लातूर : उदगीरातील ‘त्या’ कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू | पुढारी

लातूर : उदगीरातील 'त्या' कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

लातूर : पुढारी वृतसेवा

काही वेळापूर्वी कोरोनाबाधित म्हणून अहवाल मिळालेल्या उदगीरातील त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ४.१० वाजता तिने अखेरचा श्वास घेतल्याचे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. विशेष म्हणजे ती कोठेही गेली नव्हती व तिची कसलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नव्हती, असेही चौकशीत उघड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत नव्हता. तथापि काही दिवसांपूर्वी निलंगा येथे हरियाणातून आलेल्या १२ पैकी ८ प्रवाशांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले होते. तेव्हापासून लातूरकर काळजीत पडले होते. परंतु ते सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने लातूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. शनिवारी दुपारी उदगीरातील एक ७० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे कळाल्यानंतर जिल्हा हादरला. दरम्यान ही महिला उदगीरची रहिवाशी असून तिने कुठेही प्रवास केला नव्हता. श्वसनाचा त्रास होत असल्याने तिला उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्या घशातील व नाकातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. तिचा अहवाल शनिवारी प्राप्त झाला व ती कोरोनाबाधित असल्याचे कळाले. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले व महिलेबद्दल माहिती घेण्यास व पुढील उपाययोजने संदर्भात मॅरेथान बैठकाही सुरू झाल्या. 

दरम्यान, राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी तातडीने याची दखल घेत उपाययोजना करण्याबाबत प्रशासनास निर्देश दिले व प्रशासन कामासही लागले. दरम्यान ४ .१० वाजता त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे उदगीर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. दत्ता पवार व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शशिकांत डांगे यांनी सांगितले.

Back to top button