धोका डायबेटिक रेटिनोपॅथीचा, जाणून घ्‍या या विकाराविषयी… | पुढारी

धोका डायबेटिक रेटिनोपॅथीचा, जाणून घ्‍या या विकाराविषयी...

- डॉ. वर्धमान कांकरिया

मधुमेह जडल्यानंतर इतर व्याधी (कोमॉर्बिडिटीज) रुग्णाच्या शरीरावर आक्रमण करू लागतात. त्यात हृदयविकार, रक्तदाबाचा विकार या व्याधी प्रधान्यक्रमाने जडतात. मधुमेहाचा परिणाम डोळ्यांवर होऊन डायबेटिक रेटिनोपॅथी हा नेत्रपटलाशी संबंधित गंभीर विकारही जडू शकतो. त्यावर वेळीच उपचार केले नाही तर दृष्टी जाण्याचीही भीती असते. या विकाराविषयी…

रेटिनाशी संबंधित विकारांच्या उपचारांबाबत हलगर्जीपणा नकाे

रेटिनाशी (नेत्रपटल) संबंधित अनेक व्याधी आहेत. या सर्वच व्याधी कमी-अधिक प्रमाणात धोकादायक आहेत. रेटिनाच्या पेशींची हानी झाल्यास ती भरून निघू शकत नाही. त्यामुळे रेटिनाशी संबंधित विकारांच्या उपचारांबाबत हलगर्जीपणा करू नये. खरे तर, रेटिनाशी संबंधित सर्वच विकार गंभीर आहेत; पण या विकारांमध्ये ‘डायबेटिक रेटिनोपॅथी’ अर्थात मधुमेहजन्य नेत्रपटलविकार अधिक गंभीर आहे. यात रेटिनाचा काही भाग निकामी होणे, पडद्यापुढे रक्तस्त्राव होऊन काळे डाग दिसणे किंवा द़ृष्टी पूर्णपणे निकामी होणे असे परिणाम दिसून येतात. मधुमेह किंवा डायबेटिस हे शब्द आता नवीन राहिले नाहीत. आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे या व्याधीने आपले हातपाय चांगलेच पसरले आहेत.

जगातील सर्वाधिक मधुमेहींची संख्या भारतात आहे आणि यापुढे ती आणखी वाढत जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक मधुमेही व्यक्तीला डायबेटिक रेटिनोपॅथी जडेलच असे नाही; पण मधुमेह जडल्यानंतर ही व्याधी होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. अशा स्थितीत आपण (विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांनी) या व्याधीची सविस्तर माहिती घ्यायला हवी.

आपल्या आहारातून शरीरात जाणार्‍या कार्बोदकांचे (कार्बोहायड्रेट्स) ‘ग्लुकोज’ या साखरेच्या एका प्रकारात रूपांतर होते. ग्लुकोज शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये प्रवेश करते आणि शरीरातील इन्सुलिन या संप्रेरकाच्या (हार्मोन) साह्याने ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेत केले जाते. परंतु, काही कारणांमुळे शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही आणि ग्लुकोजचे ऊर्जेत रूपांतर होऊ शकत नाही. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. यालाच मधुमेह असे म्हणतात.

मधुमेहजन्य नेत्रपटल विकार अर्थात डायबेटिक रेटिनोपॅथी

मधुमेह ही व्याधी सर्वव्यापी आहे. ती शरीराच्या विविध अवयवांवर परिणाम करते. मधुमेहामुळे हृदय, मूत्रपिंड, आतडे यावर तर परिणाम होतोच; पण रक्तदाबासारख्या गंभीर व्याधीही जडू शकतात. मधुमेहाचे निदान झाल्यावर मधुमेहतज्ज्ञ रुग्णाला डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्यायला सांगतात. कारण, त्याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो. मधुमेहामुळे चष्म्याचा नंबर अचानक वाढतो, तर काही रुग्णांना भुरकं दिसायला लागतं. या रुग्णांना मोतिबिंदूही इतरांच्या तुलनेत कमी वयात होतो. मधुमेहींमध्ये काचबिंदूचे प्रमाणाही अधिक असते. बुबुळाची त्वचा कमकुवत होऊन कोरडेपणा येणे किंवा डोळ्याचे स्नायू निकामी होऊन तिरळेपणा येणे यासारखे दुष्परिणाम जाणवू शकतात. परंतु, या सर्वांपेक्षा गंभीर आणि द़ृष्टी कायमची अधू किंवा अंध करू शकणारा विकार म्हणजे मधुमेहजन्य नेत्रपटल विकार अर्थात डायबेटिक रेटिनोपॅथी!

