का होते अ‍ॅलर्जी? | पुढारी | पुढारी

का होते अ‍ॅलर्जी? | पुढारी

डॉ. मनोज कुंभार

एखादा पदार्थ शरीर स्वीकारत नाही; कारण तो शरीराला सोसवत नाही. त्याचा प्रतिकार केला जातो आणि त्याचे परिणाम अ‍ॅलर्जीच्या स्वरूपात शरीरात दिसतात. अ‍ॅलर्जीचे निदान वेळीच केले, तर या त्रासापासून स्वत:ला नक्कीच दूर ठेवता येते. मात्र, त्यासाठी नेमकी कोणत्या पदार्थांची अ‍ॅलर्जी आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्कीच उपयुक्त ठरतो. 

एखाद्या समारंभासाठी आपण नटून-थटून जातो, हौसेने एखादा आकर्षक पण खोटा दागिना घालून जातो आणि अर्ध्या-एक तासानंतर मान, गळा, कान खाजायला सुरुवात होते, त्वचा लाल होते. काही वेळेला त्वचेवर बारीक पुरळ उठतात. काहीजणांना एखादे औषध घेतल्यानंतर त्वचेवर लाल गाठी येतात, उलट्या होतात, असे कितीतरी प्रकार आपण ऐकत असतो. यासारख्या गोष्टीला कारण असते, ते म्हणजे ‘अ‍ॅलर्जी.’ 

संबंधित बातम्या

अ‍ॅलर्जी हा शब्द आपण नेहमीच ऐकत असतो. एखाद्या वस्तूची, पदार्थाची, कशाचीही अ‍ॅलर्जी असू शकते. अ‍ॅलर्जीची व्याख्या करायची झाल्यास, “निरूपद्रवी’ वाटणार्‍या पदार्थांविरुद्ध शरीराने दाखविलेली प्रतिकारक्षमता,’ अशा प्रकारे करता येईल. जे पदार्थ किंवा ज्या गोष्टी आपल्या शरीरात सोसत नाही, त्यांना शरीर झिडकारते. ही गोष्ट ते वेगवेगळ्या मार्गाने दाखवते. ही गोष्ट आपल्याला त्रासदायक आहे, हे समजून घेण्यासाठी आपण अपयशी ठरलो तर त्रास वाढतो. मात्र, योग्य वेळीच त्याची दखल घेतली, तर भविष्यातील त्रास नक्कीच टळतो. 

अ‍ॅलर्जीमुळे होणारा त्रास वाचविण्यासाठी अ‍ॅलर्जी म्हणजे काय?,  अ‍ॅलर्जीमुळे शरीरात कोणते बदल होतात? हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. शरीरासाठी त्रासदायक ठरणार्‍या पदार्थांना ‘अ‍ॅलर्जेन’ असे म्हणतात. हे अ‍ॅलर्जेन असंख्य प्रकारचे असतात. त्यामध्ये प्रामुख्याने बुरशी, धूळ, जनावरांचे केस, दूध, अंडी, शेंगदाणे, चणे, टोमॅटो, परागकण, कोळंबी यांसारख्या खाण्यात येणार्‍या पदार्थांचा समावेश आहे. शरीराला त्रासदायक ठरणार्‍या कोणत्याही अ‍ॅलर्जेनचा शरीरात प्रवेश होतो, तेव्हा शरीर त्याला स्वीकारत नाही. त्यामुळे त्यांचा संपर्क रक्तातील अँटीबॉडीजबरोबर येतो. अँटीबॉडीज म्हणजे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे-लढणारे सैनिक होय. अ‍ॅलर्जेन आणि रक्तातील अँटीबॉडीज् एकत्र येऊन त्यापासून हिस्टामीन, ल्यूकोट्राईन्स, पोस्टा ग्लॅडीन यांसारखे रासायनिक पदार्थ तयार होतात. त्यांचा परिणाम म्हणून शिंका येणे, खाज सुटणे, पुरळ उठणे यासारखी विविध लक्षणे दिसून येतात. व्यक्तिसापेक्ष अ‍ॅलर्जीची असंख्य प्रकारची लक्षणे दिसून येतात. मात्र सर्दी, दमा, पित्त, इसब, पोटाचे विकार, औषधांमुळे होणारा त्रास यांसारखे प्रकार अधिक प्रमाणात दिसून येतात. 

