दमा : हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे या व्याधीचे प्रमाण वाढले | पुढारी

दमा : हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे या व्याधीचे प्रमाण वाढले

शहरांमधील हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे दमा या व्याधीचे प्रमाणही वाढले आहे. विशेषत: लहान मुलांमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. श्वास घ्यायला त्रास होणे, धाप लागणे, श्वास घेताना छातीतून आवाज येणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीला दम्याची व्याधी झाली आहे, असा प्राथमिक निष्कर्ष काढला जातो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास संबंधित व्यक्तीने डॉक्टरांकडून वेळीच उपचार करून घेणे आवश्यक असते.

महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण मोठे आहे. हवेतील प्रदूषणामुळे अनेकांना आरोग्याच्या वेगवेगळ्या कटकटींना तोंड द्यावे लागते आहे. हवेतील प्रदूषणामुळे अनेकांना श्वासोच्छ्वासाचे विकार जडले आहेत. महानगरे आणि शहरांमध्ये गेल्या काही वर्षांत अमर्यादित वृक्षतोड झाल्याने हवेच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. वृक्षतोडीमुळे प्रदूषणात अमाप वाढ होऊ लागली आहे. श्वासाची अ‍ॅलर्जी म्हणजेच दमा, ही व्याधीसुद्धा प्रदूषणामुळेच निर्माण होते हे लक्षात घेतले पाहिजे. लहान-लहान मुलांना प्रदूषित वातावरणामुळे श्वासाची अ‍ॅलर्जी झाल्याचे चित्र मोठ्या शहरांमध्ये पाहावयास मिळते आहे.

दमा या व्याधीविषयी डॉक्टरांची वेगवेगळी मते आहेत. काही जणांच्या मते, दमा हा रोग रेस्पिटरी न्यूरोसिस आहे, तर काहींच्या मते, अ‍ॅलर्जी आणि विषद्रव्ये निर्माण झाल्यामुळे ही व्याधी होते. श्वास घेताना आपल्या शरीरात जो वायू जात असतो तो नाक, गळा, श्वासनलिका यांच्या मार्गाने फुफ्फुसापर्यंत जातो. श्वास सोडताना याच क्रमाने तो शरीराबाहेर पडतो. डॉक्टरांच्या मते, श्वसनमार्गाला अ‍ॅलर्जी झाल्यास दमा होतो.

काहींच्या शरीराच्या दृष्टीने जो पदार्थ हानिकारक असतो, त्या पदार्थाला अ‍ॅलर्जिक असे म्हटले जाते. असा पदार्थ आपल्या शरीरात आला तर शरीराकडून त्याला विरोध केला जातो. अ‍ॅलर्जिक पदार्थ श्वासनलिकेत शिरला तर फुफ्फुसांचा बचाव करण्याकरिता श्वासनलिकेकडून अशा पदार्थांना प्रतिबंध केला जातो. या क्रियेमध्ये आपल्याला श्वास घेण्यात अडचणी जाणवू लागतात.

आपल्या शरीरात जे अ‍ॅलर्जिक पदार्थ घुसलेले आहेत, त्यामुळे आपल्याला खोकला येतो आणि शरीरात कफ तयार होतो, गळा सुजतो, त्यामुळे श्वासनलिकेत अडथळे निर्माण होतात. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. शरीरात अशी अवस्था वारंवार निर्माण होऊ लागली तर त्या व्यक्तीला दमा झाला आहे असे समजले जाते. खरे तर दमा हा कोणताही आजार नाही.

अ‍ॅलर्जीमुळे होणारा हा त्रास अनुवंशिकसुद्धा असतो. श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास कोंडणे, श्वास घेताना छातीतून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येणे, छातीवर दाब पडल्यासारखा वाटणे, खोकताना घाम येणे, चेहरा पिवळा होणे, धाप लागणे अशी दम्याची काही लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसल्यास त्या व्यक्तीला दमा झाला असे समजले जाते. वारंवार खोकला येऊ लागला असेल, तसेच औषधोपचार करूनही पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला कायम राहिला तर डॉक्टरांकडून शरीराची संपूर्ण तपासणी करणे आवश्यक ठरते. दम्याचा अ‍ॅटॅक अचानक येतो. साधारणपणे मध्यरात्रीनंतर दम्याचा त्रास सुरू होतो.

अ‍ॅलर्जीमुळे फुफ्फुसाला संसर्ग होतो आणि रुग्णाला श्वास घेण्यास कमालीचा त्रास होऊ लागतो. रुग्णाला कॉटवर आडवे झाल्यावर हा त्रास अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे असे रुग्ण कॉटवर आडवे होतच नाहीत. दम्यावर उपचार करण्याकरिता इन्हेलर औषधे दिली जातात. याखेरीज गोळ्या आणि इंजेक्शनच्या माध्यमातूनही अशा रुग्णांवर उपचार केले जातात.

