दहा दिवसांत बेळगाव ‘रेड झोन’ मध्ये | पुढारी

दहा दिवसांत बेळगाव ‘रेड झोन’ मध्ये

बेळगाव: पुढारी वृत्तसेवा

दोन एप्रिलपर्यंत एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नसलेला बेळगाव जिल्हा फक्त दहा दिवसांच्या कालावधीत 18 रुग्णांसह रेड झोन मध्ये गेला आहे. जिल्ह्यातील बेळगाव व रायबाग हे दोन तालुके कोरोना बाधित असून बाधित क्षेत्रातील भागात भीतीचे वातावरण आहे. रुग्ण संख्या वाढल्याने लॉकडाऊनचे निर्बंध आणखी कडक होणार आहेत.

अवघ्या 11 दिवसांत जिल्ह्यातील चार ठिकाणी 18 रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होणार्‍या कर्नाटकातील जिल्ह्यांच्या यादीत बेळगाव एकदम तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे. 3 एप्रिल रोजी बेळगुंदी, कॅम्प बेळगाव आणि हिरेबागेवाडी येथे जिल्ह्यातील पहिले रुग्ण आढळल्यानंतर रुग्ण सापडण्याचा धडाका संपलेला नाही.  विशेषत:  हिरेबागेवाडी आणि कुडची ही दोन ठिकाणे सध्या तरी कोरोनाचे केंद्रबिंदू बनली असून येथील संसर्ग रोखण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

दिल्ली येथील तबलिग धर्मसभेत बेळगावचे नागरिक सहभागी झाले होते. ते बेळगावात परत आल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला.पहिल्या टप्प्यात आरोग्य तपासणीनंतर 3एप्रिलला तीन रुग्णांना कोरोनाचे निदान झाल्याचे स्पष्ट झाले.  पहिले तीन रुग्ण सापडल्यानंतर तिसर्‍या दिवशी 5 एप्रिलला कुडचीत तीन महिलांसह चौघे कोरोनाग्रस्त सापडल्याने एकच खळबळ उडाली. 9 एप्रिल रोजी हिरेबागेवाडी येथे कोरोनाग्रस्त तरुणाच्या कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले. तर 12 एप्रिल रोजी कुडचीतील तिघे व हिरेबागेवाडी तील एक असे चौघे कोरोनारुग्ण आढळले.  पुन्हा दुसर्‍या दिवशी 13 एप्रिलरोजी कुडचीत तीन रुग्ण आढळल्याने दहा दिवसांतच रुग्णांचा आकडा 17 वर गेला. मंगळवारी हा आकडा 18 वर पोचला. 

पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊन संपण्याआधीच जिल्हा रेड झोन मध्ये गेल्याने आता सर्वांनीच सतर्क राहणे भाग पडले आहे. 

दुसरा टप्पा ठरणार महत्त्वाचा

जिल्ह्यासाठी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा महत्त्वाचा ठरणार असून रस्त्यावरील गर्दी कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत. रेड झोन  मुळे आता तरी नागरिक रस्त्यावर फिरण्याचे टाळतील अशी अपेक्षा असली तरी पुढचे दोन आठवडे कसरतीचे ठरणार आहेत. रस्त्यावर फिरणार्‍याची दुचाकी जप्त करून आणि लाठीचा प्रसाद देऊनही वर्दळ पूर्ण बंद झालेली नाही.

पिरणवाडी निर्बंधित क्षेत्र घोषित

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

पिरणवाडी येथे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला आहे. इतर ठिकाणी याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी पिरणवाडी गावापासून 3 किलोमीटर परिसर निर्बंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

पिरणवाडी येथे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने त्याच्या आजूबाजूची गावे तसेच तीन किलोमीटरचा परिसर  निर्बंधित झाला आहे.महानगरपालिका व आरोग्य विभागाने संबंधित रुग्णाच्या घराच्या आसपासचा जवळपास 3 किलोमीटरचा परिसर सील केला आहे. या परिसरातील प्रत्येक कुटुंबाचे वैद्यकीय सर्वेक्षण केले जाणार असून या परिसरात पुन्हा नव्याने निर्जतुंकीकरण केले जाणार आहे. दरम्यान या रुग्णाच्या संपर्कात अनेक जण आले असून त्यांचीही वैद्यकीय तपासणी करुन त्यांनाही 14 दिवस होम क्वारंटाईन केले जाणार आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची यादी बनविण्याचे काम सुरु आहे.

१७८५ जण निरीक्षणाखाली

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

कॅम्पनंतर आता पिरनवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्यामुळे शहर परिसरात संसर्ग हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य खात्याने 1785 जणांवर निरीक्षण ठेवले असून अद्याप 95 जणांच्या घशातील द्रावाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या जिल्ह्यात 276 जण 14 दिवसांच्या होम क्‍वारंटाईनमध्ये आहेत. 664 जणांनी 14 दिवसांचे होम क्‍वारंटाईन पूर्ण केले आहे. 825 जणांनी 28 दिवसांचे क्‍वारंटाईन पूर्ण केले आहे. आतापर्यंत 484 जणांच्या घशातील द्राव प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यापैकी 371 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 18 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर, 95 अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.

कोरोना रूग्ण ज्या लोकांना भेटलेत अशांना क्‍वारंटाईन करण्यात येत आहे. त्यामुळे संशयितांची रोज संख्या वाढत आहे. त्यातच रूग्णालयात आयसोलेशनमध्येही 20 जणांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी घरातच बसणे आवश्यक आहे. विनाकारण रस्त्यांवर गर्दी होत असल्यामुळे संसर्ग वाढत आहे. अनेक जण कोरोनाची लक्षणे असली तरी, तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे या रोगाचा फैलाव होत आहे, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे परगावाहून आलेले, विदेशातून आलेल्या सर्वांनी आपल्या आणि इतरांच्या आरोग्यासाठी वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

दिल्‍लीत झालेल्या तबलिग समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात जे लोक सहभागी झाले होते. त्यांनी प्रशासनाला खरी माहिती द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

Back to top button