कर्ज पुनर्रचनेचा लाभ घ्यायचा तर… | पुढारी

कर्ज पुनर्रचनेचा लाभ घ्यायचा तर...

अभिजित कुलकर्णी

भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या काळात त्रस्त असलेल्या कर्जदारांना आणि लहान व्यापार्‍यांना पुन्हा एकदा कर्जाची पुनर्रचना करण्याची सुविधा दिली आहे. जर आपण कोव्हिडच्या दुसर्‍या लाटेमुळे आर्थिक संकटांचा सामना करत असाल तर आणि गृह, मोटार किंवा वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर त्या कर्जाची पुनर्रचना करता येणार आहे. या आधारे हप्त्याचा बोजा कमी करू शकतो. आरबीआयच्या गाइडलाइन्सनुसार 25 कोटी रुपयांपर्यतच्या कर्जाची पुनर्रचना करणे शक्य आहे. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यातील कर्ज पुनर्रचना योजनेचा लाभ घेणार्‍या कर्जदारांना यंदाच्या योजनेचा लाभ घेता येणार नाही. 

अर्ज कसा करावा?

आपल्याला बँकेला संपर्क करून त्यांना अर्ज द्यावा लागेल. त्यानंतर बँक आपल्या अर्जाची आणि आर्थिक व्यवहाराची पडताळणी करेल. आपल्या कर्जफेडीबाबत आणि आर्थिक व्यवहाराबाबत बँक समाधानी असेल तर आपल्याला आणखी काही कागदपत्रे मागितली जाईल. आपण जमा केलेली कागदपत्रे आणि अर्जाची खातरजमा केल्यानंतर बँक कर्जाच्या पुनर्रचनेला मंजुरी देईल. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत कर्जाची पुनर्रचना करण्याची संधी कर्जदाराकडे आहे.  

कोण घेऊ शकतो लाभ?

कर्जाच्या पुनर्रचनेचा लाभ घेणार्‍यांना बँक दोन वर्षार्ंपर्यंत दिलासा देऊ शकतात. सोप्या भाषेत या योजनेनुसार कर्जाचा कालावधी हा अधिकाधिक दोन वर्षांपर्यंत वाढवू शकतो. जर कर्जाचा कालावधी 2025 पर्यंत असेल तर 2027 पर्यंत ठेवता येईल. प्रत्येकाला संपूर्ण दोन वर्षांची मुदतवाढ मिळेलच, असे नाही. याशिवाय कर्जाच्या कोणत्याही अटीत किंवा नियमात बदल होणार नाही. 

अर्ज कधीपर्यत देता येईल?

कर्ज पुनर्रचनेची नवीन व्यवस्था स्वीकारण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतो. बँकेच्या संपूर्ण अटी कर्जदारांकडून पूर्ण होत असतील, तर बँक ही नवीन योजना तीन महिन्यांच्या आत लागू करेल. 

व्याजात सवलत

व्याजदरात कोणतीही सवलत मिळणार नाही. केवळ आपण कालावधी वाढवून घेऊ शकतो. यानुसार हप्त्याचे ओझे काही प्रमाणात कमी राहू शकते आणि दीर्घकाळ कर्ज फेडता येऊ शकेल.

खर्चाचे आकलन

आर्थिक तज्ज्ञानुसार कर्जाची पुनर्रचना करताना बँकेकडून प्रक्रिया शुल्क आकारले जाणार आहे. अनेक बँका व्याजदरात किरकोळ वाढ करू शकतात. अशा वेळी आपण आपली बचत किंवा अन्य स्रोतांतून हप्ता भरू शकत असाल तर यापासून दूर राहण्यास हरकत नाही. कर्जाची पुनर्रचना करण्याचा विपरित परिणाम हा क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. जर आपण नोकरदार असाल आणि निवृत्तीच्या जवळ असाल तर कर्ज पुनर्रचना करण्याचा निर्णय आणि कालावधी वाढवण्याचा निर्णय हा जोखमीचा राहू शकतो. 

कर्ज पुनर्रचनेचा अर्थ

एखादा व्यक्ती किंवा कंपनी कर्ज घेत असेल तर ठरलेल्या कालावधीत त्याची परतफेड करणे गरजेचे आहे. परंतु एखाद्या विषम स्थितीत किंवा नैसर्गिक संकट येत असेल, तर अशा वेळी आरबीआयकडून कर्ज पुनर्रचनेची सुविधा दिली जाते. जर आपण पाच वर्षांसाठी कर्ज घेतले असेल तर पुनर्रचना रचनेनुसार 60 ऐवजी 65 किंवा 70 महिन्यांपर्यंत  फेडण्याची सुविधा मिळू शकते. गेल्या वर्षीही आरबीआयने कर्ज पुनर्रचना सुविधा दिली होती. 

 

Back to top button