अशा रुग्णांनी औषधे घेण्याबरोबरच काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. ज्यांना धुळीची अ‍ॅलर्जी असते, त्यांनी घरात आणि घराबाहेर धुळीपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. कुटुंबीयांनी घरात नेहमी स्वच्छता ठेवली पाहिजे. कोठेही धूळ साचू देऊ नये. घरात मोठे पडदे लावू नयेत तसेच जाड जाड गालीचेही अंथरू नयेत.

मोठे पडदे लावले असल्यास आणि गालीचे टाकले असल्यास व्हॅक्युम क्लिनरच्या सहाय्याने त्याची वारंवार सफाई करणे आवश्यक असते. व्हॅक्युम क्लिनरद्वारे पडदे, गालीच्यांमधील सूक्ष्म कणही बाहेर काढले जातात. घरातील फरशी वारंवार ओल्या कापडाने स्वच्छ करा. घरात कोणताही पाळीव प्राणी ठेवू नका. तसेच उग्र वासाच्या सेंटचा, अत्तरांचा वापर करणे टाळा.

रुग्णांमध्ये अ‍ॅलर्जीची कारणे प्रकृतीनुसार वेगवेगळी असतात. पीठ चाळणे, गहू साफ करणे अशा कारणांमुळे दमेकर्‍यांना त्रास होऊ शकतो. अशा अन्नपदार्थांपासून आपल्याला अ‍ॅलर्जी होते हे लक्षात आल्यावर त्यापासून आपण दूर राहिले पाहिजे. तिखट, मसालेदार पदार्थ, तळलेले पदार्थ अतिरिक्त प्रमाणात खाऊ नयेत. तसेच अशा रुग्णांनी दहीसुद्धा जास्त प्रमाणात खाऊ नये.

ज्या खाद्यपदार्थांमध्ये रंग वापरलेले असतात, असे खाद्यपदार्थ टाळले पाहिजेत. काही रुग्णांमध्ये राग, संताप, चिंता, भीती, अधिक श्रम होणे या कारणांमुळेही दम्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव यामुळेसुद्धा ही व्याधी वाढते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या व्याधीचा संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर रुग्णाने नियमित व्यायाम करून आपली प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे.

फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याकरिता नियमित व्यायाम केला पाहिजे. जलनेती, सूत्रनेती आणि कुंजल या क्रियांद्वारे दमा या व्याधीवर प्रभावी उपचार केला जातो. जलनेती आणि सूत्रनेती केल्यास श्वसनमार्गातील अडथळे दूर होतात. तसे झाल्यास रुग्णाला श्वास घेण्यात अडचणी येत नाहीत. श्वासनलिकेच्या वरच्या भागाला साफ करण्यासाठी जलनेती आणि सूत्रनेती या क्रिया उपयुक्त ठरतात. श्वसनमार्गाला झालेला संसर्ग दूर करण्याचे काम या क्रियांद्वारे केले जाते.

कुंजल या क्रियेद्वारे शरीरातील न पचलेले अन्नपदार्थ शरीराबाहेर काढले जातात. कुंजल क्रिया केल्यानंतर शरीरातून हिरव्या, पिवळ्या रंगाचा स्राव बाहेर पडतो. कुंजल क्रियेनंतरही रुग्णाला आराम मिळतो. दमा असलेल्या रुग्णांनी दीर्घ श्वसन करणे, प्राणायाम करणे आवश्यक असते. प्राणायाम नियमित केल्यास या व्याधीची तीव्रता कमी झाल्याचा अनुभव रुग्णाला येऊ शकतो. ही व्याधी झालेल्या रुग्णांनी आपल्याला कोणते अन्नपदार्थ घेतल्यास त्रास होतो याचे रेकॉर्ड तयार केले पाहिजे.

असे रेकॉर्ड तयार केल्यास त्या व्यक्तीला आपल्याला कोणत्या अन्नपदार्थांची अ‍ॅलर्जी आहे हे कळू शकते. असे अन्नपदार्थ कळल्यानंतर रुग्णाला त्या अन्नपदार्थांपासून स्वत:ला दूर ठेवता येते. दम्याचा त्रास होणार्‍या रुग्णाने आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्याकरिता जॉगिंग, पोहणे यांसारखे व्यायाम नियमित स्वरूपात केले पाहिजेत. त्याचबरोबर योगासनेही करणे आवश्यक आहे.

पोहण्यासारख्या व्यायामामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. तसेच सकाळी स्वच्छ हवेत फेरफटका मारून आल्यास त्याचाही फायदा होतो. स्वच्छ हवा फुफ्फुसांमध्ये गेल्यास फुफ्फुसाला झालेला संसर्ग दूर होण्यास मदत होते. दमा या व्याधीवर कायमस्वरूपी इलाज होत नाही असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या त्रासाची तीव्रता कमी करणे तसेच दम्याच्या दोन अ‍ॅटॅकमधील कालावधी वाढविणे वेगवेगळ्या उपचारांद्वारे शक्य आहे. या व्याधीशी संबंधित एक लक्षण जरी आढळले तर तातडीने डॉक्टरांकडून उपचार करून घेणे गरजेचे असते. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा फटका आपल्याला बसू शकतो.

डॉ. संजय गायकवाड

Back to top button