तरुणपणातील हृदयनिगा का गरजेची ? | पुढारी

तरुणपणातील हृदयनिगा का गरजेची ?

म्हातारपणी नीट जगायचे असेल तर त्यासाठी तरुणपणीच काळजी घ्यावी, असे आपल्याकडे म्हटले जाते. थोडक्यात, तरुणपणी आहार योजना, जीवनशैली शिस्तशीर ठेवली की, म्हातारपण आरामात पार पडते. तरुणपणी सेवन केलेल्या आहाराचा फायदा म्हातारपणी होतो, असे ज्येष्ठ लोक म्हणत. त्याला आता अमेरिकेतील संशोधनाने दुजोरा दिला आहे. अमेरिकेत या विषयीचा एक अभ्यास प्रकाशित झाला. त्यानुसार तरुणपणातील आरोग्यदायी आहार हा म्हातारपणातील हृदयाचे रोग दूर ठेवतो. 

तरुणपणी शरीराकडे लक्ष द्याल तर म्हातारपणी ते आपल्याला साथ देईल, असे घरातले ज्येष्ठ लोक म्हणायचे. ते खरेही आहे. म्हातारपणी एकूणच क्षमता कमी होते. त्यामुळे तरुणपणी ज्यांचे शरीर भक्‍कम असते, त्यांना म्हातारपण सुलभ जाते. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या व्यक्‍ती तरुणपणी जास्तीत जास्त फळे, भाज्या सेवन करतात, त्यांना वार्धक्यात हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी असतो. 

अमेरिकेत 30 वर्षांपर्यंतच्या 2500 हून अधिक तरुण व्यक्‍तींचा अभ्यास केला गेला. हा अभ्यास मिनेसोटामधील एका हार्ट इन्स्टिट्यूटने केला. आतापर्यंत हृदयविकाराविषयी जे अभ्यास करण्यात आले, ते म्हातार्‍या माणसांच्या आहार आणि आजार याविषयी होते; परंतु तरुणपणातील आहाराचा अनेक वर्षांनंतर म्हातारपणी काय परिणाम होतो त्याविषयी थेट अभ्यास झालेला नव्हताच. 

संबंधित बातम्या

संशोधन कसे झाले? : 30 वर्षांपूर्वी 1985 मध्ये अभ्यासकांनी 18 ते 30 वर्षे वयोगटातील तरुणांची आहारशैली आणि इतर आरोग्यविषयक माहिती गोळा केली. हा अभ्यास दीर्घ काळ सुरू होता आणि त्यात सुमारे 2506 सहभागींचे फळे आणि भाज्या सेवन करण्याच्या आधारावर तीन समूहात विभाजन केले होते. सर्वात पहिल्या समूहात असे तरुण सहभागी होते, जे रोज सर्वसाधारणपणे 7 ते 9 वेळा भाज्या आणि फळे सेवन करतात. तर तळाच्या शेवटच्या समूहात दिवसातून दोन-तीन वेळा फळे, भाज्या खाणार्‍या तरुणांचा समावेश केला गेला. 

2005 मध्ये या सहभागींच्या हृदय धमन्यांचा सीटी स्कॅन करण्यात आला आणि त्याची माहिती एकत्रित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी तपासणी केल्यानंतर, जे तरुण दोन-तीन वेळा फळे आणि भाज्या सेवन करत होते. त्यांच्या तुलनेत 7 ते 9 वेळा भाज्या खाणार्‍या व्यक्‍तींच्या धमन्यांमध्ये 26 टक्के कमी ब्लॉकेजेस आढळून आली. या संशोधनातून प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार फळे आणि भाज्या यांचा समावेश असलेला आहार कार्डियोव्हॅस्क्युलर आजारांपासून व्यक्‍तीच्या संरक्षणाचे काम करते. 

हृदयस्नेही आहार :

हृदयरोग पूर्वी म्हातारपणी होताना आढळायचा; मात्र सध्या होणार्‍या मृत्यूंमध्ये सर्वाधिक कारण आहे ते हृदयरोगाचे. हृदयविकाराचा झटका कोणालाही, कोणत्याही वयात येऊ शकतो, हे समोर आले आहे; पण हृदयाची काळजी घेतल्यास हृदयविकार किंवा हृदयविकाराचा झटका येणे टाळता येईल. धकाधकीच्या जीवनात सर्वात दुर्लक्ष होते ते हृदयाकडे. कसे तर आहाराकडे होणार्‍या दुर्लक्षामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे. हृदयाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. 

ओटमील : आपल्या दिवसाची सुरुवात करताना आरोग्यदायी आहारापासून करायची असेल तर ओटमील हा पर्याय उत्तम आहे. ओटमीलमध्ये खूप अधिक प्रमाणात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, फोलेट आणि पोटॅशिअम असते. तज्ज्ञांच्या मते हृदयासाठी ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड खूप फायदेशीर असतात. त्यात तंतुमय पदार्थांचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे एलडीएल म्हणजेच बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी खूप कमी राहते आणि हृदयाच्या धमन्या सुरक्षित राहाण्यास मदत होते. 

ऑलिव्ह तेल : मोनोसॅच्युरेटेड फॅट्सने युक्‍त ऑलिव्ह तेलामुळे वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. त्यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी असतो. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह तेल आरोग्यासाठी अधिक चांगले असते. 

सुकामेवा : अक्रोड, बदाम यासारख्या सुकामेव्यात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड असते. सुकामेवा सेवन केल्यास शरीराला फायबरही मिळते. ऑलिव्ह तेलाप्रमाणे सुकामेवादेखील आरोग्यदायी मेदाचा उत्तम स्रोत आहे. 

कडधान्ये : राजमा, मूग, मटकी यांचा समावेश आहारात करावा. त्यामुळे तंतुमय घटक मिळतीलच; शिवाय ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडही मिळेल. तसेच यामध्ये विरघळणारे तंतुमय घटक आणि कॅल्शियमदेखील असते. 

अळशी किंवा जवस : तेलबिया असणारे जवस आपण चटणी स्वरूपात आहारात सामील करू शकतो. हृदयासाठी जवस खूप प्रभावी असतात. त्यात तंतुमय पदार्थ आणि ओमेगा 3 तसेच ओमेगा 6 फॅटी अ‍ॅसिड्स असतात. ओटमीलची न्याहारी करताना त्यात भाजलेले जवस किंवा जवसाची पावडर मिसळा. त्यामुळे ओटमीलचा पौष्टिकपणा अधिक वाढेल. 

वरील गोष्टींचा समावेश करून हृदयासाठी आवश्यक असा पौष्टिक आहार तरुणपणातच सेवन केला आणि त्याबरोबर नियमित व्यायामाची जोड त्याला मिळाली, तर हृदयाचे आरोग्य आपण नक्‍कीच चांगले राखू शकतो.  

Back to top button