हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज म्हणजे काय? जाणून घ्‍या सविस्‍तर | पुढारी

हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज म्हणजे काय? जाणून घ्‍या सविस्‍तर

डॉ. बिपीनचंद्र भामरे

श्वास घेण्यात अडचण किंवा छातीत अस्वस्थता असल्यास आपल्या डॉक्टरांची भेट घ्या. ही लक्षणे अनेकदा उच्च रक्तदाबाचा हृदयरोग संबोधित करतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा आजार होतो त्याला ‘हायपरटेन्सिव्ह हृदयरोग’ असे म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर दबाव पडून हृदयाच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हायपरटेन्सिव्ह हार्ट डिसीज ही एक अशी स्थिती आहे जी कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी), हार्ट फेल्युअर आणि हृदयाचे स्नायू कमकुवत होण्याची शक्यता वाढते आणि हे वाढत्या मृत्यू दराशी संबंधित आहे.

कारणे : उच्च रक्तदाब असणार्‍या लोकांना हायपरटेन्सिव्ह हृदयरोगाचा त्रास होतो. शिवाय,जास्त वजन, बैठी जीवनशैली, धूम्रपान आणि चरबी किंवा कोलेस्टेरॉल जास्त असलेल्या अन्नाचे सेवन यामुळे देखील हृदयविकाराचा त्रास होतो. हायपरटेन्सिव्ह हृदयरोगाचा कौटुंबिक इतिहास असला तरीही ही समस्या उद्भवू शकते.

लक्षणे : या स्थितीची तीव्रता, रुग्णाचे वय यानुसार लक्षणे वेगवेगळी असू शकतात. सतत छातीत दुखणे किंवा एनजाइना, छातीतील जडपणा, धाप लागणे, अशक्तपणा, थकवा आणि भूक मंदावणेही या समस्येची लक्षणे असतात.

उपचार : रक्तदाबावर औषधोपचार सुरू करत वेळोवेळी रक्तदाबाचे निरीक्षण केले जाते. आहारातील सोडियमचे प्रमाण कमी करणे, कमी ट्रान्स फॅटस् आणि कोलेस्टेरॉल असलेला आहार घेणे योग्य असते. ताजी फळे, भाज्या, तृणधान्य आणि बीन्स खाल्ल्याने हृदयाची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. दररोज व्यायाम केल्याने रक्तदाब नियंत्रित होण्यास आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते. वजन कमी करणे, अल्कोहोल आणि धूम्रपानाची सवय सोडणे आणि नियमित वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.

रक्तदाब नियंत्रणात राखण्यासाठी योगासने आणि ध्यान करून तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला जातो. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी दिवसातून 40 मिनिटे चालणे पुरेसे आहे. एकदा उच्च रक्तदाबाची औषधे सुरू झाली की सहसा ते आयुष्यभरासाठी आवश्यक असतात. रक्तदाब आता सामान्य पातळीत आहे म्हणून स्वमर्जीने औषधं बंद करू नयेत. असे केल्याने भविष्यात गुंतागुंतीचा सामना करावा लागू शकतो.

Back to top button