वजन कमी करायचंय! मग ‘हे’ सोपे व्यायामप्रकार करा

वजन कमी करायचंय! मग ‘हे’ सोपे व्यायामप्रकार करा

व्यायाम हा आपले शरीर सक्रिय ठेवण्याचा व त्याच्या प्रत्येक इंद्रियाचे कार्य योग्य प्रकारे चालू ठेवण्याचा मार्ग असतो. जर आपण नियमितपणे व्यायाम केला. तर केवळ शारीरिक सु-आरोग्य राहते असे नाही, तर मानसिक स्वास्थ्य, उत्साह यांचेही वर्धन होते.

संबंधित बातम्या 

वजनाबाबत जागरूक स्त्रियांनी करण्याजोगे सुलभ व्यायाम-प्रकार आहेत का, असा प्रश्न आपले वजन घटवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या अनेक महिलांच्या मनात असतो. त्याद़ृष्टीने नियमितपणे करण्याजोगे काही व्यायामप्रकार इथे नोंदवले आहेत. त्याद्वारे वजन नियंत्रण करणे, घटविणे जमू शकते.

पोट कमी व्हावे यासाठी सोपा उपाय म्हणजे बसताना, उठताना, लिहीत वा चालत असताना पोट आत ओढावे. श्वासही जेवढा वेळ आत ओढता येईल, तेवढा ओढावा व सोडावा. असे नियमितपणे करावे व जमेल तितकी श्वास आत ओढण्याची वेळ वाढवत न्यावी.

शरीर चुस्तीसाठी पाय ताठ करून व ते जुळवून उभे रहावे. कथ्थक नृत्यात दोन्ही हात जमिनीस आडवे व समांतर ठेवतात, तसे ठेवावे. मग डावा गुडघा हातांच्या दिशेने वर उचलत न्यावा. उजवा पाय ताठच ठेवा मग उजवा गुडघा असाच वर उचलावा व डावा पाय स्थिर ठेवावा.

नियमितपणे दोरीवरील उड्या माराव्यात. दर आठवड्यास एका दमात मारल्या जाणार्‍या उड्यांची संख्या वाढवत न्यावी.

प्रत्येकीने व्यायामाच्या प्रकाराची निवड करताना तो आपल्या देहयष्टीनुसार निवडावा. सायकलिंग, जॉगिंग, पायी चालणे इ. प्रकारचे व्यायाम अधिक करावेत. यामुळे शरीर व मन या दोहोंत स्फूर्ती राहते.

भराभरा पायी चालणे हा व्यायामाचा सर्वात सोपा व तेवढाच परिणामकारक प्रकार आहे. यामुळे कॅलरीज तर खर्च होतातच, पण त्याबरोबरच रक्तदाब व हृदयाचे कार्यही नियंत्रित राहते.

म्हणूनच रोज सकाळ-संध्याकाळ फिरायला जाणे आवश्यक असते. आपल्या सर्वांगात स्फूर्ती, उत्साह व तरतरी आणण्यास याचा खूपच उपयोग होतो. चिडचिडेपणा, अकारण येणारा राग यावरही नियंत्रण राहते, ताठ, भराभरा व मान सरळ व ताठ ठेवून चालावे. पायही ताठ असावेत. चालताना देह पुढे झुकवू नये व गती समान ठेवावी, हे महत्त्वाचे.

खूप वेगाने व्यायाम केला की, काही वेळ कमी वेगाने व्यायाम करावा. म्हणजे कॅलरींचे ज्वलन वेगाने होते व शरीराचा मेटॅबोलिक रेटही वाढतो. तसेच जर एकूण व्यायाम तीस मिनिटे करणार असाल, तर पहिली दहा मिनिटे वेग मर्यादित ठेवावा. मग तो वाढवावा व त्यानंतर एक मिनीट कमी करावा. यामुळे शरीरास योग्य व्यायाम होतो.

जर पायी चालणे होत नसेल तर जिना चढणे-उतरणे हा व्यायाम करावा. यामुळेही शरीरास श्रम पडून चेतापेशी लवचिक व मजबूत बनतात व त्याची कार्यक्षमता वाढून वात कमी होतो. शरीरातील अनावश्यक चरबीही कमी होण्यास मदत मिळते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news