वाढतोय डांग्या खोकला | पुढारी

वाढतोय डांग्या खोकला

डॉ. महेश बरामदे

डांग्या खोकल्याच्या उद्रेकाने जगातील अनेक देशांतील आरोग्य अधिकारी चिंतेत पडले आहेत. चीनसह अमेरिका, इंग्लंड, फिलिपाईन्स, झेक प्रजासत्ताक आणि नेदरलँडस्मध्येही या आजाराने ग्रस्त रुग्णांची मोठ्या संख्येने प्रकरणे नोंदवली गेली आहेत. डांग्या खोकल्याचा धोका विशेषतः लहान मुलांमध्ये जास्त असतो. याबाबत सर्वात वाईट परिस्थिती चीनमध्ये आहे.

चीनमध्ये 2024 च्या पहिल्या दोन महिन्यांत किमान 32,380 प्रकरणे आढळून आली असून त्यात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एका वर्षापूर्वीच्या तुलनेत यंदा वीसपट अधिक प्रकरणे आहेत. चीनमध्ये डांग्या खोकल्यामुळे परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. चीन अशा बातम्या नेहमीच लपविण्याचा प्रयत्न करतो, हे कोरोना काळात जगाने पाहिले आहे.

डांग्या खोकला हा बोर्डेटेला पेर्ट्युसिस या जिवाणूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य जिवाणू संसर्ग आहे आणि लहान मुलांमध्ये अधिक सहजतेने पसरतो. हा संसर्ग मुख्यत: जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकतो किंवा शिंकतो तेव्हा हवेत सोडल्या जाणार्‍या थेंबांद्वारे होतो.

डांग्या खोकल्यामध्ये ताप येणे, शिंका येणे, डोळे आणि नाकातून पाणी वाहणे, कोरडा खोकला अशा तक्रारी दिसतात. तथापि, डांग्या खोकल्यावरील उपचारांचा एक मार्ग म्हणजे लसीकरण. यासाठी तीन डोस आवश्यक आहेत. आता प्रश्न पडतो की, डांग्या खोकल्यासाठी औषध उपलब्ध असताना चीनमध्ये लोकांचा मृत्यू का झाला? ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांचा इतिहास पाहण्याची गरज आहे. आधीच आजारी लोकांना डांग्या खोकल्यामुळे जास्त त्रास होतो का? मरण पावलेल्यांमध्ये फक्त मुलेच आहेत का की, मोठ्या माणसांनाही जीव गमवावा लागला आहे का? ज्यांचा मृत्यू झाला त्यांना पुरेसे लसीकरण करण्यात आले होते का? योग्य औषधोपचार करूनही मृत्यू होत असेल, तर मोठ्या प्रमाणावर विचार करण्याची बाब आहे. शेवटी, चीनमध्ये संसर्गजन्य रोग जीवघेणे का होत आहेत? चीनमधील लोकांची प्रतिकारशक्ती खूपच कमकुवत झाली आहे का? डांग्या खोकला पूर्णपणे काढून टाकता येतो का? अशा अनेक प्रश्नांची आता चर्चा सुरू झाली आहे.

सामान्य खोकला बराच काळ बरा होत नाही तेव्हा विशेष सावधगिरी बाळगणे, ही काळाची गरज आहे. डॉक्टरांनी त्याच्या सर्व डेटाचा अभ्यास केला पाहिजे. चीनशिवाय अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांना या आजाराबाबत अधिक सतर्क राहावे लागेल.

भारतात उन्हाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, ताप यांसारखे आजार डोके वर काढतात. याशिवाय ठिकठिकाणी वातानुकूलित यंत्रे वापरली जात असल्याने अशा आजारांचा प्रादुर्भावही वाढताना दिसतो. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला होता तेव्हाही डॉक्टरांनी गर्दीच्या बंद खोल्यांमध्ये न जाता उघड्यावर अधिक वेळ घालवण्याचा सल्ला दिला होता. डांग्या खोकल्याच्या बाबतीतही आता हीच खबरदारी घ्यावी. हात आणि शरीराची स्वच्छता अपरिहार्य. मुलाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल, तर त्याच्या तोंडावर मास्क लावावा.

वातानुकूलित खोल्यांमध्ये राहणे ही सक्ती असल्यास स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्यावे लागेल आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पुरेशा उपाययोजना कराव्या लागतील. श्वसनासंबंधी विकार असणार्‍या रुग्णांना फुप्फुसाचा संसर्ग (न्यूमोनिया), हृदय आणि मेंदूवर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांनी त्यांच्या आघाडीवर आवश्यक लसीसह पूर्ण तयारी ठेवावी. डांग्या खोकल्याची लस घेण्याची शिफारस सर्व बालकांसाठी केली जाते. ही लस सामान्यतः डीटीपी (घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला) अशी संयुक्तपणे दिली जाते. पालकांनी मुलांना ती देण्याबाबत हलगर्जीपणा करू नये.

Back to top button