बॉटम फिशिंग करावे का? | पुढारी | पुढारी

बॉटम फिशिंग करावे का? | पुढारी

मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 36546 अंकाला तसेच  निफ्टी 10943 अंकाला बंद झाला. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धाच्या वाढत्या चिंतेमुळे जागतिक शेअर बाजारातील घसरणीपाठोपाठ सप्ताहअखेर शुक्रवारी सेन्सेक्सने 424 अंकांची तसेच निफ्टीने 125 अंकांची घसरण दर्शविली. वाहन आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात पडझड दर्शविली आहे.टाटा मोटर्स या कंपनीच्या शेअरने एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली. शुक्रवारी एक वेळ  टाटा मोटर्सच्या शेअरने 29 टक्के घसरण दर्शवून 129 रु. ची निच्चांकी पातळी गाठली होती. मात्र दिवस संपेपर्यंत सावरून  150 रु. ला बंद भाव दिला आहे.

सध्या परिस्थितीमध्ये बाजार फंडामेंटली पी ई व्हॅल्युएशननुसार 27 अंकाला म्हणजेच खूप महाग आहे. अशा वेळेस टाटा मोटर्स या कपंनीच्या शेअरने मोठ्या प्रमाणात घसरण दर्शविली असली तरीदेखील इथे गडबडीने खरेदी करू नये. तिमाही निकालाचा विचार करता टाटा मोटर्सने आजपर्यंतच्या कारकिर्दीतला सर्वात मोठा म्हणजेच 26960 करोडचा तोटा जाहीर केला आहे .जॅग्वार लँड रोअर च्या व्यवसायात सातत्याने  येणारे अपयश हे याचे प्रमुख कारण ठरत आहे . 

टाटा मोटर्स ने स्थानिक पातळीवर प्रगती करून देखील परदेशी पातळीवरील जॅग्वार लँड रोअरच्या व्यावसायिक अपयशामुळे कंपनी तोटा दर्शवत आहे. मागील 52 आठवड्यांचा विचार करता मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये टाटा मोटर्सच्या शेअर्सचा  भाव 385 रु. होता तर आता 150 रु.  झाला आहे. शेअरचा आलेख बघता शेअर मंदीचा कल दर्शवत आहे, यामुळे केवळ पूर्वीपेक्षा स्वस्त झाला आहे म्हणून खरेदी करू नये. कारण आणखी मंदी दर्शविल्यास  स्वस्त शेअर आणखी स्वस्त होऊ शकतो. अबन ऑफ शोर, पुंज लॉईड, एचडीआयएल, ऑर्बिट कॉर्प, भेल, एनटीपीसी, सुझलॉन अशा अनेक कंपन्यांच्या शेअर्सने दिलेला धडा गुंतवणूकदाराने लक्षात ठेवणे आवश्यक आहे .

एकेकाळी फंडामेंटली उत्तम म्हणून  विचार केल्या जाणार्‍या एचडीआयएलने 1000 रु.  वरून मागील 10 वर्षांत 20 रु. पर्यंत घसरण दर्शविली आहे. अगदी आर.कॉम. म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशनच्या बाबतीतही असेच पाहण्यास मिळत आहे. एकेकाळी 500 रु. भाव दर्शविणार्‍या शेअर ची किंमत 5 रु. झाली आहे, यामुळे गुंतवणूकदारांनी केवळ स्वस्त झाला आहे म्हणून खरेदी करू नये. कारण बॉटम फिशिंग म्हणजे खूप स्वस्त झाला आहे म्हणून खरेदीच्या गडबडीत नुकसान होऊ शकते. दीर्घावधीसाठी गुंतवणूक करतानादेखील  बाजाराचे व्हॅल्युएशन पाहून गुंतवणुकीचे प्लँनिंग करणे आवश्यक असते. बाजार महाग असताना गुंतवणुकीचे प्रमाण मर्यादितच ठेवणे योग्य ठरते. दीर्घावधीसाठी टप्प्या टप्प्याने  गुंतवणूक करताना कंपनीच्या कामगिरीकडे लक्ष ठेवणे तेवढेच आवश्यक असते. तसेच एखाद्या कंपनीमध्ये  गुंतवणुकीचा अंदाज चुकल्यास वेळच थांबणे तसेच वेळप्रसंगी बाहेर पडणेदेखील गरजेचे असते. सद्य:स्थितीमध्ये टाटा मोटर्स, वेदांता, इंडिया बुल हौसिंग फायनान्स इत्यादी कंपन्यांचे शेअर्स मंदीचा कल दर्शवत आहेत. बाजाराचे व्हॅल्युएशनदेखील महाग आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी मंदी दर्शविणार्‍या शेअर्समध्ये बॉटम फिशिंगचा मोह टाळावा कारण फिश माईट बी. डेड.जोपर्यंत तेजीची चाहूल लागत नाही तोपर्यंत श्रद्धा आणि सबुरी ठेवणेच योग्य ठरेल. (सेबी रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार)

Back to top button