बोलण्यातील समस्यांकडे दुर्लक्ष का? | पुढारी | पुढारी

बोलण्यातील समस्यांकडे दुर्लक्ष का? | पुढारी

डॉ. संतोष काळे

आपल्याकडे अजूनही मोठ्या प्रमाणावर मुलांच्या अडखळत किंवा स्पष्ट न बोलण्याकडे पालक लक्ष न देता वाढत्या वयाबरोबर हा प्रश्‍न सुटेल असाच विचार करतात; पण प्रत्येक वेळी असे होईलच, असे नाही. 

समाजात वावरताना ही समस्या असलेल्या व्यक्‍ती इतराच्या चेष्टेचा विषय झाल्याने त्यांच्या आत्मविश्‍वासात कमतरता येते; पण आता या प्रश्‍नाकडे पाहण्याचा लोकांचा द‍ृष्टिकोन बदलला आहे. अनेक लोकप्रिय व्यक्‍ती किंवा सेलिब्रिटी याविषयी सोशल मीडियातून व्यक्‍त होत आहेत. या समस्येने ग्रस्त मुलांची संख्या जास्त आहे; पण स्पीच थेरेपिस्ट हे फक्‍त शहरांमध्येच उपलब्ध असतात.

पाच प्रकारच्या समस्या :

बोलण्याच्या समस्या या पाच प्रकारच्या असतात. 

1) तोतरे बोलणे

2) अडखळणे किंवा स्पष्ट न बोलणे

3) ऐकण्यामध्ये दोष

4) भाषा समजणे आणि प्रत्त्युत्तर देणे

5) किरणोत्सर्गामुळे परिणाम (काही औषधांचा परिणाम होऊन आवाज जड होणे, घसा कायमचा बसणे, गळ्याच्या स्वरनलिकेमध्ये कर्करोग, स्वरनलिकेला त्रास इत्यादी कारणांमुळे ऐकण्यावर परिणाम होणे)

संभाषणातील पायर्‍या :

मुलांमध्ये बोलण्याच्या क्षमतेचा विकास होण्याच्या काही पायर्‍या असतात. त्याला डॉक्टरी भाषेत स्पीच माइलस्टोन असे म्हणतात. ज्यामध्ये तीन महिन्यांचे बाळ कुई, गुई असे वेगवेगळे आवाज काढते. त्यांच्या बोलण्यात क आण ग या अक्षरांचा जास्त उपयोग होतो. त्यानंतर सहा महिन्यांचे बाळ ओठांचा वापर करून बाबा, पापा, मामा यासांरखे शब्द बोलायला लागते. बाळ एक वर्षाचे झाल्यावर ते दादा, काका यांसारखे शब्द बोलायला लागते. दोन वर्षांचे बाळ हे काही छोटी वाक्ये बोलायला लागते. दोन दोन शब्दांचे समूह ते बोलते; पण या वयाचे बाळ जर इतपत बोलत नसेल, तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असते. स्पीच थेरेपीमुळे मुलांना बोलण्यास मदत होते. मुलाच्या वयानुसार त्याला ही थेेरेपी दिली जाते. 

वाढत्या वयातही होतो त्रास :

बर्‍याचदा मोठ्या वयातही बोलण्यातील अक्षमतेचा त्रास होतो. मोठ्या वयात अडखळणे, अस्पष्ट बोलणे हा त्रास होतो. बर्‍याचदा काही अपघातांमुळे डोक्यावर आघात झाल्यामुळे बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बर्‍याचदा हा त्रास लहानपणापासूनच होत असतो; मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यासाठी स्पीच थेरेपीचा उपयोग केवळ लहान मुलांनाच नाही तर मोठ्या माणसांनाही होतो. 

बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम करणारे इतर घटक :

काही लोकांना मेंदूशी निगडित असलेल्या त्रासामुळेही बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झालेला असतो. अशा व्यक्‍तींना स्पीच थेरेपी दिल्यास त्यांच्यात फरक पडल्याचे दिसून येते; पण त्यासाठी प्रबळ इच्छाशक्‍तीची गरज असते. इतर काही त्रास असतील तेव्हासुद्धा जसे ऑटिझम, अटेन्शन डेफिसिट, हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर, स्ट्रोक, तोंडाचा कर्करोग, गळ्याचा कर्करोग, मेंदूशी निगडित आजार जसे डिमेन्शिया, लकवा त्याचबरोबर काही आनुवंशिक कारणांमुळेही स्पीच डिसऑर्डर ही समस्या जाणवू शकते. 

