अ‍ॅनारोक्सिया नर्वोसा म्हणजे काय? | पुढारी

अ‍ॅनारोक्सिया नर्वोसा म्हणजे काय?

अ‍ॅनारोक्सिया नर्वोसा ही एक प्रकारची मानसिक अवस्था आहे. यामध्ये व्यक्‍ती आपल्या वजनाविषयी अधिक संवेदनशील होतो. व्यक्‍तीला सतत भीती वाटत राहते की भरपेट जेवल्याने तो लठ्ठ होईल. त्यामुळे व्यक्‍तीचा आहार अनियमित होतो आणि अनियमित – कमी आहारामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शरीर आतून कमजोर होऊ लागते. अ‍ॅनारोक्सियाचा आजार असणार्‍यांचे वजन काही आठवड्यातच 25 टक्के कमी होते. ज्या लोकांमध्ये ही इटिंग डिसऑर्डर असते ते भूक आहे असे कधीच मान्य करत नाहीत. खरोखरीच त्यांना भूक लागली असेल किंवा त्यांच्या शरीराला अन्‍नाची गरज असेल तरीही ते खायला नकार देतात. त्यांना सतत असे वाटते की जेवले किंवा खाल्ले तर त्यांचे वजन वाढेल. जेव्हा व्यक्‍तीचे वजन कमी होते तेव्हा व्यक्‍तीचा मेंदूतील उत्साह वाढवणारा हिस्सा सक्रिय होतो. जेवण करण्यासाठी प्रेरणा देण्यापेक्षा तो भाग उलटे काम करू लागतो. कदाचित या कारणामुळेच अनारोक्सिया ग्रस्त व्यक्‍तींचा स्वभाव चिडचिडा होतो.

पूर्वी झालेल्या संशोधनानुसार या प्रकारच्या विकारामागे अनुवंशिकता आणि हार्मोनल बदल कारणीभूत होते. सेरोटोनिन आणि अ‍ॅनारोक्सिया यांच्या दरम्यान काही संबंध असल्याचे काही पुरावे देखील मिळाले आहेत. सेरोटोनिन हे मेंदूत आढळणारे रसायन आहे. या आजाराने पीडित व्यक्‍तीला वजन वाढण्याचे इतके भय असते की ती व्यक्‍ती जेवली तरीही लगेचच उलटी काढून ते जेवण बाहेर काढते किंवा शौचावाटे बाहेर टाकले जाते. अ‍ॅनारोक्सियाने ग्रस्त लोकांना समाजात मिसळायला आवडत नाही. ते एकांतप्रिय असतात. ते स्वतःला जगापासून वेगळे ठेवतात आणि लांब राहतात. आपल्या कुटुंबीयांबरोबर तसेच मित्रांबरोबरही वेळ घालवू इच्छित नाहीत. एखादी व्यक्‍ती जेव्हा आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल करते तेव्हा ती अ‍ॅनारोक्सियाची लक्षणे असतात.

एखादी व्यक्‍ती आपल्या वजनामुळे चिंताग्रस्त असेल आणि नियमित आपले वजन तपासून पाहात असेल तर ते देखील अ‍ॅनारोक्सियाचे लक्षण आहे. इतर लक्षणांमध्ये थकवा, केस गळणे, बद्धकोष्ठता, लघु रक्‍तदाब, चिडचिडा स्वभाव ही देखील लक्षणे आहेत. इटिंग डिसऑर्डर दोन प्रकारचे असतात. भूक असूनही वजन वाढेल या भीतीने रुग्ण जेवत नाहीत त्याला अ‍ॅनारोक्सिया नर्वोसा म्हणतात. तर एकाच वेळी भरपूर जेवण करून मग ते उलटी करून बाहेर काढणे याला बुलिमिया नर्वोसा म्हणतात. दोन्ही स्थिती या आरोग्यासाठी योग्य नाहीत. हा त्रास कमी वयापासून सुरू होतो. दीर्घकाळ ही स्थिती कायम राहिली तर ती घातक ठरते. दीर्घ काळापासून पीडित व्यक्‍ती आत्महत्याही देखील करण्याची शक्यता वाढते. यामुळे मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाईन नावाच्या रसायनांचे असंतुलन होते. त्यामुळे मनोविकार निर्माण होतात. ही विकृती कॉग्‍निटिव्ह बिहेवियर थेरेपीने बरी करता येऊ शकते.

अनेक अवयवांवर परिणाम –

हृदयसंबंधी समस्या: अनारोक्सियामुळे हृदयाची धडधड कमी होते, लघु रक्‍तदाब आणि हृदयाच्या स्नायूंचे नुकसान होते.

रक्‍ताची समस्या: अ‍ॅनारोक्सियाने ल्युकोपेनिया आणि अ‍ॅनिमियादेखील होऊ शकतो.

जठरांत्रसंबंधी समस्या: आतड्यांचे चलनवलन किंवा कार्य खूप कमी होते.

मूत्रपिंडाची समस्या: शरीरातील पाणी कमी झाल्याने अतिप्रमाणात मूत्र निर्माण होते, तसेच मूत्रनिर्मिती अधिक होते.

हार्मोनविषयी समस्या: विकासाशी निगडित हार्मोन्सची पातळी कमी असेल तर किशोरावस्थेदरम्यान विकासाचा वेग कमी होऊ शकतो.

Back to top button