पुणे : रास्तभाव दुकांनासाठी पोलिसांकडून नियमावली | पुढारी

पुणे : रास्तभाव दुकांनासाठी पोलिसांकडून नियमावली

पुणे : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहरातील रास्त भाव दुकानदारांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करणे सर्व दुकानदारांना बंधनकारक असणार आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्यास दुकान बंद करण्याचे व नागरिकांना घरी परत जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जाऊ शकतात.

वाचा :पुणे : मेदनकरवाडीच्या महिला सरपंचाचा पंतप्रधानांशी संवाद

पुणे शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रसार वेगाने वाढत आहे. यासाठी प्रतिबंधात्मक व नागरिकांच्या सुविधांबाबात शासन स्तरावर विविध उपायोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर मे व जून २०२० महिन्यांकरता अंत्योदय अन्न योजना व अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट नसलेल्या उर्वरीत केशरी शिधापत्रिकाधारकांना रास्तभाव धान्य दुकानात सवलतीच्या दरात धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

त्यावेळी विनाकारण दुकानात गर्दी होऊ नये, संसर्ग दूर ठेवता यावा यासाठी पोलिसांकडून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून देखील एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसारच नागरिकांना धान्य वितरीत करण्यात येणार आहे.

वाचा : यंदा आंब्याला कोरोनाचा फटका

पहा रास्तभाव दुकानदारांना काय खबरदारी घ्यावी लागणार 

-सकाळी ८ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी राहील.

-टोकन मिळविण्यासाठी नागरिक सकाळी आठ पुर्वी गर्दी करू शकतात, त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त असणार आहे.

-नागरिकांना उभे राहताना सामाजिक अंतर ठेवून रांगेत उभे राहणेबाबात निर्देश द्यावेत, त्यासाठी दुकानदारांना रांगेचे योग्य मार्कींग करावे लागणार आहे.

-कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सुचित केलेल्या खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील.

-आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपकाची सोय करणे दुकानदारांना बंधनकारक.

-सूचनांची अंमलबजावणी संबंधित दुकानदारांनी करणे बंधनकारक असून, त्याची खातरजमा अन्न-धान्य वितरण कार्यालयाकडून होत असल्याची पडताळणी पोलिसांकडून जाणीवपुर्वक करावी. अन्यथा संबंधीत दुकान बंद करण्यास व नागरिकांना घरी जाण्याचे पोलिसांकडून निर्देश दिले जातील .

– संचारबंदीचे आदेश शहरात लागू आहेत. त्यामुळे स्वस्त धान्य वाटप दुकानात जाण्याच्या निमित्ताने इतरांकडून आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी या दुकानात जाणाऱ्या व्यक्तीकडे अधिकृत टोकन असल्याची खात्री करण्यात येणार आहे.

वाचा : पुणे : ससूनमधील असिस्टंट मेट्रनचा मृत्यू

Back to top button