उत्पन्‍न, जबाबदारी इ. लक्षात घेऊन, वेगवेगळ्या ध्येयासाठी/उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करावी. ध्येय ठरवताना प्रथम लक्षात घ्यावे ते म्हणजे पूर्ततेस लागणारा कालावधी. घर घेण्यासाठी, मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, मुलींच्या लग्‍नासाठी, सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनासाठी अशी अनेक विविध उद्दिष्टे असू शकतात आणि त्यानुसार उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक असा बचतीकडून योग्य गुंतवणुकीपर्यंतचा प्रवास बदलतो. 

अनेक विविध पर्यायांच्या जाहिरातींचा, आपल्यावर वर्षाव होत असताना आपल्या आवश्यकतेनुसार योग्य पर्याय निवडणे, त्यामध्ये दीर्घकालीन/अल्पकालीन गुंतवणूक करणे, आर्थिक क्षेत्राचा अभ्यास वाढवणे, कर्जाचे प्रमाण नगण्य ठेवणे, गुंतवणुकीवर लक्ष ठेवणे या गोष्टी कुठल्याही गुंतवणूकदाराला त्याची संपत्ती वाढवण्यास सहायक ठरतात. गुंतवणूक योजनेबाबत पूर्ण माहिती मिळेपर्यंत व योजनेबाबत स्वतःचे पूर्ण समाधान होईपर्यंत गुंतवणूक करू नये. उगाच जास्त परतावा मिळेल या आशेने कुठेही गुंतवणूक करू नये. नेहमी डोळसपणे केलेली गुंतवणूक योग्य परतावा मिळवून देण्यास आणि कौतुकास पात्र ठरते.

सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये प्रचलित अशा काही विविध गुंतवणुकीच्या पर्यायांची माहिती या लेखात मांडण्याचा एक प्रयत्न – 

बँकेतील रोख रक्‍कम (Cash) – अल्प व दीर्घ अशा दोन्ही कालावधीसाठी हा पर्याय उपलब्ध असतो. प्रामुख्याने तरलता ही या पर्यायाचा प्रमुख घटक आहे. 

बँकेतील ठेवी – (Bank Deposit) – बँकेतील ठेवींवर व्याज मिळते. गुंतवणूकदारांमध्ये अल्प व दीर्घ दोन्ही कालावधीसाठी हा पर्याय प्रचलित आहे. पण सध्याच्या काळात, बँकेतील जमा रक्‍कम व ठेवींवर मिळणारा परतावा हा इतर पर्यायांपेक्षा कमी आहे. 

कंपनी ठेवी (Company Deposit) – कंपनी मुदतठेवीतील गुंतवणूक ही त्या कंपनीला गुंतवणूकदाराने दिलेले कर्ज असते. सार्वजनिकरित्या ठेवी गोळा करण्याची परवानगी फारच थोड्या संस्थांना आहे. पतसंस्था, सहकारी बँका, वाणिज्य बँका, गृह वित्त संस्था (HFC), वैध नोंदणी प्रमाणपत्रधारक बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC- परवानगी असलेल्या NBFC ची यादी www.rbi.com वर उपलब्ध आहे) इ. याशिवाय निर्मिती, बांधकाम, पायाभूत विकास क्षेत्रात कार्यरत बिगर-बँक, बिगर-वित्त कंपन्यांची एक वर्गवारी आहे.

टपाल खाते योजना (Postal Schemes) – पीओएमआयएस /एनएससी/पीपीएफ/एसएसएस/पीओएस, इ.पोस्टाच्या विविध योजना आहेत. या सरकारी योजना असल्याने यांना सुरक्षितता असते. 

विमा (Insurance) – विमा हा मूळ दोन प्रकारांत मोडतो जसे आयुष्य विमा आणि सामान्य विमा. विमा कंपन्या गुंतवणूकदाराची उद्दिष्टे, जोखीम क्षमता व कालावधीप्रमाणे विविध योजना देत असतात. त्यांचा परतावाही वेगवेगळा असतो. अभ्यासपूर्वक विचार करून योग्य योजना निवडावी. विमाला गुंतवणुकीचे प्रमुख साधन न मानता, या पर्यायाकडे एक पारिवारिक/ वैयक्‍तिक गरज म्हणून बघणे जास्त योग्य आहे. रोखे बाजारात केलेली गुंतवणूक (Debt Invetsment) – हा पर्याय अल्प व जास्त दोन्ही कालावधीसाठी असते. रोखे बाजारात केलेल्या गुंतवणुकीमध्ये जोखीम तुलनात्मकरित्या कमी असते आणि त्याचबरोबर परतावाही कमी असतो.

