शरीरातील चरबी विद्राव्य जीवनसत्त्वांचे महत्त्व | पुढारी

शरीरातील चरबी विद्राव्य जीवनसत्त्वांचे महत्त्व

मयुरा अ. जाधव, वाचस्पतीविधिज्ञ  

ॐ नम:सूर्याय शांताय सर्वरोग निवारिणे।आयुरारोग्य ऐश्‍वर्यम् देहि देव: जगत्पते:॥(सूर्य संहिता 14) अर्थात; हे सूर्यदेव तुम्ही विश्‍वाचे अधिपती आहात. प्रात:समयी दर्शनाने सर्व व्याधींपासून मुक्‍ती मिळून असीम मनशांती अनुभवास मिळते. मी तुम्हाला नमन करते. कृपया आपल्या भक्‍तांना दीर्घायुष्य, आरोग्य आणि संपत्तीचा आशिर्वाद द्यावा.

आहारशास्त्राच्या प्रगतीमधील सर्वात नाट्यपूर्ण घटना म्हणजे शरीर नियंत्रक ‘जीवनसत्त्वांचा शोध’! आजमितीला चरबीत विद्राव्य असलेली फॅट सोल्युबल व्हिटॅमिन चार, पाण्यात विद्राव्य असलेले ‘सी’जीवनसत्त्व आणि ‘ब’गटातील अकरा अशा एकूण सोळा जीवनसत्त्वांची माहिती उपलब्ध आहे. याशिवाय अनेक जीवनसत्त्वांंच्या संशोधनाचे कार्य रॉकेटच्या गतीने चालू आहे. जीवनसत्त्वे ही वाढीसाठी आणि आरोग्य राखण्यासाठी अत्यल्प प्रमाणात आवश्यक असलेली सेंद्रिय संयुगे आहेत.स्वाभाविक अन्‍नपदार्थात ती अतिसूक्ष्म प्रमाणात आढळतात. सर्व प्राणिमात्रांना जीवनसत्त्वांची आवश्यकता असते.‘जीवनसत्त्व’हे नाव धारण करणारे विविध पदार्थ शरीरकार्याच्या आणि रासायनिक रचनेच्या द‍ृष्टीने एकमेकांपासून फार वेगळे आहेत. यातील काही जीवनसत्त्वे ऑक्सिकरण प्रक्रियेसाठी आवश्यक आहेत तर काही उपलेपक पेशीजाल, अस्थीतील संयोगी पेशीजाल व कूर्चा यांचे सातत्य टिकवण्यासाठी आवश्यक आहेत. सर्वच जीवनसत्त्वे ही गतिवर्धक, परंतु स्वत: रासायनिक प्रक्रियेत भाग न घेणारे पदार्थ म्हणून कार्य करतात. यांच्या अभावाने शरीरातील अखंड अन्‍न ज्वलन व पचन, पुनर्निमाण प्रक्रियेतील महत्त्वाचा दुवा गळतो आणि संबंध शरीराला दुष्परिणाम जाणवतात. यासाठी फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्सचे इन ह्युमन बॉडीचे महत्त्व जाणून घेऊया.  

