‘आयबीएस’- पचनविकार आणि आयुर्वेद | पुढारी | पुढारी

‘आयबीएस’- पचनविकार आणि आयुर्वेद | पुढारी

डॉ. आनंद ओक

वारंवार पचनबिघाड होणार्‍या रुग्णांच्या अनेक तपासण्या केल्यानंतर हा बिघाड त्यांना ‘आय. बी.एस.’ मुळे आहे, असे सांगितलेले असते. आयबीएस म्हणजे नक्की काय? तो कशामुळे होतो? त्यामधील तक्रारी आणि उपचार काय आहेत?

आयबीएस म्हणजे इर्रिटेबल बॉऊल सीनड्रोम. पचनबिघाडामुळे होणार्‍या पोटाच्या अनेक तक्रारींचा समूह की ज्यामध्ये आतड्यात कोणतेही द़ृष्य रचनात्मक विकृती नसूनही आतड्याचे आहार रस शोषणाचे कार्य बिघडलेले असते. महिलांमध्ये साधारणपणे जास्त प्रमाणात आढळणारा हा विकार आहे.

‘आय.बी.एस.’ची कारणे –

निश्चित असे कारण सांगता येत नाही; पण विविध जंतूसंसर्ग आतड्याला झाल्यानंतर ‘डिसेंट्री’ सुरू झाल्यावर औषधे घेऊन जंतूसंसर्ग कमी होतो व काहीजणांत हे वारंवार घडल्याने कालांतराने हा विकार उत्पन्न होतो. विशिष्ट प्रकारचे अन्न पदार्थ आतड्याला सहन न होणे असे कारण काही जणांत असते.

मानसिक तणाव –

विविध स्वरूपाची काळजी, चिंता, परीक्षेचे टेन्शन, आर्थिक विवंचना, नैराश्य, भीती इ. मानसिक तणाव खुप वाढल्यामुळे त्याचा दुष्परिणाम आतड्यावर होऊन हा विकार होतो. व अशा तणावामुळे तो वाढत जातो. लिव्हरचा पाचक स्त्रावातील पित्ताचे नीट न शोषण झाल्याने काहीजणांत हा विकार होतो.

‘आय.बी.एस.’ची लक्षणेे –    

1) पोटात दुखणे – पोटाच्या खालील भागात डाव्या किंवा उजव्या बाजूस तर कधी दोन्ही बाजूस बारीक दुखत राहते. अथवा कळा येतात. ही पोटदुखी अस्वस्थता निर्माण करते. काहीवेळा थोडावेळ दुखून थांबते तर काहीवेळा सतत दुखत राहते. संडासला जाऊन आल्यानंतर अथवा गॅस सरकल्यानंतर पोटदुखी कमी होते. क्वचित काहीजणांत वाढूही शकते. काही खाल्ल्यानंतर लगेच सुरू होते. किंवा काही तासांनी सुरू होते.

2) वारंवार शौचाला जावे लागते किंवा जावेसे वाटते. संडासला पातळ भसरट होते. सकाळी उठल्या उठल्या गडबडीने अथवा अनेक वेळा जावे लागते. नाश्त्यानंतर देखील जावे लागते. वारंवार जावे लागले तरी संडास साफ होत नसल्याची भावना असते. काहीजणांत उगीचच कुंथत बसून राहूनही मलप्रवृत्ती होत नाही. काहीजणांत संडासला शेम पडते.

3) पोट फुगणे – सतत पोट फुगून राहते. थोडे खाऊनही खूपच पोट फुगते. यामुळे काहीजणांत अस्वस्थता राहत असते. कामाला उत्साह वाटत नाही. आपल्या पोटात काहीतरी मोठा आजार असावा, अशी भीती सतत वाटत राहते. अनेक तपासण्या करूनही ‘माझ्या आजाराचे नक्की निदान होत नाही तसेच हे काही आता बरे होणार नाही’ अशी नैराश्याची भावना काही जणांत निर्माण झालेली आढळते. यातूनच चिडचिडेपणा वाढलेला असतो.

4) मळमळणे, अन्न नकोसे वाटणे, किंवा अन्न पचेल की नाही अशी भीती वाटून खाण्याचे टाळले जाते. त्यामुळे सतत असे होत राहिल्यास पोषण कमी होऊन अशक्तपणा, वजन कमी होणे, पाठदुखी या तक्रारी निर्माण होतात.

‘आय. बी.एस.’वरील आयुर्वेदिक उपचार –

आय बी एस चे निदान झाल्यानंतर या रुग्णांना रासायनिक औषधे सुरू केली जातात. काहींना यामुळे आरामही मिळतो; पण अजेकजणांत एकतर पूर्ण आराम मिळत नाही किंवा औषधे थांबवल्यास पुन्हा त्रास होत असल्याचे आढळते. या रुग्णांसाठी सांघिक आयुर्वेदीक उपचार, योग्य पथ्य व मार्गदर्शन, योगा, प्राणायम यांच्या संयुक्त उपचारांनी उत्तम फायदा होतो.

आयुर्वेदिय पद्धतीने रुग्णाची संपूर्ण माहिती घेऊन अष्टविध परीक्षेने दोष, प्रकोप, धातुक्षय, इ. परीक्षण करून औषधे ठरविली जातात. वाताप्रकोप नियंत्रण करणारी, आतड्याची पचनशक्ती सुधारणारी, आतड्यातील दाह, सूज कमी करणारी, आतड्याची हालचाल नियंत्रित करणारी, अन्नरस शोषण क्षमत सुधारणारी अशी मुख्य औषधे द्यावी लागतात.

शुंठी, मुस्ता, बिल्व, कुटज, इसबगोल, जायफळ, धातकी, आवळा, लसून, अतिविषा, शंखपुष्पी, जोतीष्मती, जटामांसी, ब्राम्ही, खरासणी, ओवा, दशमुल, लोध्र, इ. वनस्पतीज औषधे तसेच शंखभस्म, मौक्तिक, रौप्य, सुवर्णभस्म, पर्पटीकल्प, माक्षिक, अभ्रक, इ. भस्म यांच्या मुख्यत्वेकरून रुग्णप्रकृतीनुसार योग्य प्रमाणात वापर केला जातो.

बलवर्धक, वातशमक तेलाने हलक्या हाताने पोटाला, पाठीला, कमरेला मसाज, पोट शेकणे, बस्ति, मनोबल वाढविण्यासाठी शिरोधारा यांचाही उपयोग गरजेप्रमाणे केला जातो. या उपचारांबरोबर आहाराची पथ्ये सांभाळणेही महत्त्वाचे असते. वैद्याने आजाराविषयी उपचारांविषयी रुग्णाला वारंवार समुपदेशन, धीर देणे, याद्वारे आत्मविश्वास वाढवण्यालादेखील अतिशय महत्त्वाचे असते.

अशा सांघिक आयुर्वेदिक उपचारांनी अशा या विकारांवर उत्तम नियंत्रण मिळवता येते हे निश्चित!

Back to top button