सर्दीच्या अ‍ॅलर्जीसाठी श्वासाबरोबर शिरणारे अ‍ॅलर्जेन कारणीभूत ठरतात. यामध्ये परागकण, धूळ, बुरशी, जनावरांचे केस, श्वासातून आत गेल्यास लगेचच शिंका येण्यास सुरुवात होते. नाकातून पाणी वाहू लागते. दमा होण्याचे मुख्य कारण म्हणजे, त्या व्यक्तीला धुळीची अ‍ॅलर्जी असू शकते. त्याचबरोबर वर उल्लेख केलेल्या गोष्टींमुळेही दम्याचा त्रास होऊ शकतो. यामध्ये धाप लागणे, श्वास ध्वनिकांना सूज येणे, सतत कफ होणे, खोकला येणे अशी लक्षणे दिसतात. 

अ‍ॅलर्जीक पित्तामध्ये हात, पाय, मान यावर खाज सुटते. त्या जागेची त्वचा लाल होते. त्यावर मोठ्या गांधी उठणे अशी लक्षणे दिसतात. खासकरून लहान मुलांमध्ये हा त्रास अधिक प्रमाणात दिसून येतो. अ‍ॅलर्जीमुळे होणारे इसब किंवा एक्झिमा यामध्ये कातडीवर चट्टे येतात, खाज सुटते. काही वेळेला त्यातून द्रावसुद्धा स्रवतो. हा आजार लवकर बरा होत नाही. पोटाच्या विकारांमध्ये अंडी, दूध, चणे, शेंगदाणे खाल्ल्यानंतर घसा खवखवतो. काही वेळा उलट्या होतात, पोटात दुखते आणि जुलाबही होतात. काहीजणांना विशिष्ट प्रकारच्या औषधांची अ‍ॅलर्जी असते. या अ‍ॅलर्जीमध्ये धाप लागणे, अचानक रक्तदाब कमी होणे, पुरळ उठणे अशी काही लक्षणे दिसतात. मात्र, यावर काही ठराविक औषधे घेतल्यास लगेचच त्रास कमी होतो. 

काहीजणांना कामाच्या ठिकाणी असणार्‍या विशिष्ट पदार्थांवर अ‍ॅलर्जी येते. मुख्यत: छाती, नाक, डोळे आणि त्वचा या ठिकाणी त्रास होतो. विशिष्ट धातूंच्या संपर्क, रासायनिक पदार्थांचा स्पर्श अथवा सहवास यामुळेदेखील अ‍ॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. अ‍ॅलर्जीवर उपचार करताना आपल्याला होत असणार्‍या त्रासांची सविस्तर माहिती डॉक्टरांना सांगावी. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपली दैनंदिनी, खाण्या—पिण्याच्या सवयी, अनुवंशिक आजार, कामाचे स्वरूप, या गोष्टी नमूद केल्यास आजार ओळखण्यास सोपे जाते. 

कुठल्या पदार्थापासून अ‍ॅलर्जी आहे, हे ओळखण्यासाठी प्रयोगशाळेत तपासण्याही केल्या जातात. त्या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे ‘रास्ट—रेडिओ अ‍ॅर्लगो सॉर्बंट टेस्ट.’ या तपासणीसाठी रुग्णांच्या रक्ताचा नमुना घेतला जातो. ही तपासणी काहीशी खर्चीक आहे, मात्र खात्रीपूर्वक आहे. या तपासणीमध्ये रक्तातील अँटीबॉडीजचे प्रमाण वेगवेगळ्या वर्गवारीत तपासले जाते आणि त्यानुसार संवेदनशीलता ठरविली जाते. 

अ‍ॅलर्जीच्या तपासणीसाठीची दुसरी टेस्ट म्हणजे त्वचेवर केली जाणारी तपासणी. दोन्ही हातांवर दंडापासून मनगटापर्यंत असलेल्या त्वचेवर ही तपासणी करतात. यावेळी अ‍ॅलर्जेनचे तीव्र द्रावण वापरतात. हातांवर थोड्या अंतराने या द्रावणाचे थेंब टाकतात. एका लहानशा ब्लेडच्या साहाय्याने छोटासा ओरखडा पाडतात. वीस मिनिटांनंतर ज्या वस्तूंची अथवा पदार्थांची अ‍ॅलर्जी असते तेथे खाज सुटते, लालसरपणा येतो किंवा इतर लक्षणे दिसतात. ज्या पदार्थांची अ‍ॅलर्जी नसते तेथे कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. यावरून नेमक्या कुठल्या पदार्थाची अ‍ॅलर्जी आहे, याचे निदान करणे सोपे जाते. एकदा हे निदान झाल्यानंतर त्या विशिष्ट पदार्थांपासून दूर राहणे शक्य होते. निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन रुग्णाने केले, तर त्याला अ‍ॅलर्जीच्या त्रासापासून दूर नक्कीच राहता येते. हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. मात्र त्यापासून स्वत:चा बचाव नक्कीच करता येतो. थोडक्यात आजाराची तीव्रता कमी करता येते. 

Back to top button