संबंधित बातम्या

जीवनसत्त्व ‘अ’चे कार्य, दैनंदिन गरज व अन्‍नाचा स्रोत : ‘अ’ जीवनसत्त्व हे डोळ्यातील द‍ृष्टी ज्ञानपटात असलेल्या व्हिज्युअल पर्पलचा महत्त्वाचा घटक आहे.नाक, घसा, श्‍वासोच्छ्वास व पचनसंस्थेच्या आतील श्‍लेष्मल आवरण आणि मूत्र व जननमार्गातील श्‍लेष्मल आवरणाचे आरोग्य ‘अ’ जीवनसत्त्वावर अवलंबून असते. निरोगी प्रजोत्पादन आणि बाळंतपणात या जीवनसत्त्वाचा अधिक पुरवठा करणे आवश्यक आहे. याच्या अभावाने रातआंधळेपणा, प्रखर प्रकाशातील आंधळेपणा होतो. त्वचा कोरडी, खरखरीत बनते. या जीवनसत्त्वाचा संचय शरीर फार मोठ्या प्रमाणात यकृतात करते. स्त्रियांना 5000 इंटरनॅशनल यूनिटस् प्रतिदिन आवश्यकता असते. माशाची यकृते, अंडी, लोणी, तूप यात हे जीवनसत्त्व मिळते. तसेच कोथिंबीर, कढीलिंबू, हिरव्या भाज्यांच्या पर्णपीतकात आढळते. याशिवाय पिवळी अन्‍नधान्ये, सुरण, रताळी, गाजर ही कंदमुळे आणि आंबा, पपई ही फळे उत्कृष्ट पदार्थ आहेत. अधिक उष्णता, वाळविणे आणि हवेच्या संपर्काने ‘अ’ जीवनसत्त्व नष्ट होते ही गोष्ट आहार बनविताना लक्षात घ्यावी. 

जीवनसत्त्व ‘ड’ चे कार्य, दैनंदिन गरज व अन्‍नाचा स्रोत :

‘ड-2’ व ‘ड-3’ हे सर्व पदार्थ रासायनिक परिणामाच्या द‍ृष्टीने एकमेकांशी निकट असल्यामुळे या सर्व पदार्थांना ‘ड’ या नावाने निर्देश करतात. त्वचेच्या पृष्ठभागावर ‘ड-3’ या स्निग्ध पदार्थाचा स्त्राव होत असतो. त्वचेवर सूर्यकिरण पडल्यावर यातील काही भागाचे रूपांतर ‘ड-3’जीवनसत्त्वात होते. हे जीवनसत्त्व रक्‍तात शोषिले जाऊन संबंध शरीराला पुरविले जाते. मुडदूस झालेल्या मुलाला विवस्त्र करून सकाळच्या कोवळ्या उन्हात बसवितात. ‘ड’जीवनसत्त्वाच्या तात्पुरत्या दैनंदिन गरजा भागून जे शिल्लक राहाते. त्याचा संचय शरीरात यकृत, चरबीयुक्‍त पेशीतील फुफ्फुसे, प्लिहा व मेंदूत होतो. अस्थी व दातांच्या योग्य वाढीसाठी खट व स्फूर हे दोन क्षार समतोल प्रमाणात असणे आवश्यक असते. या दोन क्षारांच्या चयापचयन क्रियेवर व विनियोगावर ‘ड’ जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. याच्या कमतरतेमुळे हाडे व दात मऊ, लिबलिबित आणि कमजोर बनून सांगाड्यात विकृती येते. स्त्रियांना अरूंद कंबर झाल्यामुळे बाळंतपणाच्या वेळी त्रास होतो. स्त्रियांना 600 इंटरनॅशनल यूनिटस् ‘ड’ जीवनसत्त्व प्रतिदिन आवश्यक असते.

साय, लोणी, अंडी व यकृतात ते थोड्या प्रमाणात असते.म्हणून कृत्रिमरीत्या तयार केलेले समृद्ध अन्‍नपदार्थ कॅल्शिफेरॉल आणि माशांच्या यकृतातील तेलावर आपल्याला अवलंबून रहावे लागते. ही दोन्ही जीवनसत्त्वे उष्णतेला स्थिर आहेत; पण ही ऑक्सिडेशनमुळे नष्ट होतात. पन्हाळ्याला ट्रेकिंगला गेलो असता रेखा पाय घसरून पडली. तिचा घोटा फ्रॅक्चर झाला. डॉक्टरांनी पायाला प्लास्टर घातले. हाड मोडण्याचे कारण शरीरात कॅल्शियम व ‘डी’ जीवनसत्त्वाची कमी आहे, असे रिपोर्टमुळे समजले. रेखा म्हणाली,‘अ स्टीच इन टाईम सेव्ह नाईन’ या म्हणीनुसार चाळीशीनंतर स्त्रियांनी अस्थिरोग, नेत्ररोग, दंतरोग, हामोन्स तज्ज्ञ इ. सर्जनकडून  नियमित चेकअप करणे आवश्यक असते. मयुरा मॅडमचे हे अनुभवसिद्ध बोल मी वेळीच ऐकले असते तर आज मी हॉस्पिटलऐवजी घरी असते.’

