बेळगावात कोरोना लॅबला मंजुरी | पुढारी | पुढारी

बेळगावात कोरोना लॅबला मंजुरी | पुढारी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून केवळ चर्चाच सुरू असलेल्या कोरोना व्हायरस तपासणी प्रयोगशाळा अखेर दोन दिवसांत बेळगावात सुरू होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. जिल्हा रेड झोनमध्ये घालण्यात आला आहे. तरीही कोरोना व्हायरस तपासणी प्रयोगशाळेसाठी सरकारकडून दिरंगाई होत होती. याआधी पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगावात दौर्‍यात वारंवार दोन दिवसांत प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे, असे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात प्रयोगशाळा सुरू होण्याची चिन्हे नव्हती. अखेर गुरुवारी त्याला मंजुरी मिळाली.

बेळगावात प्रयोगशाळा नसल्यामुळे येथील संशयितांच्या घशातील द्रावाचे नमुने बंगळूर, हासन, शिमोगा या ठिकाणी किंवा पुणे येथे न्यावे लागत होते. त्यामुळे अहवाल येण्यास उशीर होत होता. मात्र, आता जिल्ह्यात प्रयोगशाळा सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. दोन दिवसांत ही कार्यान्वित होईल, असा दावाही इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केला आहे. याशिवाय एका खासगी रुग्णालयातही कोरोना व्हायरसची तपासणी करण्यास परवानगी मिळाली आहे.

सात तबलिगींमुळे…

दिल्ली येथे 13 ते 18 मार्चदरम्यान झालेल्या तबलिगी समाजाच्या मर्कज या धार्मिक सभेला उपस्थित राहिलेल्या जिल्ह्यातील सातजणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यामुळे जिल्ह्यात संसर्ग वाढला असून, आकडा 36 वर पोहोचला आहे. हिरेबागेवाडी येथील 20 वर्षीय युवकामुळे तेराजणांना संसर्ग झाल्याचे उघडकीस आले आहे.

Back to top button