RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले! भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले! भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय (RBI)ने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने देशात परत आणले आहे. भारतासाठी ही मोठी उपलब्धी आहे. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. खरेतर, 1991 नंतर प्रथमच, आरबीआयने ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने आपल्या देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित केले आहे. या मौल्यवान धातूचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक स्टॉकमध्ये समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ताज्या आकडेवारीनुसार मार्चअखेर आरबीआयकडे 822.1 टन सोने होते. यातील 413.8 टन सोने रिझर्व्ह बँकेने परदेशात ठेवले आहे. गेल्या आर्थिक वर्षात आरबीआयने आपल्या साठ्यात 27.5 टन सोन्याची भर घातली होती.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

1991 मध्ये भारताला परकीय चलनाच्या संकटाचा सामना करावा लागला, ज्यामुळे सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून मदत मिळवण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले. त्यावेळी आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी हा निर्णय आवश्यक असल्याचे मानले गेले. आता, तीन दशकांनंतर परदेशात ठेवले ते सोने देशातील राखीव ठेवींमध्ये हस्तांतरित करण्यात आले आहे. हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे प्रतिबिंब असल्याचे अनेक अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, 'आता भारत आपले बहुतेक सोने स्वतःच्या राखीव ठेवीत ठेवेल. आरबीआयने ब्रिटनमधून सोन्याच्या राखीव भांडारातून 100 टन सोने परत मागवले. बहुतेक देश त्यांचे सोने बँक ऑफ इंग्लंड किंवा काही तत्सम ठिकाणी तिजोरीत ठेवतात, ज्यासाठी ते शुल्क देखील भरावे लागते. 1991 साली आर्थिक संकटाच्या वेळी आम्हाला आमचे सोने बाहेर पाठवावे लागले होते, पण आम्ही 1991 पासून खूप पुढे आलो आहोत.'

अजून सोने येणे बाकी

या अहवालानुसार येत्या काही महिन्यांत देशात 100 टन सोने परत येऊ शकते. मार्च 2024 अखेरपर्यंत, आरबीआयकडे 822.1 टन सोने होते, त्यापैकी 413.8 टन परदेशात ठेवले आहे. त्यापैकी 100.3 टन सोने भारतात, तर 413.8 टन सध्या परदेशात आहे. याशिवाय भारतात नोटा जारी करण्यासाठी 308 टन सोने ठेवण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आरबीआयने सोन्याच्या साठवणुकीत 27.5 टन सोन्याची भर घातली आहे.

भारताचे सोने ब्रिटनमध्ये कसे पोहोचले?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ब्रिटनमधून 100 टनांहून अधिक सोने भारतात परत केले आहे. ब्रिटनमध्ये जमा केलेले सोने भारतात आणून आरबीआयला मोठे यश मिळाले आहे. 1991 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने भारतात परत येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आता परदेशात सोने का पोहोचले हा प्रश्न आहे. यामागेही एक मोठी कथा आहे. 1991 च्या काळात देशात चंद्रशेखर यांचे सरकार होते. देशाची तिजोरी रिकामी होती, आर्थिक परिस्थिती डळमळीत होती. देयकांची शिल्लक घसरली होती. भारताचा परकीय चलनाचा साठा 2500 कोटी रुपयांवर पोहोचला होता. ही रक्कम केवळ 15 दिवसांसाठी आयात सक्षम करण्यासाठी पुरेशी होती. भारतासारख्या मोठ्या देशाच्या डबघाईला आलेल्या अर्थव्यवस्थेला संकटातून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. अर्थव्यवस्थेची स्थिती अशी होती की, ती कधीही दिवाळखोरीत निघू शकते. तेलाच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारताच्या समस्यांवर उपाय म्हणून सोने मदतीस आले. त्यातूनच 1991 मध्ये भारताला ब्रिटनमधून पैसे घेण्यासाठी सोने गहाण ठेवावे लागले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news