New Year 2024 : नवीन वर्षात व्यायामाचा संकल्प करणार आहात ? त्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या | पुढारी

New Year 2024 : नवीन वर्षात व्यायामाचा संकल्प करणार आहात ? त्याआधी 'या' गोष्टी जाणून घ्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवीन वर्षांच्या सुरूवातीला अनेक संकल्प केले जातात. परंतु त्यातील काही संकल्प अर्ध्यावर सोडून दिले जातात. तर काही जणांकडून ते पूर्णही केले जातात. नवीन वर्ष २०२४ ची सुरूवात ५ दिवसांनी होणार आहे. त्यानिमित्त आरोग्यदायी सवयी अंगीकारण्यासाठी अनेक जण व्यायामाचा संकल्प करतात. हा संकल्प सफल होण्यासाठी आणि तुमचा फिटनेस सुधारण्यासाठी या गोष्टींचा तुम्ही अवलंब करू शकता. नवीन वर्षापासून व्यायामाला सुरूवात करून तुम्ही तुमची प्रकृती सदृढ ठेवू शकता. तर जाणून घेऊया याबाबत… (New Year 2024)

ध्येय निश्चित करा

पहिल्यांदा तुम्ही तुमचे ध्येय निश्चित करा. सुरूवातीला मोठे टार्गेट ठावू नका. सुरूवातीला २, ३, ५ किमी धावण्याचे लक्ष्य ठेवा. किंवा न थांबता १० पुश-अप करण्याचे लक्ष्य ठेवावे. तुमचे हे ध्येय कागदावर लिहा आणि तुमच्या प्रगतीचा सतत आढावा घेत चला.

वेगवेगळ्या प्रकारांचा समावेश करा

तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्यायामाचा समावेश करा. जेणेकरून व्यायामाचा तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुम्ही तुमच्या फिटनेस रुटीनमध्ये योगा, सायकलिंग, पोहणे, धावणे, वेटलिफ्टिंग, चालणे आदी व्यायामाचा समावेश करू शकता.

छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा

सुरुवातीला जास्त वर्कआउट करण्याऐवजी छोट्या गोष्टींपासून सुरुवात केल्यास अधिक फायदा होईल. सुरुवातीला १५ ते २० मिनिटेच वर्कआउट करा. यानंतर तुमच्या वर्कआउटची वेळ हळूहळू वाढवत न्या.

स्वत:ला शाबासकी द्या

जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रकारचे फिटनेस ध्येय पूर्ण कराल तेव्हा स्वतःला शाबासकी द्या आणि तुमची स्वंयप्रेरणा वाढवा. फिटनेसशी संबंधित काही गॅजेट्सही स्वत:ला भेट देऊ शकता.

तुमच्या प्रगतीचा आढावा घ्या

तुमच्या फोनमध्ये काही अॅप्स इन्स्टॉल करून घ्या, जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रगतीचा आढावा घेता येईल. तुम्ही करत असलेले प्रयत्न य़ोग्य़ दिशेने आहेत की नाही, याचे अवलोकन करा. त्यामुळे तुम्ही अपडेट राहाल

New Year 2024 : व्यायामासाठी पार्टनर शोधा

तुमच्यासोबत व्यायाम करण्यासाठी सोबती असेल. तर ते तुम्हाला आणखी प्रेरणादायी ठरेल. परंतु, तुमच्यासारखेच ध्येय असलेली व्यक्ती शोधा. त्याच्या मदतीने आणि सोबतीने व्यायाम करताना तुमचा उत्साह वाढू शकतो. यामुळे तुमचा व्यायाम खूप रोमांचक होईल.

New Year 2024 : ब्रेक घ्या

व्यायामाच्या रूटीन दिनचर्येतून आठवड्यातून एक दिवस विश्रांती घ्या. शरीर रिकव्हर होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, म्हणून त्याकडे दुर्लक्ष करू नका. शरीराला विश्रांती आणि पुनर्प्राप्ती होण्यासाठी आठवड्यातून १ दिवसाची विश्रांती आवश्यक घ्या. यामुळे संभाव्य दुखापतीचा धोका टळू शकतो.

फिटनेस प्रशिक्षकाची मदत घ्या

तुम्हाला व्यायाम कसा करायचा आहे, याबाबत माहिती नसेल, तर तुम्ही फिटनेस व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रशिक्षकांची मदत घेऊ शकता. त्यांच्याकडून स्वतःसाठी फिटनेस प्लॅन तयार करून घ्या. वर्कआउट आणि व्यायामाचे तंत्र शिकून घ्या.

New Year 2024 : योग्य आहार घ्या

व्यायामासोबत तुम्ही संतुलित आहार घेतल्यास तुम्हाला फिटनेसचे चांगले परिणाम दिसून येतील. आहारात प्रोटीन्स, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, आयरन, फायबर, फॅट, खनिज पदार्थ यांचा समावेश करा. त्यासोबत दूध, फळे, हिरव्या पालेभाज्या यांच्याही आपल्या आहारात समावेश करा.

हेही वाचा 

Back to top button