Hemoglobin : हिमोग्लोबिनची कमतरता आणि स्त्रियांच्या समस्या | पुढारी

Hemoglobin : हिमोग्लोबिनची कमतरता आणि स्त्रियांच्या समस्या

डॉ. सुचेता पार्टे

रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी असल्यास आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. हिमोग्लोबिन कमी असल्यास अशा महिलांनी वेळीच उपचार करणे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लोहयुक्त आहाराचा समावेश करणे आवश्यक आहे.

महिलांना हिमोग्लोबिनची पातळी योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे. हिमोग्लोबिन शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी गरजेचे आहे, जे ऊर्जा उत्पादन आणि एकूण आरोग्यासाठी आवश्यक असते. गरोदर स्त्रिया किंवा ज्यांची मासिक पाळी सुरू आहे, अशा महिलांना ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये यासाठी हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे आवश्यक आहे. कमी हिमोग्लोबिनमुळे स्त्रियांमध्ये थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे आणि त्यांच्या दैनंदिन कामावर आणि जीवनावर परिणाम होतो. योग्य हिमोग्लोबिन पातळीमुळे गर्भधारणेदरम्यान मुदतपूर्व प्रसूती किंवा कमी वजनाचे बाळ यासारखी गुंतागुंत टाळता येते. म्हणूनच महिलांच्या संपूर्ण आरोग्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी योग्य असणे महत्त्वाचे ठरते. हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी आयर्नयुक्त आहार घेणे आवश्यक असते.

कमी हिमोग्लोबिनमुळे मासिक पाळीतील असामान्य रक्तस्राव किंवा अशक्तपणा यासारख्या विशिष्ट स्त्रीरोगविषयक समस्या उद्भवू शकतात. शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी योग्य राखणे गरजेचे आहे. ही पातळी कमी होते, तेव्हा ऊतींना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. यामुळे प्रजनन प्रणालीसंबंधित समस्या निर्माण होतात. रक्तातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे मासिक पाळीतही व्यत्यय येऊ शकतो. परिणामी, अनियमित किंवा अतिस्रावाची मासिक पाळी येऊ शकते. याशिवाय योग्य हिमोग्लोबिनची पातळी स्त्रियांमध्ये ओव्हुलेशन व हार्मोन संतुलनास मदत करते, ज्यामुळे प्रजनन क्षमता चांगली राहण्यास मदत होते. कमी हिमोग्लोबिन पातळीमुळे शरीरातील हार्मोनल समतोल बिघडल्यामुळे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (झउजड) सारखी परिस्थिती विकसित होण्याची जोखीम वाढू शकते.

तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार अशक्तपणा आणि पीसीओएस यांच्यातील परस्पर संबंध दिसून आला आहे. हिमोग्लोबिनच्या कमतरतेला दूर केल्याने स्त्रीरोगविषयक विकाराचे व्यवस्थापन करण्यात मदत होऊ शकते. लोह आणि इतर पोषक तत्त्वांनी समृद्ध संतुलित आहाराद्वारे निरोगी हिमोग्लोबिन पातळी राखण्यावर लक्ष केंद्रित करणे हे संपूर्ण आरोग्यासाठीच नाही, तर हिमोग्लोबिन पातळी योग्य राखण्यास गरजेचे आहे. रक्ताच्या चाचण्यांद्वारे हिमोग्लोबिन पातळीचे नियमित निरीक्षण केल्यास कोणतीही कमतरता लवकर ओळखण्यात मदत होते आणि संभाव्य आरोग्य समस्या टाळता येतात. पौष्टिक आहाराला प्राधान्य देत आहारातील लोहाचे प्रमाण वाढविणे, नियमित रक्त तपासणीद्वारे हिमोग्लोबिनच्या पातळीचे निरीक्षण करता येते आणि कमी हिमोग्लोबिन पातळीशी संबंधित संभाव्य गुंतागुंत टाळता येते.

Back to top button