मधुमेहामुळे रेटिनाचे विविध विकार होतात तेव्हा त्याला डायबेटिक रेटिनोपॅथी असे म्हणतात. मधुमेहामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात आणि आतून पातळ होतात. रेटिनामधील या रक्तवाहिन्यांमधून द्रवही पाझरतो (लिकेज). यामुळे रेटिनावर सूज येते. रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत झाल्याने कधी कधी त्यातून रक्तस्त्राव होतो, तर कधी कधी या रक्तवाहिन्या (केशवाहिन्या) अरुंद होऊन रेटिनाचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा थांबतो. पर्यायाने रेटिनाच्या पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि प्रथिने पोहोचू शकत नाहीत. रेटिनाला ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्याने किंवा पडद्यापुढे रक्तस्त्राव झाल्याने रेटिनाचा काही भाग निकामी होतो. त्यामुळे रुग्‍णाला काहीसे धूसर दिसू लागते. केशवाहिन्या अरुंद झाल्यावर रेटिनाचा रक्तपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आपोआप नवीन केशवाहिन्या तयार होतात; पण या केशवाहिन्या अत्यंत नाजूक असल्याने त्या सहज फुटू शकतात. या केशवाहिन्या फुटल्यास अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतात. त्यात रेटिना जागेवरून हलणे, डोळ्यांच्या आत रक्तस्त्राव होणे यांचा समावेश होतो. अशा विकारांमध्ये उपचार करूनदेखील द़ृष्टी पूर्ववत होऊ शकत नाही.

विकार वाढत जाऊन अंधत्वही येऊ शकते

वेळीच उपचार न केल्यास विकार वाढत जाऊन अंधत्वही येऊ शकते. डायबेटिक रेटिनोपॅथीचा प्रवास साधारणत: चार टप्प्यांमधून होतो. पहिला टप्पा म्हणजे ‘माइल्ड नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी’. यात रेटिनामधील केशवाहिन्यांमध्ये फुग्याप्रमाणे सूज येते. या सूज आलेल्या भागातून रेटिनावर एक प्रकारचा द्रव पदार्थ पाझरू लागतो (लीक होतो). दुसरा टप्पा म्हणजे ‘मॉडरेट नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी’. डायबेटिक रेटिनोपॅथीची व्याप्ती वाढते तसे रेटिनाला रक्तपुरवठा करणार्‍या केशवाहिन्या सुजतात आणि त्या वेड्यावाकड्या होऊ लागतात. या टप्प्यात त्यांची रक्त वाहून नेण्याची क्षमताही नष्ट होऊ लागते. यामुळे रेटिनामध्ये काही विशिष्ट बदल होतात. शिवाय यामुळे ‘डायबेटिक मॅक्युलर एडिमा’ या विकारास सुरुवात होऊ शकते.

तिसर्‍या टप्प्याला ‘सिव्हियर नॉन प्रॉलिफरेटिव्ह रेटिनोपॅथी’ असे म्हणतात. या टप्प्यात आणखी अनेक केशवाहिन्यांमधून रक्त वाहणे बंद होते. त्यामुळे रेटिनाचा रक्तपुरवठा मोठ्या प्रमाणावर रोखला जातो. त्यानंतर रक्तपुरवठा न होणार्‍या भागात काही ‘ग्रोथ फॅक्टर्स’ स्त्रवतात अणि त्यातून रेटिनाला नवीन केशवाहिन्या तयार करण्यासंबंधीचे संकेत मिळतात. चौथ्या टप्प्यात म्हणजे ‘प्रॉलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपॅथी’मध्ये नवीन केशवाहिन्यांचे जाळे तयार होऊ लागते. या केशवाहिन्या रेटिनाच्या आतील पृष्ठभागावर आणि डोळ्यातील द्रवपदार्थामध्ये वाढतात. या केशवाहिन्या अत्यंत नाजूक असल्याने त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो. त्याचबरोबर ‘स्कार टिश्यू’ अकुंचन पावून एखाद्या भिंतीवरून वॉलपेपर ओढून काढावा त्याप्रमाणे रेटिना ओढला जाऊ शकतो. याला ‘रेटिनल डिटॅचमेंट’ असे म्हणतात. रेटिनल डिटॅचमेंटमुळे द़ृष्टी कायमची जाऊ शकते.

Back to top button