नांदेड : मास्क न वापरणाऱ्या ४३ जणांविरुद्ध कारवाई | पुढारी

नांदेड : मास्क न वापरणाऱ्या ४३ जणांविरुद्ध कारवाई

धर्माबाद : पुढारी वृत्तसेवा 

शहरात कोरोना संसर्गाविषयी नागरिक गांभीर्याने घेत नसल्याचे अनेक प्रकार पहावयास मिळतात. सार्वजनिक ठिकाणी तोंडावर मास्क न बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे अशा लोकांवर दंडात्मक कारवाईचा सपाटा मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनात पालिका कर्मचाऱ्यांनी सुरू केला आहे. गुरुवारी व शुक्रवारी शहरात मास्क किंवा रुमाल न बांधता फिरणाऱ्या ४३ लोकांवर दंडात्मक कारवाई करून ८ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाचा :हिंगोली : तलावात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

कोरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सीमाबंदी, संचारबंदी, सोशल डिस्टन्स न ठेवणे, मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे आदी निर्बंध लादण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. धर्माबाद तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसून तालुका सध्या कोरोनामुक्त आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात असून त्याची कडक अंमलबजावणी संबंधित यंत्रणेकडून करण्यात येत आहे.

धर्माबादेत सार्वजनिक ठिकाणी वावरण्याबाबत नगराध्यक्षा अफजल बेगम अब्दुल सत्तार, उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी व मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी चर्चा करून दंडात्मक कारवाई करण्यासाठी सोमवारी आदेश काढले. यात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध, सोशल डिस्टन्स न ठेवणे, आवश्यक कामासाठी बाहेर निघणाऱ्या प्रत्येकाला चेहऱ्यावर मास्क व रुमाल लावणे अनिवार्य केले आहे. मात्र त्या नंतरही अनेकजण मास्क न लावता शहरात विनाकारण फिरत असल्याचे दिसून आले. त्याविरुद्ध नगरपालिकेने मोहीम उघडली असून त्यासाठी सहा पथके नियुक्ती केली आहेत. ही पथके विविध ठिकाणी तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या व्यक्तींना प्रत्येकी दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येत आहे.

गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत ४३ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ८ हजार ६०० रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे. ही कारवाई पालिकेचे कर्मचारी दत्तू गुर्जलवाड, दीपक कोठारे, मारोती उल्लेवाड, नागेश अपुलोड, नितीनकुमार धावणे, सूर्यकांत मोकले, राम मुळे, कांता उशलवार, मनोहर तुंगनवार, रमेश घाटे, राजरत्न सूर्यवंशी, रुक्माजी भोगावार, भीमराव सूर्यवंशी, अविनाश सोनकांबळे, राजेश खटके, लक्ष्मण उमडे आदींनी केली आहे. 

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास पडेल महागात 

पान, गुटखा, तंबाखू या गोष्टीचे सेवन केले की काही वेळाने थुंकावेच लागते. गाडी असेल तर गाडीवरूनच मान वाकडी करून थुंकले जाते. पायी जात असेल तरीही रस्त्याच्या कडेला थुंकले जाते. पान टपऱ्यांच्या इथे तर दिवसभरात हजारो पिचकाऱ्या टाकल्या जातात. काहीही खाण्याची सवय नसली तरीही काही जणांना थुंकल्याशिवाय चैन पडत नाही. असे लोक कुठेही थुंकतात. थुंकल्यामुळे आजारी व्यक्तींच्या थुंकीतील आजार पसरवणारे जंतू मोकळे होतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. यामुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर मनाई आदेश काढण्यात आला आहे.

 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे आता महागात पडणार असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे. मात्र अनेक जण पान, गुटखा, तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याचे दिसत आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भीती आहे.

बाहेर निघताना चेहऱ्यावर मास्क व रुमाल लावूनच बाहेर निघावे


” नागरिकांनी आवश्यक कामासाठी बाहेर निघताना चेहऱ्यावर मास्क व रुमाल लावूनच बाहेर निघावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. विनाकारण घराबाहेर पडू नये. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रत्येकाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. 


– मंगेश देवरे, मुख्याधिकारी धर्माबाद.

वाचा : धुळे जिल्ह्यातील आणखी तिघांना कोरोना 

Back to top button