सोलापुरात आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह   | पुढारी

सोलापुरात आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह  

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून लॉकडाऊनपासून 20 दिवस एकही रुग्ण नसलेल्या सोलापुरात गेल्या दोन दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. गुरुवारी जिल्हा प्रशासनाला एकूण 42 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 10 जण पॉझिटिव्ह, तर 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

यापूर्वी दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर अहवाल आला होता. दुसर्‍या दिवशी त्याच्या संपर्कातील एका महिलेचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता.

गुरुवारी पॉझिटिव्ह आलेल्या 10 व्यक्तींपैकी एक व्यक्ती ही मृत व्यक्तीच्या संपर्कात आली होती. उर्वरित 9 व्यक्ती या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्या होत्या. हे सर्व रुग्ण पाच्छा पेठ परिसरातील आहेत. या सर्व रुग्णांवर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत सोलापूर शहरात 12 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सोलापुरातील नागरिकांनी आता काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. बुधवारपर्यंत जवळपास 48 जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी होते. त्यापैकी मृत पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कातील सुमारे 148 जणांचे स्राव तपासणीला पाठविण्यात आले होते. त्यापैकी 125 जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला कालच प्राप्त झाले होते. ते अहवाल निगेटिव्ह आले होते. कोरोनाबाधित असलेल्या महिलेच्या संपर्कात असलेल्या सुमारे 22 लोकांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी जिल्हा प्रशासनाला 42 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह, तर 10 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली असून त्यांपैकी एका व्यक्तीचा मृत्यू 11 एप्रिल रोजी झाला आहे. उर्वरित 11 व्यक्तींंवर सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागात उपचार सुरू आहेत. हे अहवाल पॉझिटिव्ह आलेले रुग्ण त्या महिलेच्या संपर्कातील असल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोलापूर शहरावर आता कोरोनाचे काळे ढग जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

सध्या अहवाल पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण हे एकाच भागातील आहेत. हा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला आहे. आतापर्यंत शहर व जिल्ह्यातून होम क्वारंटाईन केलेल्या 1 हजार 217 व्यक्तींपैकी 473 व्यक्तींचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये असलेल्या 474 व्यक्तींच्या हातांवर शिक्के मारण्यात आले आहेत.

याशिवाय इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये 693 व्यक्ती होत्या. त्यांपैकी 222 जणांचा कालावधी पूर्ण झाला असून उर्वरित 471 व्यक्ती अद्यापही इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आयसोलेशन विभागात 448 रुग्ण होते. त्यांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी 401 व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. गुरुवारी जिल्हा प्रशासनाला 42 जणांचे रिपोर्ट  प्राप्त झाले. त्यापैकी 32 निगेटिव्ह, तर 10 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सील परिसरावर ड्रोनद्वारे नजर

सोलापुरातील पाच्छा पेठ परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने तेथील 1 किलोमीटरचा परिसर यापूर्वीच सील करण्यात आला होता. या भागात कोणालाही आत सोडले जात नाही. आतील कोणालाही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर सोडले जात नाही. आता पुन्हा याच परिसरातील व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने या संपूर्ण भागात ड्रोनद्वारे पोलिस नजर ठेवून आहेत. 

Back to top button