न्यूमोनियापासून रहा दूर | पुढारी | पुढारी

न्यूमोनियापासून रहा दूर | पुढारी

डॉ. मनोज शिंगाडे

आजार कोणताही असला तरी, त्याची लक्षणे आढळल्यास वेळीच उपचार करणे आवश्यक असते. न्यूमोनिया होऊ नये म्हणूनही अशीच काळजी घेणे आवश्यक आहे. पण, हा आजार होऊच नये म्हणूनही काही गोष्टींकडे लक्ष देता येईल. सर्दी, ताप यांसारखे आजार चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे दातामध्ये कीड असल्यास दंतवैद्यांच्या सल्ल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. थंडीच्या दिवसात आंबट आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत. अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेतली, तर न्यूमोनियापासून दूर राहता येते.

दीर्घकाळ राहणारी सर्दी, कफ यामुळे काही वेळा रुग्णाचा आजार न्यूमोनियापर्यंत जाऊ शकतो. दर मिनिटाला श्वासाद्वारे 14 ते 18 वेळा वातावरणातील हवा आपल्या फुफ्फुसात ये-जा करत असते. वातावरणातील अशुद्ध द्रव्य, जीवजंतूदेखील याबरोबर येत आणि जात असतात. जीवजंतूंमध्ये निरनिराळे जीवाणू, विषाणू, बुरशी, परजीवी सूक्ष्मजीव यांचाही समावेश असतो. नाकातील बारीक केस, स्रवणारा चिकट द्राव, श्वसन संस्थेची असणारी स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती, खोकला, शिंका यांसारख्या नैसर्गिक क्रियांमुळे निरनिराळ्या जीवजंतूंपासून फुफ्फुसाचे रक्षण केले जाते. पण, काही वेळा जीवाणूंची शक्ती जास्त झाली अथवा माणसाची प्रतिकारशक्ती कमी झाली की न्यूमोनिया होतो. 

संबंधित बातम्या

न्यूमोनिया होण्याची तशी बरीच कारणे आहेत. रुग्णाचे दात किडले असल्यास त्यातील जीवाणू फुफ्फुसापर्यंत पोहोचवून हानी पोहोचवतात. तसेच दारू पिणारे, धूम्रपान करणारे किंवा मधुमेह असणार्‍यांची फुफ्फुस कमकुवत झालेले असते. त्यामुळे त्यांना जीवाणूंचा संसर्ग लवकर होतो. आणखी एक कारण म्हणजे, रुग्णाच्या पोटावर किंवा छातीवर शस्त्रक्रिया झाली असल्यास, अतिदक्षता विभागात तोंडातून नळी घालून कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रावर ठेवलेले असल्यास, डायलिसीस घेणारे असल्यास त्यांना  न्यूमोनियाचा धोका अधिक असतो. अशा रुग्णांमध्ये रुग्णालयातच आढळणार्‍या काही जीवाणूंमुळे 

न्यूमोनिया होऊ शकतो.

जीवाणूंच्या प्रकारावरून न्यूमोनियाचेही प्रकार पडतात. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया हा हिमोफायलस इन्फ्ल्यूएन्झे, स्टॅफिलोकोक्कस यांसारख्या जीवाणूंमुळे होतो. त्याला शास्त्रीय भाषेत टिपिकल न्यूमोनिया म्हणतात. तर क्लॅमिडिया आणि मायकोप्लाझमा किलीओनेला या जीवाणूंमुळे होणार्‍या न्यूमोनियाला एटिपिकल न्यूमोनिया असे म्हणतात. हे दोन्ही प्रकार संसर्गजन्य न्यूमोनियाचे आहेत. क्ष- किरण उपचारांमुळे फुफ्फुसावर काही वेळा परिणाम होतो. रेडिऐशन न्यूमोनायटिस आणि नळीद्वारे तोंडाने खेचताना थोडेसे पेट्रोल फुफ्फुसात पोहोचून होणारी इजा म्हणजे केमिकल न्यूमोनायटिस. हे प्रकार संसर्गजन्य नसतात, तर लेप्टोस्पायरोसिस आणि फाल्सिफेरम मलेरियामुळे होणारा न्यूमोनिया हा थेट फुफ्फुसात जंतू प्रवेशामुळे होत नसला तरी हे जीवाणू रक्तात शिरल्यानंतर त्यांचा प्रभाव शरीराच्या सर्व महत्त्वाच्या अवयवांवर होतो. त्यामुळे फुफ्फुसावरही तो होतो. म्हणूनच काही वेळा एखादा रुग्ण न्यूमोनियाच्या नेहमीच्या उपचारांना दाद देत नसल्यास, त्यावेळी रक्ताची योग्य तपासणी करून सर्व शक्यता पडताळून बघणे फायद्याचे ठरते.