मुलांना गाणी गोष्टी ऐकवा, गप्पा मारा :

हल्लीच्या काळात पालकांकडे मुलांना द्यायला वेळ नसतो. त्यामुळे मुलांना सतत टीव्ही आणि व्हिडीओ गेम्स दिले जातात. त्यातच मुलांचा वेळ कसा जातो, हे समजत नाही. या गोष्टी सतत पाहिल्यामुळे समजणे ही क्रिया मुलांना साध्य होते; पण त्यांच्याशी बोलत नसल्यामुळे त्यांच्यात बोलणे आणि भावनांचा विकास होत नाही. त्यासाठी पालकांनी मुलांशी सतत संवाद साधणे आवश्यक असते. त्यामुळे मुलांशी गप्पा मारणे, त्यांना गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे अशा गोष्टी केल्या पाहिजेत. लहान मुले बर्‍याचदा शब्द चुकीचे बोलतात किंवा बोबडे बोलतात, तेव्हा त्यांची नक्‍कल न करता त्यांना बरोबर शब्द कसा बोलायचा, हे शिकवणे गरजेचे आहे. 

शिक्षकांमध्ये सतर्कता हवी :

टीव्ही, रेडिओमध्ये काम करणार्‍या वृत्तनिवेदकांनाही बोलण्याशी निगडित प्रश्‍न भेडसावू शकतात. जास्त जोरात बोलल्याने घशातील स्वरयंत्राच्या विशिष्ट भागावर त्याचा ताण पडतो. त्यामुळे आवाजावर त्याचा ताण पडून आवाज खराबही होऊ शकतो. त्यामुळे आवाजाच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. गायन क्षेत्रातील लोकही उच्च आणि खालच्या आवाजात गाण्याचा रियाज करत असतात; पण कधी कधी गाताना आवाजावर जास्त जोर दिल्यास स्वरयंत्रावर त्याचा ताण पडू शकतो. त्यामुळे कार्यक्रमापूर्वी गायकांना सुरुवात करण्याआधी आवाजाचे काही व्यायाम करण्यास सुचविले जाते. त्यात श्‍वासोच्छ्वासाशी निगडित व्यायाम आणि मधल्या सुरात गायल्याने आवाजावर उत्तम नियंत्रण मिळवता येते. 

कसे केले जातात उपचार?

या समस्येवर गावपातळीवर उपचार करण्यासाठी स्पीच थेरेपिस्टची उपलब्धता जवळपास नाही. थेरेपिस्ट उपलब्ध असल्यासही त्याची माहिती पालकांना नसतेच. काही वेळेला महागड्या उपचारांमुळेही पालकांकडून असे उपचार घेणे टाळले जाते. बर्‍याचदा स्वयंसेवी संस्था आणि सरकारी दवाखाने यांनी सुरू केलेल्या संघटनांची या कामी बरीच मदत होते. अनेकदा मूल शाळेत गेल्यानंतर शिक्षक या प्रश्‍नाविषयी पालकांना माहिती करून देतात. त्यामुळेच ज्या बालकांना ही समस्या भेडसावते, त्यांना एकदा तरी डॉक्टरला दाखवणे गरजेचे आहे. कारण, बोलण्याच्या अक्षमतेमुळे इतर अनेक समस्या निर्माण होतात. उदा. एखाद्या बालकाला विशिष्ट कारणामुळे तोतरेपणाची समस्या भेडसावत असेल तर आणि त्याला वेगळेच उपचार दिले गेले तर त्याचा काहीच उपयोग झालेला दिसून येणार नाही. स्पीच थेरेपी देणारे डॉक्टर घरापासून लांब अंतरावर असतील तर डॉक्टर पालकांना काही दिवस प्रशिक्षण देतात. दिल्लीमध्ये पालकांना दहा दहा दिवसांचे प्रशिक्षण काही स्पीच थेरेपी सेंटर्समध्ये दिले जाते. एखाद्या वयस्कर व्यक्‍तीला ही समस्या भेडसावत असेल, तर लवकरात लवकर त्याची तपासणी तज्ज्ञ व्यक्‍तीकडून करून घ्यावी. 

काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक 

धूम्रपान केल्या जाणार्‍या जागी उभे राहणे टाळा. या धुरामुळे स्वरनलिकेचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते. 

अल्कोहोल किंवा कॅफेन असणार्‍या द्रवपदार्थांचे सेवन टाळा. शरीरातील पाण्याचे प्रमाण या पेयांमुळे कमी होते. त्यामुळे आवाज रूक्ष आणि कोरडा होतो. 

ज्या ठिकाणी खूप जोराने ओरडावे किंवा बोलावे लागेल अशा ठिकाणी जाण्याचे टाळा.  श्‍वसनाशी संबंधित व्यायाम करा. 

अतिथंड आणि कोरड्या जागी बसून काम करण्याचे टाळा. त्यामुळे कफप्रवृत्ती वाढण्यास आळा बसेल. 

खूप तेलकट, तळलेले पदार्थ खाऊ नका. त्यामुळे घशाला संसर्ग होतो. 

जर आपले काम खूप बोलणे किंवा संवादाचे असेल, तर दिवसातला काही वेळ शांत बसा, घशाला आराम द्या. 

संगणकावर काम करताना पुढच्या बाजूला झुकून बसू नका. त्यामुळे गळ्याच्या किंवा घशाच्या पेशींवर अतिरिक्‍त ताण येतो. 

लहान मुलांकडून रोज दहा ते पंधरा मिनिटे मोठ्याने वाचन करण्याचा अभ्यास करवून घ्या. )

Back to top button