अवयवदान – एक श्रेष्ठ दान  | पुढारी

अवयवदान - एक श्रेष्ठ दान 

डॉ. दीपा फिरके

दर वर्षी भारतात सुमारे पाच लाख रुग्ण अवयवांचे प्रतीक्षेत दगावतात. यातील सुमारे दोन लाख रुग्ण यकृताच्या आजाराने, तर सुमारे 50 हजार हृदयाच्या आजाराने बाधित असतात. प्रतिवर्षी साधारणपणे दीड लाख रुग्ण मूत्रपिंड निकामी झाल्याने किडनी दात्याच्या प्रतीक्षेत असतात; परंतु केवळ पाच हजार रुग्णांना किडनी प्रत्योरोपणाचा लाभ मिळतो. हे प्रमाण इतर देशांच्या मानाने खूपच अत्यल्प आहे. 

130 कोटी जनसंख्येच्या या विशाल देशामध्ये अवयवदात्यांचे प्रमाण केवळ 0.08 व्यक्‍ती दशलक्ष जनसंख्या इतके क्षुल्लक आहे. हेच प्रमाण इतर देशांमध्ये 10-30 च्या घरात आहे. यासाठी देशभरात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. 13 ऑगस्ट हा जागतिक अवयवदान दिवस म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातून याबाबत जनजागृती केली जाते. 

अवयवदान म्हणजे काय?

एखाद्या व्यक्‍तीचा मेंदू काही अपघाताने वा आजाराने कायमचा निकामी झाला म्हणजेच मृतावस्थेत (लीरळप वशरव) गेल्यावर अशा व्यक्‍तीचे अवयव प्रत्यारोपणासाठी दान करता येतात. यालाच अवयवदान असे म्हणतात! अशा व्यक्‍तीची फुफ्फुसे, मूत्रपिंड, रक्‍तवाहिन्या, हृदयाच्या, स्वादुपिंड, यकृत, त्वचा या अवयवांचे दान करता येते.

अवयवदान कसे करतात?

रक्‍तदान, वीर्यदान, स्त्रीबीजदान, त्वचा व किडनी दान हे जिवंतपणी करता येते; मात्र अवयवदान हे मेेंदू मृतावस्थेत गेल्याची खात्री झाल्यानंतर बाकीचे अवयव कृत्रिम श्‍वासोच्छ्वास मशिनच्या व औषधाच्या साहाय्याने जिवंत स्थितीत असताना कुटुंबातील जबाबदार व्यक्‍तींच्या सहमतीने करता येते.

मृत मेंदू म्हणजे काय?

अपघात किंवा आजाराने मेंदू जेव्हा निकामी होतो आणि तो पूर्वस्थितीवर येणे शक्य नाही, याची खात्री तज्ज्ञ डॉक्टरांकडून 6 तासांच्या अंतराने 2 वेळा केली जाते. अशी व्यक्‍ती पुन्हा जागृत अवस्थेत येऊ शकत नाही व त्यांना कृत्रिम श्‍वासोच्छ्वास देण्याची गरज भासते. अशा व्यक्‍तीस लीरळप वशरव असे म्हणतात; परंतु अशा व्यक्‍तीचे हृदय व इतर अवयव कृत्रिम श्‍वासोच्छ्वास मशिनच्या व औषधांच्या साहाय्याने काही काळ जिवंत राहू शकतात.

अवयवदानाची प्रक्रिया काय असते?

तज्ज्ञ डॉक्टरांकडून एखादी व्यक्‍ती ब्रेन डेड असल्याची खात्री झाल्यानंतर, अशा रुग्णांच्या जबाबदार नातेवाईकांना अवयवदानाची संमती देणे आवश्यक आहे. यानंतर शल्यचिकित्सक व भूलतज्ज्ञांची टीम हे अवयव सुस्थितीत काढून घेतात. यामुळे रुग्णाला कोणतीही विद्रूप अवस्था येत नाही.

हे अवयव कमी तापमान व जंतूविरहीत अवस्थेत ठेवून ‘ग्रीन कॉरिडॉर’ या यंत्रणेतून पोलिस व परिवहन खात्याच्या साहाय्याने वितरित केले जातात. या अवयवांचे कायदेशीर वितरण झोनल ट्रान्स्प्लांट कोऑरडिनेशन सेंटर (ZTCC) मार्फत, मानवी अवयव प्रत्यारोपण नियम 1994 व इतर शासकीय नियमानुसार ज्या रुग्णांना प्राधान्याने अशा अवयवांचे गरज आहे, अशांना केले जाते. 

अवयवदान कोण करू शकतो?

यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही. अल्पवयीन मुलांच्या बाबतीत त्यांच्या पालकांच्या संमतीची गरज असते. जंतुदोष, कर्करोगाने व एचआयव्ही बाधित रुग्णांचे अवयवदान करता येत नाही.

अवयवदानाविषयी कायदेशीर बाबी

1994 साली मानवी अवयवदान व प्रत्यरोपणाचा कायदा अस्तित्वात आला. यानुसार मेंदू मृतावस्थेत असलेल्या रुग्णांचे अवयवदान हे शासनमान्य रुग्णालयामध्येच व विहीत नमुन्यामध्ये नातेवाईकांची संमती घेऊनच करता येते. तसेच अवयवदानाचा कोणताही मोबदला दात्याला किंवा त्याच्या नातेवाईकाला मिळत नाही. अवयवांची विक्री करणे हा दंडनीय गुन्हा आहे. 

एक अवयव दाता 8 प्राण वाचवू शकतो आणि 35 जणांच्या आरोग्याचा दर्जा उंचावू शकतो. म्हणूनच, कोणत्याही दानापेक्षा अवयवदान हे एक महान व पवित्र दान आहे. आपल्या जवळच्या व्यक्‍तीच्या मरणाचे दुःख असीम असते; परंतु या जगाचा निरोप घेताना दुसर्‍याचे जीवन प्रकाशित करता आले तर यासारखे दुसरे पुण्य नाही! म्हणूनच म्हणतात,

‘मरवे परी अवयव रूपी उरावे.’

 

Back to top button