जीवनसत्त्व ‘इ’चे कार्य, दैनंदिन गरज व अन्‍नाचा स्रोत : जीवनसत्त्व ‘इ’मुळे केस काळेभोर व निकोप वाढतात. त्वचा तजेलदार राहते. प्रजोत्पादन आणि स्नायू पेशीजालांना कार्यक्षम राखते. बीटा, गॅमा, डेल्टा, टोकोफेरॉल यांना ‘इ’ जीवनसत्त्व या नावाने निर्देश करतात. याच्या अभावाने नर उंदरात वंध्यत्व आणि मादीत गर्भशोषण होते. वनस्पती तेले, अन्‍नधान्ये, पालेभाज्या, मांस आणि दूध यात हे सापडते. अतिनील किरणांच्या उत्सर्गाने व खवटपणाने नष्ट होते. स्त्रियांना 100 इंटरनॅशनल यूनिटस् प्रतिदिन आवश्यकता असते.

जीवनसत्त्व ‘के’चे कार्य, दैनंदिन गरज व अन्‍नाचा स्रोत :

याचे मुख्य कार्य यकृतात प्रोथ्राँबीन नावाच्या प्रकिण्व निर्मितीला मदत करणे. शरीरात जखम झाल्यावर रक्‍त गोठून रक्‍तस्त्राव थांबण्यासाठी प्रोथ्राँबीनची आवश्यकता असते. आहारात असूनसुद्धा यकृतामधून आतड्यात पित्तरसाचा स्त्राव नीट न झाल्यास अभिशोषणात अडथळे आल्यामुळे याचा अभाव शरीरात जाणवतो. निसर्गात ही ‘के 1’ व ‘के 2’ या दोन अवस्थेत आढळतात. पालेभाज्या विशेषत: पालक, अंड्याचे बलक, सोयाबीन यामध्ये हे विपुल असते. कृत्रिमरीत्या ही दोन्ही जीवनसत्त्वे आणि तत्सम पदार्थ रसायनशास्त्रज्ञांनी तयार केली आहेत. याचे नाव मेनॅडिऑन आहे. तो पाण्यात विद्राव्य असल्याने ‘क’ जीवनसत्त्वापेक्षा अधिक प्रभावी आहे. तीव्र अल्क, आम्ल पदार्थांशी संपर्क झाल्यास ते नष्ट होते.

स्त्रियांना 80 एमसीजी प्रतिदिन आवश्यकता असते. वरील सर्व जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहार रोज बनविणे व वेळेवर खाणे अवघड असते. शरीराला निरोगी राखायचे असेल तर रोज जीवनसत्त्वांचा पुरवठा करायला हवा. ती आहारातून मिळाली तर उत्तमच! तसेच सूर्यप्रकाश, सप्लिमेंट, त्वचेला लावण्यात येणारी ब्यूटिक्रिम्स व तेलातून मिळाली याच्याशी शरीराचा काही संबंध नसतो. म्हणून क्रियाशील व व्यायाम करणार्‍या स्त्रिया डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रोज जेवणाबरोबर एक मल्टिव्हिटॅमिनची गोळी खातात आणि जीवनसत्त्वांची कमतरता भरून काढतात. जिमफ्रेंडस् अँड एक्सरसाईज आर मेडिसिन फॉर अ वंडर्ड हार्ट अँड व्हिटॅमिन्स फॉर अ होपफूल सोल…!!!

 

Back to top button