मानसिक आरोग्य उत्तम आरोग्याचा मूलमंत्र | पुढारी | पुढारी

मानसिक आरोग्य उत्तम आरोग्याचा मूलमंत्र | पुढारी

डॉ. देवेंद्र रासकर

आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटत असतं, जसे पोटात दुखते, हात-पाय दुखतात तसेच मनाचेही दुखणे असू शकते. बर्‍याचदा शारीरिक दुखणे हे पटकन लक्षात येते; पण मानसिक आजार दिसत नाहीत आणि पटकन लक्षातही येत नाहीत.

मानसिक आजारांबद्दल समाजामध्ये अनेक चुकीच्या आणि वाईट समजुती आहेत. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य होय. आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणे हे बर्‍याच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य होय.

अनेकांना मानसिक आजार म्हणजे वेड लागणे अशी एक गैरसमजूत आपल्या समाजामध्ये आहे. आणि वेड लागले म्हणजे वेड्यांच्या दवाखान्यातचं दाखल करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही, असाही एक समज आहे. 

उत्तम मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणार्‍या सगळ्या बर्‍या वाईट अनुभवांना खंबीरपणे सामोरे जाणे. कुटुंबातील आणि समाजातील इतर लोकांशी चांगले नाते असणे असा अर्थ आहे. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे. उत्तम आरोग्याची दिनचर्या प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. या चतु:सुत्रीत पुढील गोष्टींचा समावेश होतो. दिवसभरातील दिनचर्या, उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिक संतुलन. यातील दिनचर्या हा उत्तम आरोग्यासाठी महत्त्वाचा घटक आहे.

प्रत्येकाची दिनचर्या सकाळी लवकर पहाटे पाच वाजता सुरू झाली, तर आरोग्य उत्तम राहील. (सुबह की हवा सव्वा लाख की) या उक्तीप्रमाणे प्राणशक्ती आणि त्याची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. यावेळी माणसाचे मन शांत असते. इतरांबरोबर जुळवून घेण्याची कार्यक्षमता वाढते. आपल्या प्रश्नांचे आपणच उत्तर शोधू शकतो. आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे हे ठरवण्यासाठीची ही वेळ उत्तम राहते. मनावर ताबा राहतो. जीवनातले ताणतणाव, काळजी तसेच सहन करण्याची कार्यक्षमता वाढते.

यानंतरचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आहार. आहार सर्वसमावेशक असावा. यात सर्व प्रकारच्या भाज्या, पालेभाज्यांचा समावेश असावा. फळांचा अंतर्भाव असावा. दूध, अंडी, सर्व प्रकारच्या डाळीदेखील आहारात सामील करणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार तेल आणि तुपाचा वापर करावा. यामुळे शरीरातील अनावश्यक घटक वाढत नाहीत. अगदी साध्या साध्या सवयी सुद्धा आरोग्य उत्तम राखण्यासाठी उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ : हात धुण्याची सवय पाहा, नियमित जेवणापूर्वी व जेवणानंतर हात धुण्याच्या सवयीमुळे डायरिया, डिसेंट्री यांसारखे आजार दूर राहतात.

शरीराबरोबरच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, जेवणात योग्य, पुरेसा आणि वेळेत आहार घेणे. स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे, चांगल्या सवयी लावून घेणे, धूम्रपान, मद्यपान न करणे, नियमित व्यायाम करणे व विनाकारण काळजी कमी करणे बंद करावे.

बरेचदा अनेक लोकांना एकाचवेळी भरपूर जेवायची सवय असते, ही सवय अत्यंत चुकीचे आहे. त्याऐवजी दिवसभरात दोन वेळा खाल्ले (लहान मुलांनी तीन ते चार वेळा) पाहिजे. आपला आहार हा उतरत्या क्रमात असावा. म्हणजे सकाळची न्याहारी बर्‍यापैकी असावी. त्यानंतर दुपारचे जेवणाचे प्रमाण थोडे कमी. तर संध्याकाळी आठ पूर्वी (अर्धे जेवण) आणि हो शक्यतो रात्री उशिरा काहीही खाऊ नये. जेवताना सकस आहार घ्यावा. असे केल्याने हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार दूर राहतात.

कोणत्याही रोगाची साधी-साधी वाटणारी लक्षणे दिसून आली तरीही, लगेचच योग्य त्या डॉक्टरांकडे जाऊन, योग्य तो औषधोपचार सुरू करावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात. दुखणं अंगावर काढू नये. कारण तसे केल्याने बरे होण्यासाठी वेळही जास्त लागू शकतो. आणि खर्चही जास्त येऊ शकतो.

आपलं शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी सुयोग्य व्यायाम हा गरजेचा आहे. व्यायामाकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. अनेक आजारांना दूर ठेवण्यासाठीची शक्ती व्यायामात आहे. नियमितपणे वेगाने चालणे, धावणे, योगिक व्यायाम, प्राणायाम, ध्यान, चिंतन हे अनेक आजारांना दूर ठेवण्यास उपयोगी आहे. मानसिक संतुलन कायम राखण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे समाधान. लोभ आणि अहंकार यापासून दूर राहिल्याने, मानसिक समाधान प्राप्त होते. त्यातून उत्तम मानसिक संतुलन मिळते. मानसिक संतुलनातून उत्तम सामाजिक आरोग्यही मिळते. सामाजिक दातृत्व भावनेतूनही उत्तम मानसिक आरोग्य प्राप्त होते. योग, प्राणायाम आणि चिंतनातून ही अवस्था सहज प्राप्त होते. त्यामुळे सकाळची दिनचर्या सुरू करताना योग आणि प्राणायाम यापासून सुरू करावी. भारतात प्रचलित समजुतीनुसार सायकाँलॉजिकल मदत घेणे आणि वेडेपणा या संकल्पनाबाबत बराच गोंधळ आहे. त्यामुळे अशी मदत घेण्याकडे देखील कलुषित नजरेने पाहिले जाते. पिढ्यान् पिढ्या समाजात रुजलेल्या मानसिकतेत रचनात्मक बदल करण्याची गरज आहे. हेदेखील लक्षात घेतले पाहिजे.

सर्वसाधारण आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर असणे आवश्यक आहे. शरीरातील मीठ आणि साखरेचे प्रमाण ही कायम राखणे गरजेचे आहे. उत्तम आरोग्यासाठी नियमित तपासणीकडे दुर्लक्ष करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व वयानुसार काही तपासण्या करणे क्रमप्राप्त ठरते. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये, अशा तपासण्यांच्या माध्यमातून वेळीच रक्तदाब, मधूमेह, हाडांचे विकार आदी आजारांना आळा घालता येतो. किंबहुना त्यांच्यावर वेळीच नियंत्रण ठेवता येते.

एकंदरीत आरोग्य उत्तम असेल, तर आयुष्यात सामोर्‍या येणार्‍या वेगवेगळ्या परिस्थितीशी दोन हात करण्याची शारीरिक व मानसिक क्षमता तुमच्यात निर्माण होईल.

Back to top button