रजोनिवृत्तीनंतर महिलांना ऑस्टिओपोरोसिस धोका? | पुढारी

रजोनिवृत्तीनंतर महिलांना ऑस्टिओपोरोसिस धोका?

रजोनिवृत्तीनंतर बर्‍याच महिलांना विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे हाडांची झीज होणं ही होय. वैद्यकीय भाषेत याला ऑस्टिओरोपोरोसिस असे म्हणतात. हाडांच्या दुखण्यांकडे, कुरकुरण्याकडे ‘पाळीनंतर होतंच’ असे म्हणून दुर्लक्ष केल्यास ऑस्टिओपोरोसिसचा धोका वाढतो. याशिवाय हार्मोनल बदलांमुळे रजोनिवृत्तीनंतरच्या काळात स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पाळी थांबल्यावर महिलांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

तज्ज्ञांच्या मते, रजोनिवृत्तीनंतर पहिल्या पाच वर्षांत 20 टक्के पर्यंत हाडांचे नुकसान होते. यामुळे ऑस्टिओपेनिया (कमी हाडांची खनिज घनता) आणि ऑस्टिओपोरोसिस होऊ शकते, या दोन्हीमुळे हाडे फ्रॅक्चर (कमकुवत हाडे) होण्याचा धोका वाढतो. तरुणवयात आपली हाडं मजबूत असतात, पण वाढत्या वयाबरोबर हाडांची काही प्रमाणात झीज व्हायला लागते. ही हाडांची झीज 30 वर्षांपासून सुरू होते. स्त्रिया रजोनिवृत्तीच्या जवळ येत असताना, त्यांचे शरीर कमी एस्ट्रोजन तयार करू लागते, त्यामुळे त्यांची हाडे कमकुवत होऊ लागतात. म्हणूनच रजोनिवृत्ताच्या टप्प्प्यावर असताना वेळीच डॉक्टरांच्या सल्ला घेणं गरजेचं आहे.

बर्‍याच स्त्रियांना विशेषत: ज्यांची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज असते. याव्यतिरिक्त, हाडांचे कमकुवत होणे थांबवण्यासाठी, हाडांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याची नीट काळजी घेणं आवश्यक असते. याकरिता वर्षातून एकदा जीवनसत्त्वांचे प्रमाण, थायरॉईड आणि पॅराथायरॉईड संप्रेरक यांसारख्या विशिष्ट रक्तचाचण्या करून घेणं गरजेचं आहे. कारण वेळीच निदान व उपचार झाल्यास हाडांची होणारी अतिरिक्त झीज टाळता येऊ शकते. जर एखाद्याला गंभीर ऑस्टिओेपोरोसिस असेल, तर डॉक्टर इंजेक्टेबल बोन बिल्डिंग अ‍ॅनाबॉलिक औषधांची शिफारस करू शकतात.

ऑस्टिओपोरोसिसचा धोका टाळण्यासाठी प्रत्येकाने ‘ड’ जीवनसत्त्वाच्या पूर्ततेकडे लक्ष द्यायला हवं. हाडांचे आरोग्य सांभाळण्याचे काम ‘ड’ जीवनसत्त्व करते. शरीराला जर पुरेसं ‘ड’ जीवनसत्त्व मिळालं नाहीतर हाडे आतड्यातून कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला पुरेस मिळण्यासाठी कोवळ्या उन्हात फिरावे. रजोनिवृत्तीनंतर हाडांचे आरोग्य सुद़ृढ ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. संतुलित आहाराचे सेवन करावे, धूम्रपान आणि मद्यपानाचे सेवन करणं टाळावे.

डॉ. ओंकार सदीगळे

Back to top button