भांडवल बाजार (Share Market) – या पर्यायामध्ये जोखीम जास्त असते. तसेच लाभ होण्याची शक्यताही जास्त असते. हा पर्याय दीर्घ मुदत गुंतवणूक प्रकारात मोडतो. कंपन्या व सरकार लोकांकडून या माध्यमातून निधी उभा करतात. शेअर बाजारातील गुंतवणूक – परतावा वाढीस एक उत्तम पर्याय आहे हे जरी खरे असेल तरीही त्याबद्दलच्या अभ्यासाशिवाय हे मुळीच शक्य नाही. या गुंतवणुकीच्या पर्यायासाठी, नुसता अभ्यास आणि विषयाची आवड असणे फक्‍त गरजेचे नसून त्यासाठी नियमित वेळ देणेसुद्धा अत्यंत आवश्यक आहे.

स्थावर मालमत्ता (Real Estate) – स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक इतर गुंतवणुकीपेक्षा जरा वेगळी असते. कारण इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करताना, गुंतवणूकदार शक्यतो कर्ज काढून गुंतवणूक करत नाही. जसे सोने, शेअर्स, इ. परंतु स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक करताना गुंतवणूकदार कर्ज काढून गुंतवणूक करतो. स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचे खालील दोन मुख्य प्रकार समोर येतात.

जमीन – स्थावर मालमत्तेतील गुंतवणुकीचा हा प्रकार अनेक विविध पर्याय समोर ठेवतो. जसे जमीन (प्लॉट), भारतातील शेती अथवा विदेशातील शेतीमध्ये गुंतवणूक. तसेच घर/दुकानगाळे या स्थावर मालमत्तेतील प्रकारात गुंतवणूक करताना घर, दुकान, फ्लॅट, सेकंड होम असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हे गुंतवणुकीचे पर्याय फक्‍त भारतातच नव्हे, तर भारताबाहेरही उपलब्ध आहेत.

सोने (Commodity) – केवळ सोने खरेदी म्हणजे सोन्यातील गुंतवणूक नव्हे. सोने खरेदी ही गुंतवणूक म्हणून करावयाची असेल तर हा पर्याय निवडताना गुंतवणुकीचे सर्व नियम पडताळायला हवे. सध्या बाजारभाव आणि भविष्यातील आर्थिक उलाढालींवर या गुंतवणुकीचे परतावे अवलंबून असतात. ही गुंतवणूक करताना गुंतवणूकदाराने विचारपूर्वक सोने खरेदीतील पर्यायाचा विचार करणे योग्य. जसे – सोन्याची चीप, वेढे, नाणी, गोल्ड बाँड्स, गोल्ड इ.टी.एफ, सोवेरिअन गोल्ड बाँड इ.

भविष्य निर्वाह निधी (Retirement Planning) -हे पर्याय भविष्य निर्वाहाच्या हेतूसाठी निवडले जातात. हे पर्याय दीर्घमुदतीसाठी असतात. प्रामुख्याने सेवानिवृत्तीनंतरची काळजी घेण्यासाठी या योजना आहेत. जसे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ईपीएफ, व्हीपीएफ  इ.

म्युच्युअल फंड (Mutual Funds) – मुच्युल फंडातील गुंतवणूक म्हणजे फक्‍त शेअर बाजारातील गुंतवणूक असा समज दिसून येतो; पण ते काही योग्य नाही. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक शेअरच्या बरोबरीने, कर्जरोखे, मुदत ठेवी, सोने इ.मध्येसुद्धा असते. 40 हून अधिक फंड घराणे, 100 हून अधिक विविध म्युच्युअल फंडच्या योजना गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध करून देतात.

कष्ट करीत, आयुष्यभर बचत करून आणि गुंतवणूक करताना एखाद्या व्यक्‍तीवर विश्‍वास ठेवून गुंतवणूक करणारे जास्त आढळतात. कुणाचा सल्ला, नजीकच्या व्यक्‍तीने केलेली गुंतवणूक, जाहिराती असे अनेक घटक आपणास गुंतवणुकीस प्रेरित करतात. पण आपणास योग्य असा गुंतवणुकीचा पर्याय निवडण्यासाठी गरज आहे ती थोड्याशा जागरूकतेची आणि या विषयाच्या अभ्यासाची.    

(लेखिका अर्थविषयक अभ्यासक तसेच मॅनेजमेंट कन्सल्टंट आहेत.)
 

Back to top button