विपुलगुणी एरंड | पुढारी | पुढारी

विपुलगुणी एरंड | पुढारी

डॉ. प्राजक्‍ता पाटील

तिखट, तीक्ष्ण, उष्ण, गोड, कडू, वृष्य, जड, स्वादू, सारक अशा गुणधर्मांनी युक्‍त असलेली एरंड ही वनस्पती अतिशय बहुगुणी म्हणावी अशीच! या वनस्पतीची फुले, साल, मुळी व लाकूड असे सर्व काही अत्यंत उपयुक्‍त आहे. अंगाला लावण्यासाठी, पोटात घेण्यासाठी, डोके व तळपायांना शांत करण्याकरिता हे तेल अवश्य वापरतात.

एरंडेल तेलाच्या दिव्यानेसुद्धा डोळ्यांना थंडावा येतो, असे म्हणतात. एरंडाचे कोळसेसुद्धा म्हणे काही प्रमाणात मसाल्यात घालतात. एरंडाच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांमुळेच त्याचा असा बहुपयोगी वापर होत असावा. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर वातरोग, उदावर्त, कफ, ज्वर, खोकला, उदर, सूज, शूळ, कंबर, बस्ती, मस्तक यातील शूल, कोड, गुल्म, प्लीहा, आम्लपित्त, प्रमेह, उष्णता, वातरक्‍त, मेद, वृषण वृद्धी, रक्‍तदोष, अरुची, कृमी, अर्श, मूत्रकूच्छ यांचा नाश करण्यासाठी उपयुक्‍त गुण एरंडात आहेत.

संबंधित बातम्या

अनेक व्यक्‍तींना बिछान्यावर पडल्यानंतर ताबडतोब झोप लागत नाही. डोके गरम राहते. टाळूचा भाग गरम होतो. डोक्यावर घण मारल्यासारखे होते. सारखे डोके दुखत असते. चैन पडत नाही. विचार मालिका सुरू झाली म्हणजे झोप अजिबात येत नाही. असा त्रास होणार्‍या व्यक्‍तींनी रोज डोक्यास व तळपायास सावकाशपणे एरंडेल तेल काशाचे पात्राने चोळून तेल जिरवावे व तळपायांनाही तेल लावावे व डोके, तळहात व तळपाय यांना एरंडाचे पान बांधावे. ही गोष्ट सातत्याने व्हावी. असे सांगतात, की गुण खात्रीने येतो.

एरंडाचा काविळीवर फार चांगला उपयोग होतो. सर्व शरीर पिवळे झाले आहे. डोळे पिवळे आहेत, नखे पिवळी झाली. थोडाफार ताप येत असेल, यकृताची वाढ झाली आहे, अशा वेळी एरंडाच्या पानाचे कोवळे मोख व मेंदीचा पाला एकत्र वाटून तो दुधात मिसळावा ते दूध रोज सकाळी व सायंकाळी घ्यावे अगर एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज प्यावे किंवा गोड्या एरंडाची पाने बारीक वाटून त्याची साधारण बोराएवढी गोळी करून दुधात कालवून घ्यावी. अथवा एरंडाच्या पाल्याचा रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ दुधाबरोबर घ्यावा.

काही व्यक्तींना सारखा श्‍वास लागतो. चावत नाही. छाती भरल्यासारखी वाटते. चढण चढवत नाही. अशावेळी एक पट एरंडेल तेल, दुप्पट मध एकत्र करून घेतले असता बरे वाटते. सर्वच दमेकर्‍यांना हे औषध उपयोगी पडते. त्यामुळे कोठा साफ होतो व मलाची शुद्धता झाली म्हणजे श्‍वास कमी होतो. तसेच जुन्या संधिवाताचा त्रास असेल तर तोळाभर एरंडमूळ, थोडे कुटून अर्धा लिटर पाण्यात अष्टमांश काढा करावा. तो गाळून त्यात अर्धा चमचा मध टाकून ते प्यावे. त्याने सांध्याची सूज कमी होते. एरंडाची पाने वाटून गरम करून सुजेवर बांधावी किंवा आस्कंदाचे वस्त्रगाळ चूर्ण पावलीभार, सांजसकाळ 3 मासे तुपातून, चारच दिवस घ्या. संधिवाताचे दुखणे आटोक्यात येईल.

जर पोटात बारीक बारीक व राहून राहून दुखत असेल तर, भूक लागत नाही, अन्‍नाचे पचन होत नाही, अस्वस्थता वाटते. अपचन, करपट ढेकर, अन्‍नावर वासना नसते अशा वेळी एरंड मुळाचा काढा एक अष्टमांश करावा व त्यामध्ये हिंग, पादेलोण व सुंठीची पूड घालून निदान चार सप्‍तके द्यावा.