न्यूमोनियाच्या प्रकारांवरून रुग्णांमध्ये लक्षणेही वेगवेगळी दिसत असतात. काहीवेळा ही लक्षणे किरकोळ असतात, तर काहीवेळा ती जीवघेणी असतात. बहुतेक न्यूमोनियाच्या रुग्णांमध्ये कफासहित किंवा कफविरहित खोकला, ताप, सर्दी एवढीच लक्षणे दिसतात. अशा रुग्णांना बहुधा कुठल्याही तपासण्यांची गरज पडत नाही. विशिष्ट प्रकारची अँटीबायोटिक्स वापरून बहुतेक रुग्णांना आराम पडतो. अंग दुखत असून ताप येत असल्यास तापाचे एखादे औषध उपयुक्त ठरते. अशा रुग्णांनी भरपूर पाणी पिणे, हलका आहार घेणे, थंड – आंबट पदार्थ टाळणे इत्यादी पथ्ये पाळली, तर रुग्णाला आठवडाभरातच आराम मिळतो. लहान मुलांमध्ये अनेकदा विषाणूंमुळे अशा प्रकारचा न्यूमोनिया होतो.  अशा रुग्णांना प्रतिजैविकांचीही आवश्यकता पडत नाही. तेवढ्यापुरत्या लक्षणांसाठी उपचार केल्यास आणि आराम केल्यास आजार बरा होतो.

मात्र गंभीर स्वरूपाच्या न्यूमोनियाच्या जंतूंचा संसर्ग झाल्यास अशा रुग्णांना ताप, खोकला यांसारख्या लक्षणांबरोबर छातीत दुखणे, श्वसनाचा वेग वाढणे, ताप उतरताना खूप घाम येऊन अशक्त वाटणे, असे त्रास होऊ शकतात. अशा रुग्णांवर वेळेवर उपचार झाले नाहीत, तर संसर्ग हळूहळू पूर्ण शरीरात पसरून ग्लानी येते. तर काहीवेळा कावीळ होणे, मूत्रपिंडावर परिणाम होणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अशा रुग्णांनी त्वरित योग्य उपचार घ्यावेत. जंतुसंसर्ग वेगाने पसरत असल्यास रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. त्यावेळी अँटीबायोटिक्स देेणे, शरीरातील आवश्यक असणार्‍या सोडियम, पोटॅशियमसारख्या द्रव्यांचे संतुलन राखणे, रक्तदाब नियंत्रित ठेवणे, गरज वाटल्यास कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे असे उपचार आवश्यकतेनुसार केले जातात.

रोग कुठलाही असो; सुरुवातीलाच त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य उपचार केले, तर तो वेळीच रोखला जाऊ शकतो. पण रोग होऊच नये म्हणून काही प्रतिबंधात्मक उपायदेखील उत्तम ठरू शकतात. संसर्गजन्य न्यूमोनियाबाबतीत तर ते आवश्यकच असते. साधा उपाय म्हणजे शिंकताना किंवा खोकताना तोंडावर आणि नाकावर हात ठेवावा. गर्दीच्या ठिकाणीदेखील लोक असे नियम पाळत नाहीत.

प्रत्येक माणसाने याबाबत काळजी घेतली तरी जवळपास 40 ते 50 टक्के प्रमाणात हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. तसेच सर्दी, ताप, खोकला हे सामान्य वाटणारे आजार चार ते पाच दिवसांच्यावर आटोक्यात येत नसतील, तर छातीच्या रोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. दातांना कीड झाली असेल, तर दंतवैद्यांच्या सल्ल्याने त्यावर नियंत्रण ठेवावे. थंडीच्या दिवसात गार आणि आंबट पदार्थ खाऊ नयेत. किरकोळ सर्दीकडे दुर्लक्ष करू नये. ज्या व्यक्तींना फुफ्फुसात जन्मजात वैगुण्य आहे किंवा ज्यांना पूर्वी फुफ्फुसाचा क्षयरोग होऊन गेला आहे, अशांनी विशेष काळजी घ्यावी. धूम्रपान करण्याची सवय असणार्‍यांदेखील आहार-विहाराबाबत काळजी घ्यावी. योग्य काळजी आणि सतर्कता बाळगली, तर न्यूमोनिया नक्कीच आटोक्यात येऊ शकतो.

न्यूमोनियामध्ये फुफ्फुसांना सूज येते आणि प्रामुख्याने हवा फुफ्फुसात जाण्यास अडथळा निर्माण होतो. बंद खोलीत कोंदट जागेत फार वेळ राहिल्यास, गर्दी असलेल्या ठिकाणी तसेच अतिशय धूर असलेल्या ठिकाणी वावरल्यास, कारखान्यातून किंवा इतर ठिकाणांहून अशुद्ध हवा ज्या ठिकाणी सोडली जाते अशा परिसरात राहिल्यास, कचरा पेटी, शौचालये यांची योग्य काळजी न घेतल्यास हा आजार होऊ शकतो. हातांद्वारेही कामकाज करताना जंतुसंसर्ग होऊ शकतो. आपला हात काम करताना अनेक ठिकाणी स्पर्श करत असतो. तोच हात नाका-तोंडाला लागला की हा संसर्ग होतो. त्यामुळे नाका-तोंडापुढे  नेण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे हाही एक उपाय ठरू शकतो. न्यूमोनियावर सुरुवातीच्या काळातच उपचार करावेत. तो बरेच दिवस राहिला, तर त्याचा रक्तावर आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. काहीवेळा फुफ्फुसाच्या आवरणात पाणीही होऊ शकते. म्हणूनच मुळातच सर्दी, पडसे, न्यूमोनिया यांसारखे आजार होऊ नयेत म्हणून वेळीच काळजी घेणे फायद्याचे ठरते.

Back to top button