यकृत का बिघडतं? ही आहेत कारणे | पुढारी

यकृत का बिघडतं? ही आहेत कारणे

आपली जीवनशैली इतकी व्यग्र झाली आहे की, आरोग्याकडे दुर्लक्षच होते. कामाच्या व्यस्ततेमुळे लोक काही विचार न करता मिळेल ते आणि वाटेल ते खातात. त्यामुळे साहजिकच आरोग्यावर परिणाम होतो. इतर कोणत्या सवयी आहेत, ज्याचा वाईट परिणाम आपल्या यकृतावर होतो. त्यामुळे यकृत चे आरोग्य चांगले राखण्यासाठी काय उपाय करावे ते पाहू.

धूम्रपान : सिगरेटमधील तंबाखूमध्ये घातक रसायने असतात. सिगरेट प्यायल्यानंतर हे विषारी पदार्थ शरीरात शोषले जातात आणि यकृतापर्यंत पोहोचतात, त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होतो. ऑक्सिडेटिव्ह ताण फायब्रोसिसचे नुकसान होते. फायब्रोसिस अशी प्रक्रिया होती, ज्यामध्ये यकृत जास्त पेशी निर्माण करतात, जे स्वतःच बरे होण्यास मदत करतात. विषारी रसायनांमुळे यकृताची कार्यक्षमता कमी होते, त्यामुळे यकृताच्या मूळ कार्यावर त्याचा प्रभाव पडतो. शरीरातून अशुद्ध रसायने बाहेर पडू शकत नाहीत आणि ही रसायने जास्त काळ शरीरात राहिल्याने शरीराचे नुकसान होते.

अल्कोहोलचे सेवन : अल्कोहोल किंवा मद्यपान यामुळे ही विषारी रसायने शरीरातून बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे यकृताचे मूळ काम बाजूला ठेवून विषारी रसायनांचा प्रभाव कमी करण्यावर भर देते. त्यामुळे यकृताची जाडी वाढते. मद्यपानामुळे होणारे नुकसान भरून काढण्याचे काम जेव्हा यकृत करते तेव्हा, यामध्ये तयार होणार्‍या रसायनांमुळे पेशी कमजोर होतात. जास्त मद्यपान केल्यास यकृत हळूहळू आपले काम करणे थांबवते. त्यामुळे डीएनएवर प्रभाव पडतो आणि कर्करोगाला आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे मद्यपान किंवा अल्कोहोलचे सेवन न करणेच उत्तम.

मनाप्रमाणे औषधे घेणे : आपल्यापैकी बहुतेकांना कोणत्याही छोट्या शारीरिक दुखण्यासाठी स्वमर्जीने औषधे घेण्याची सवय असते. या गोळ्यांचा प्रभाव नक्कीच पडतो, पण शरीर आणि यकृताचे नुकसान होते. बहुतेकदा वेदनाशामक औषधांचा दुष्परिणाम म्हणजे या गोळ्या घेतल्यानंतर काही काळ पोटात दुखत राहते. किंवा पित्तप्रकोप होतो. या गोळ्या खाताना डॉक्टरांचाही सल्ला घेतलेला नसतो. कारण वेळ आणि पैसा यांची बचत. सतत एखादे औषध घेत राहिल्यास यकृत कमजोर होते. ए जीवनसत्त्वाच्या गोळ्या अधिक प्रमाणात घेतल्यास यकृत खराब होण्याची भीती असते.

अपुरी झोप : व्यस्ततेमुळे जसा व्यायाम मागे पडतो तशीच झोपेबाबतही दुर्लक्ष होताना दिसते. अपुरी झोप ही सर्वात मोठी समस्या आहे. कामाच्या व्यग्रतेमुळे लोक पूर्ण झोप घेऊ शकत नाहीत. रात्रीच्या पार्ट्या आणि फिरण्यासाठी झोपही नीट घेत नाहीत. असे करणार्‍या सर्वच लोकांना यकृताशी निगडित समस्या जाणवतात. प्रत्येक व्यक्तीला 6-7 तास झोपेची आवश्यकता असते. आपण झोपतो तेव्हा शरीर इतर अवयवांची दुुरुस्ती करत असते. त्यामुळे झोपण्याची जागा आणि वेळ निश्चित करा. वेळेवर झोपणे आणि उठणे हा आरोग्याचा मूलमंत्र आहे.

जंकफूडची क्रेझ : जंक फूड आवडत नाही अशी एकही व्यक्ती सापडणार नाही. पण जंक फूड यकृतासाठी खूप धोकादायक असते. त्यामुळेच ताजे, योग्य आणि आरोग्यकारी पौष्टिक आहार घ्यावा. बाहेरच्या पदार्थांमधले तेल, मसाले यांच्यामध्ये असणारे अणू असतात; त्यामुळे यकृत आणि हृदय या दोन्हींचे आरोग्य धोक्यात येते. यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी आहाराच्या सवयी आणि जीवनशैली यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.

डॉ. मनोज कुंभार

Back to top button