सांध्यांना विंचवाने दंश करावा अशा वेदना होत असतील, हातापायाची हालचाल होत नसेल, सांध्यांना सूज असेल, चालता येत नसेल, ऊठता बसता येत नसेल, थोडा ताप, कष्ट सहन होत नसतील, अशा वेळी रोज सकाळी रात्री अर्धा तोळा ते एक तोळा एरंड तेल ज्वारीच्या पिठात घालावे व त्याची भाकरी करून दिवसातून दोन्ही वेळा खावी. एरंड तेल एरंडाच्या पानास लावून दुखीच्या सांध्यांना ही पाने बांधावी, हातापायाची हालचाल नियमित व्हावी. जितके फिरता येईल तितके फिरावे. संधिवात अगर आमवात दोन्हीही बरे होण्यास फार मोठी मदत होते.

काही जणांची कंबर वाकता येत नाही. पाठही दुखत असते, कोणत्याही परिस्थितीमध्ये ते कमी होत नाही. चालताना चमका मारतात. अशा वेळी एरंडमूळ व सुंठ यांचा काढा करावा. या काढ्यामध्ये दोन ते तीन गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा शूल थांबतो.

बर्‍याचदा कुणाकुणाच्या अंगावर बारीक पुरळ उठते, खाज सुटते, अंगावर गजकर्ण, नायटे उठलेले असतात. अशा वेळी एरंडतेल एक चमचा, दोन चमचे तूप व एक चमचा मध एकत्र करून पोटात देत जावे. एरंडाच्या सालीचा गंध अंगास लावावे. अगदी अपवादाने पण काही व्यक्‍तींच्या गळ्याभोवती गाठी ऊठतात. त्या गाठी ओळीने येतात. क्वचितप्रसंगी त्या गाठी पिकतात. पिकण्यापूर्वी त्यास एरंडमूळ, शेवग्याचे मूळ, पळसाचे मूळ, गोमूत्र अगर तांदळाचे धुण्यात उगाळून लेप करावा व त्यावर एरंडाचे पान बांधावे. रोज नियमाने ही गोष्ट करत जावी.

कधी कधी हात, पाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. कंबरेपासून जड वाटते, पोट मोठे होते. अशावेळी ताजे गोमूत्र एक कप गाळून घ्यावे व त्यात दोन तोळे एरंडेल तेल घालून रोज घेत जावे म्हणजे जुलाब होऊन पोट साफ राहते व उदर बरा होण्यास मदत होते.

एरंडाचा उपयोग वृषणवृद्धीच्या त्रासासंदर्भानेही होतो. काहीवेळा वृषणाची वृद्धी होते व हवेने भरलेल्या पिशवीसारखे वृषण लागते. या अवस्थेत सुरुवातीस एरंडेल तेलाचे सावकाश मसाज करावे व एरंडास पानतूप लावून वृषणास बांधून घट्ट पट्टा अगर लंगोट घालावा.

काहीजणांचे नाक ओढल्यासारखे होते. नाकातून वारंवार पांढरा अगर धुम्रवर्ण कफ निघतो. श्‍वासाला दुर्गंधी येते. नाकातून रक्‍त पडते. वास येत नाही. अशा वेळी एरंडेल तेल व थोडे तूप एकत्र करून नाकात वरचेवर घालत जावे. काहींच्या डोळ्यात खुपर्‍या असतात. डोळे लाल होतात. पाणी येते. चिकटतात. लाल एरंडाचा चीक डोळ्यात घालीत जावा. शरीरामध्ये होणार्‍या कोणत्याही शुलावर एरंडाचा युक्‍तीने उपयोग करावा.

पोटासंबंधी कोणत्याही विकारावर एरंडेल तेल हे एक रामबाण औषध आहे. अगदी लहान मुलांना (जन्माला आलेल्या बालकालासुद्धा) मध आणि एरंडेल तेल देतात. हे अत्यंत चांगले रेचक आहे. इंजिनाला ज्याप्रमाणे तेल घालून साफसूफ करतात त्याप्रमाणे एरंडेल तेलाच्या विरेचनाने साध्य होते.

पुष्कळवेळा छातीत दुखण्याच्या तक्रारी असतात. सारखे बारीक छातीत दुखत असते. क्वचित बारीक कळा येतात. हे सर्व पोटातील वायूमुळे होण्याचा संभव बर्‍याच वेळा असतो. यावेळी एरंडाचा प्रथम जुलाब घ्यावा. नंतर एरंडमुळाचा काढा दोन गुंजा जवखार घालून देत जावा. गर्भारशीबाईने नियमितपणे एरंड तेल निदान चार दिवसांनी तरी घेत जावे. यामुळे सुलभ प्रसूती होते. अनेक वेळा थंडीने किंवा उष्णतेने ओठांना भेगा पडतात. भेगा तडतडतात, रक्‍त येते. अशावेळी रात्री एरंड्या बारीक वाटून त्यात थोडे दूध घालावे व ते मिश्रण ओठांना लावावे. भेगा मऊ पडून आराम वाटतो. न सांगता येण्याजोगा गळवांचा त्रास अनेकांना होतो. ती लवकर फुटत नाहीत. अशावेळी गळवावर एरंडाची मुळी पाण्यात उगाळावी व गरम करून गळवावर लेप द्यावा. लेप सुकला म्हणजे एरंडाचे पान वर बांधावे. आराम वाटतो.

 

Back to top button