मोबाईल वॉलेट वापरता? मग बातमी आपल्यासाठी! | पुढारी

मोबाईल वॉलेट वापरता? मग बातमी आपल्यासाठी!

सतीश जाधव

हॅकर मंडळींनी मोबाईल वॉलेट वापरणार्‍यांची फसवणूक करण्यासाठी नवा मार्ग काढला आहे. ग्राहकांना केवायसीची मुदत संपल्याचा संदेश पाठविला जातो किंवा कॉल केला जातो. केवायसी पूर्ण करण्यासाठी या नंबरला कॉल करा, अशी सूचना दिली जाते. त्यानंतर एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. अ‍ॅप डाऊनलोड होताच मोबाईल वॉलेटवर संपूर्णपणे हॅकरचे नियंत्रण राहते. त्यानंतर वॉलेटमधून पैसे काढले जातात. राजस्थानातील एका उच्चपदस्थ महिला सरकारी अधिकार्‍याची याच मार्गाने फसवणूक झाली आहे. 

कंपन्यांकडून माहिती घेतली जात नाही : मोबाईल वॉलेट कंपन्या कधीही फोन किंवा मेसेज पाठवून केवायसीबाबत माहिती मागवत नाहीत. कंपनीच्या नावावर हॅकर ग्राहकांची फसवणूक करत असतात. केवळ केवायसी नाही, तर वॉलेटला ब्लॉक करण्याचे धमकीचे कॉलही केले जातात. ग्राहक सेवा अधिकारी असल्याचे भासवत हॅकर गोपनीय माहिती गोळा करत असतात. कोणतीही वॉलेट कंपनी कॉल करून ग्राहकाची वैयक्तिक माहिती विचारत नाहीत. 

अ‍ॅपमधून मोबाईल हॅक : ऑनलाईन हॅकर हा मोबाईल हॅक करून ग्राहकांची माहिती चोरत असतो. केवायसी अपडेट करण्यासाठी यूजरला एनी डेक्स किंवा टीम व्यूवर क्विक सपोर्ट अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतर हॅकरला मोबाईल कोडची गरज भासते. त्याचा कोड दिल्यानंतर मोबाईल वापरण्याची संपूर्ण मूभा हॅकरला मिळते. त्यानंतर ते फसवणूक करत खात्यातील लाखो रुपये काढून घेतात.

गुगलवरून नंबर घेऊ नका : गुगलवरून नंबर घेऊन कधीही कस्टमर केअरला कॉल करू नये. ऑनलाईन हॅकर हे मोठ्या मोबाईल वॉलेट कंपनीच्या नावाने बनावट खाते तयार करतात. त्यानंतर कस्टमर केअर असल्याचे सांगत तो बनावट नंबर गुगलवर शेअर करतात. जेव्हा आपण बँकेशी किंवा वॉलेटशी निगडित कस्टमर केअरला कॉल करतो, तेव्हा आपणही त्यांच्या फसव्या जाळ्यात अडकतो. कॉल करताच ते आपले खाते हॅक करतात. 

डझनाहून अधिक कंपन्या : देशभरात डझनाहून अधिक मोबाईल वॉलेट कंपन्या आपली सेवा प्रदान करतात. देशभरात सुमारे 50 कोटींपेक्षा अधिक नागरिक मोबाईल वॉलेटचा वापर करतात. देशात प्रामुख्याने मोबाईल वॉलेटमध्ये पेटीएम, भीम अ‍ॅप, गुगल पे, फोन पे, मोबिक्विक, एचडीएफसी पेजैस, फ्रीचार्ज, योनो एसबीआय, अ‍ॅमझॉन पे, सिटी मास्टर पास, आयसीआयसीआय पॉकेट्स, जिओ मनी, ओला मनी, व्होडाफोन एम पैसा, एम स्वाइप आदी. 

कंपनी भरपाई देणार : मोबाईल वॉलेटच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास त्याची भरपाई वॉलेटने करून देण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. आरबीआयच्या मते, जर मोबाईल वॉलेटचा वापर करताना ग्राहकाची चुकी नसेल तर त्याची भरपाई कंपनीला करावी लागेल. यासाठी ग्राहकाला तीन दिवसात वॉलेट कंपनीला फसवणुकीची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर कंपनी नुकसान भरपाई देण्यास बांधिल राहील. कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे फसवणूक झाली असेल, तर कंपनी कोणतीही पूर्वसूचना न देता भरपाई देणे अपेक्षित आहे. त्याचा रिफंड तत्काळ जमा करणे अनिवार्य आहे. वॉलेट कंपनीला ग्राहकांना दहा दिवसांच्या आत भरपाई द्यावी लागेल. 

कंपन्यांकडून सावधगिरी : मोबाईल वॉलेटचे केवायसी करण्यासाठी बनावट फोनसंदर्भात मोबाईल कंपन्या आणि आरबीआयकडून ग्राहकांना वारंवार सूचना दिली जाते. जर आपल्याला वॉलेट कंपनीचा प्रतिनिधी म्हणून एखादा कॉल येत असेल तर सावधगिरी बाळगा, असे सांगितले जाते. तो कदाचित ऑनलाईन हॅकरदेखील असू शकतो. तो आपले केवायसी अर्धवट असल्याचे सांगू शकतो. केवायसीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा अन्यथा खाते बंद होऊ शकते किंवा पैसे काढले जावू शकतात, अशी खोटी माहितीदेखील देऊ शकतो. जर आपण केवायसीची प्रक्रिया अगोदरच पूर्ण केलेली असेल, तर तो कॉल कट करा. जर कॉल कट केला नाही तरी माहिती शेअर करू नका. जर त्याने विचारलेल्या प्रश्नांना आपण सरळ उत्तरे दिली, तर त्याच्या जाळ्यात अडकू शकता. केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपण थेट कंपनीच्या ग्राहक सेवा अधिकार्‍याशी बोलू शकता किंवा जवळच्या कार्यालयात जाऊन ती प्रक्रिया पूर्ण करू शकता. अलीकडच्या काळात केवायसीसंदर्भात बनावट कॉलची संख्या प्रचंड वाढली असून तितक्याच प्रमाणात फसवणूकही झाली आहे. 

लक्षात ठेवा

पासवर्ड बदलत राहा : आपल्या मोबाईल वॉलेटचा पासवर्ड स्ट्राँग ठेवा. वेळोवेळी बदलत राहा. 

ओटीपी सांगू नका : मोबाईल वॉलेटवरून व्यवहार करताना नोंदणीकृत मोबाईलवर येणारा ओटीपी क्रमांक कोणालाही देऊ नका.

लॉग आऊट करा : मोबाईल वॉलेटवरील व्यवहार पूर्ण झाल्यानंतर लॉग आऊट करायला विसरू नका. अन्यथा आपल्या फोनचा दुरुपयोग करून खरेदी केली जाऊ शकते. 

अ‍ॅप लॉक लावा : मोबाईल वॉलेट सुरक्षित ठेवण्यासाठी अ‍ॅप लॉकचा वापर करा.

रिफ्रेश करू नका : अनेकदा पेमेंट प्रक्रिया सुरू असताना वेळ लागतो. त्यामुळे काही यूजर अकारण रिफ्रेश करतात. अशा वेळी मोबाईल वॉलेटमध्ये पैसे कट होतात, परंतु ते जमा होत नाहीत. अशा कृतीपासून दूर राहवे. 

बनावट कॉल कट करा : केवायसी किंवा अन्य आर्थिक व्यवहाराशी निगडित कॉल येत असेल, तर तो लगेचच कट करा किंवा कोणतीही माहिती शेअर करू नका.

Back to top button