आठवड्यातून दोनवेळा ‘रेड मीट’ खाल्ल्याने वाढतो टाइप-2 डायबिटीजचा धोका, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती | पुढारी

आठवड्यातून दोनवेळा 'रेड मीट' खाल्ल्याने वाढतो टाइप-2 डायबिटीजचा धोका, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आठवड्यातून दोनवेळा रेड मीट (लाल मांस) खाल्‍ल्‍याने टाईप-2 डायबिटीजचा (मधूमेह) धोका वाढतो, असा निष्‍कर्ष अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातील नवीन संशोधनात व्‍यक्‍त केली आहे. ( Type 2 diabetes and Red meat ) ‘हेल्‍थलाइन’ने यासंदर्भातील रिपोर्ट दिला आहे. जाणून घेवूया, नवीन संशोधनातील माहिती.

टाइप 2 डायबिटीज हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख आरोग्य धोक्यांपैकी एक आहे. गेल्या तीन दशकांमध्ये सर्वच देशांमध्‍ये त्याचा प्रसार वाढला असल्‍याचे जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी स्‍पष्‍ट केले आहे. मागील अभ्यासांनी लाल मांसाचे सेवन आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका यांच्यातील संबंध दर्शविला आहे, आता ‘हार्वर्ड’च्या नवीन संशोधनामुळे या संबंधाबद्दल निश्चितता अधिक असल्‍याचे संशोधकांनी म्‍हटले आहे. लाल मांसाच्या जागी वनस्पती-आधारित प्रथिने स्रोत घेतल्यास टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो आणि पर्यावरणीय फायदे देखील मिळू शकतात, असेही या संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. ( Type 2 diabetes and Red meat )

रेड मीट खाणार्‍यांना टाइप-२ डायबिटीजचा धोका ६२ टक्‍के अधिक

चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ ॲन्‍ड द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या लेखात नमूद केले आहे की, हार्वर्ड विद्‍यापीठातील संशोधकांनी अमेरिकेतील नर्सेस हेल्थ स्टडी, नर्सेस हेल्थ स्टडी II आणि हेल्थ प्रोफेशनल्स फॉलो-अप स्टडी (HPFS) मधील २ लाख १६ हजार ६९५ जणांच्‍या आरोग्‍याचे विश्‍लेषण केले. यामध्‍ये संबंधितांना मागील चार वर्षांमध्‍ये त्‍यांच्‍या आहाराबद्दल प्रश्नावली देण्‍यात आली. २२ हजारांहून अधिक लोकांना टाइप 2 मधुमेह झाल्‍याचे या प्रश्‍नावलीतून समोर आले. मात्र ज्यांनी सर्वात जास्त रेड मीट खाल्ले त्यांना हा आजार होण्याचा धोका कमीत कमी खाणाऱ्यांच्या तुलनेत तब्‍बल ६२ टक्‍के जास्‍त असल्याचे स्पष्ट झाले.

संशोधनात असेही निदर्शनास आले की, प्रक्रिया केलेले रेड मीट दररोज आहारात असल्‍यास टाइप 2 मधुमेह होण्याची शक्यता ४६ टक्के असते. प्रक्रिया न केलेल्या रेड मीट हा धोका २४ टक्‍क्‍यांनी वाढवतो. हार्वर्ड टीएच चॅन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमधील पोषण विभागातील पोस्टडॉक्टरल संशोधक जिओ यांनी म्‍हटले आहे की, “ हा अभ्यास एक निरीक्षणात्मक अभ्यास आहे. आमच्‍या संशोधनातील निष्कर्ष रेड मीट वापर मर्यादित ठेवण्याची शिफारस करतात. प्रक्रिया केलेले आणि प्रक्रिया न केलेले रेड मीट याचा वापर मर्यादित ठेवण्‍याची शिफारस करतात.” ( Type 2 diabetes and Red meat )

Type 2 diabetes and Red meat : अतिरिक्त चरबी ‍ठरते अपायकारक

प्लांट बेस्ड हेल्थ प्रोफेशनल्समधील आहारतज्ज्ञ आणि मधुमेह विशेषज्ञ क्लेअर लिंच यांच्या मते, लाल मांसामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळे वजन वाढण्‍यास चालना मिळते. अतिरिक्त चरबी पोटाच्या आत असलेल्या अवयवांभोवती साठवली जाते. इन्सुलिन हा एक संप्रेरक आहे जो स्वादुपिंडाच्या बीटा-पेशींद्वारे सोडला जातो. तो रक्तातून ग्लुकोजला ऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या पेशींमध्ये हलवण्यास मदत करतो; परंतु पेशी इन्सुलिन प्रतिरोधक बनल्या तर इन्सुलिन आपले कार्य योग्यरित्या करू शकत नाही. यातूनच रक्तातील ग्लुकोजची (किंवा रक्तातील साखर) पातळी वाढू लागते.”

“रेड मीटचा वापर कमी केल्याने हरितगृह वायू उत्सर्जन कमी होण्यास, जमीन आणि पाण्याचा वापर कमी करण्यास आणि पशुपालनाशी संबंधित काही पर्यावरणीय दबाव कमी करण्यास मदत होऊ शकते,” असेही क्लेअर लिंच स्‍पष्‍ट करतात. रेड मीट हे सस्तन प्राण्यांपासून मिळते. यामध्‍ये पांढर्‍या मांसापेक्षा लोह आणि प्रथिने समृद्ध असते. रेडमीटमध्‍ये कोकरू आणि बकरी यांचाही मासांचा समावेश होतो. तर पांढरे मांस प्रत्यक्षात फिकट रंगाचे असते ते चिकन, टर्की, बदक पक्ष्यांपासून मिळते.

हेही वाचा :

 

Back to top button