पॅन सुलभीकरणातून महीला सबलीकरण | पुढारी | पुढारी

पॅन सुलभीकरणातून महीला सबलीकरण | पुढारी

– चंद्रशेखर चितळे

सरकारने आता ‘पॅन’कार्ड अनेक व्यवहारांसाठी सक्‍तीचे केले आहे. प्रत्येक व्यक्‍तीला देण्यात येणार्‍या पॅनकार्डमध्ये त्या व्यक्‍तीचे एकच नाव नोंदविले जाते. परंतु, विवाहीत महिलेला दोन नावे असतात. त्यामुळे महिलावर्गास अनेक प्रसंगी समस्यांना सामोरे जावे लागते.

लग्‍न झाल्यानंतर स्त्री आपले पॅनकार्डावरील नाव बदलून लग्‍नानंतरचे नाव लावून घेते आणि केवळ हेच नाव ‘पॅन’ कार्डावर छापून येते, पूर्वीचे नाही!  मात्र दोन्ही नावे पॅन कार्डावर छापल्यास महिलांची व्यवहार सुलभता वाढेल. म्हणजेच, महिलांची ‘पॅन’ कार्डासंबंधी समस्या सोडविण्यासाठी गरज आहे ती केवळ इच्छाशक्‍तीची! महिला सबलीकरणासाठी सरकार या दिशेने पाऊल उचलेल का?

‘विवाह’ हा व्यक्‍तीच्या जीवनामधील एक महत्त्वाचा संस्कार आहे. भारतीय संस्कृतीनुसार अस्तित्वामध्ये असलेली ‘विवाहसंस्था’ आजदेखील कालबाह्य ठरलेली नाही. कुटुंब व्यवस्थेमुळे सामाजिक, आरोग्य, स्त्री-पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य आणि भावी पिढीवरील संस्कारांची जपणूक होते. स्त्रीचा विवाह झाल्यानंतर वडिलांच्या नाव आणि आडनावाऐवजी ती आपल्या पतीचे नाव आणि आडनाव धारण करते. सासरी एखाद्या जवळच्या नात्यामधील व्यक्‍तीचे तेच नाव असले अगर अन्य कारणांनी विवाहानंतर स्त्रीचे पहिले नावदेखील बदलले जाते. हा देखील आपल्या संस्कृतीचाच एक भाग आहे. त्यामुळे, प्रत्येक विवाहीत स्त्रीला लग्‍नापूर्वीचे आणि लग्‍नानंतरचे अशी दोन नावे असतात. 

‘पॅन’ किंवा आयकर खात्यातर्फे देण्यात येणारा कायमचा खाते क्रमांक शिीारपशपीं रलर्लेीपीं र्पीालशी ही देखील आधुनिक काळामधील व्यक्‍तीची ओळख झाली आहे. अर्थव्यवस्थेमधील करचुकवेगिरी आणि अन्य गैरप्रकारांचा आळा बसावा म्हणून अनेक व्यवहार करताना ‘पॅन’ सादर करणे सक्‍तीचे आहे. प्रत्येक व्यक्‍तीला देण्यात येणार्‍या पॅनकार्डमध्ये त्या व्यक्‍तीचे एकच नाव नोंदविले जाते. परंतु, विवाहीत महिलेला दोन नावे असतात. त्यामुळे महिलावर्गास अनेक प्रसंगी समस्यांना सामोरे जावे लागते. लग्‍न झाल्यानंतर स्त्री आपले पॅनकार्डावरील नाव बदलून लग्‍नानंतरचे नाव लावून घेते आणि केवळ हेच नाव ‘पॅन’ कार्डावर छापून येते, पूर्वीचे नाही! लग्‍नापूर्वी स्त्रीने स्थावर मालमत्ता खरेदी केली किंवा मुदत ठेव, बँक, समभाग, इत्यादी खरेदी केल्यास तिचे लग्‍नापूर्वीचे नाव त्यावर मालक म्हणून नोंदविले जाते. लग्‍नानंतर यासंबंधी व्यवहार करावयाचा झाल्यास ‘पॅन’ कार्ड दाखवावे लागते आणि त्यामध्ये केवळ लग्‍नानंतरचेच नाव असते. 

आयुर्विमा, पेन्शन फंड, इत्यादी लग्‍नापूर्वी घेतले असता अशीच समस्या उद्भवते. आई-वडिलांनी पूर्वी ‘मृत्युपत्र’ करून ठेवले तर त्यामध्ये स्त्रीचे लग्‍नापूर्वीचेच नाव टाकलेले असते. लग्‍नापूर्वी स्त्री नोकरी करू लागल्यास नेमणूक पूर्वीच्या नावाने होते. जन्माचा दाखला शाळा-कॉलेजमधील उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक, प्रमाणपत्र हे सर्व लग्‍नापूर्वीच्याच नावाने असते आणि त्यामध्ये लग्‍नानंतरचे नाव टाकण्याची काही सोय नाही!

महिलांना देण्यात येणार्‍या ‘पॅन’ कार्डावर लग्‍नाआधीचे आणि लग्‍नानंतरचे अशी दोन्ही नावे लिहिल्यास या सर्व समस्या आपोआपच सुटतील. लग्‍नाआधी पॅन घेतले असल्यास लग्‍नानंतर यामध्ये केवळ नंतरचे नाव देखील छापावे. लग्‍नानंतर पॅन घेतल्यास लग्‍नाआधीचे व लग्‍नानंतरचे अशी दोन्ही नावे पॅनकार्डावर छापावीत. यामुळे महिलांची व्यवहार सुलभता वाढेल.

Back to top button