कॅन्सर आणि प्रजनन क्षमता | पुढारी | पुढारी

कॅन्सर आणि प्रजनन क्षमता | पुढारी

डॉ. स्नेहा साठे

उशिरा होणारे विवाह, त्यातून निर्माण होणार्‍या वंध्यत्वाच्या समस्या सोडवण्यासाठी आज विविध प्रकारचे वंध्यत्व निवारण्याचे उपचार घेतले जातात. गर्भधारणा होईपर्यंत संप्रेरकांची जी इंजेक्शन दीर्घकाळ दिली जातात, त्याचेही दुष्परिणाम संप्रेरकामधील बदलांमध्ये दिसून येतात. स्त्रियांमधील कर्करोगासारखे काही गंभीर आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तरुण वयातील स्त्रियांमध्येही आता कर्करोगाचे निदान केले जात आहे आणि ही बाब तितकीच गंभीरही आहे. कर्करोग आणि वंधत्वामुळे तरुण पिढीला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

आपण किंवा आपल्याशी संबंधित काही तरुण व्यक्तीस कर्करोगाचे निदान झाल्यास, कर्करोगाच्या उपचारामुळे प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होऊ शकतो याची माहिती जाणून घेऊ. हल्ली उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे तसेच उपचार पद्धतींमुळे विविध पर्यायांनी पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यास अनेक जोडप्यांना फायदेशीर ठरत आहे.

कर्करोगाचा प्रजनन क्षमतेवर परिणाम

* कर्करोगाच्या शस्त्रक्रिया किंवा उपचारांचा क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्याचे परिणाम तात्पुरते किंवा कायमचे असू शकतात. कर्करोगाच्या उपचाराने प्रजननास हानी पोहोचण्याचा धोका हे रुग्णांचे वय, कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा तसेच कर्करोगाची उपचार पद्धती यावर अवलंबून असते.

शस्त्रक्रिया – शस्त्रक्रियेच्या माध्यमातून अंडकोष (ऑर्किडेक्टॉमी), गर्भाशय (हिस्टरेक्टॉमी) किंवा अंडाशय (ओओफोरक्टॉमी) काढून टाकल्यास भविष्यातील प्रजनन क्षमतेवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच ओटीपोटात किंवा ओटीपोटाजवळीत भागांमध्ये कर्करोगाच्या शस्त्रक्रियेमुळे गर्भधारणेस व्यत्यय येऊ शकतो. शस्त्रक्रियेनंतर झालेल्या जखमांमुळे फॅलोपियन नलिका अंड्यातून शुक्राणूंना शिरकाव करण्यापासून रोखू शकतात किंवा प्रजननात बाधा आणतात. किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आदी उपचार पद्धतीमुळेही स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक क्षमता बिघडण्याची, प्रजनन क्षमता अनियमित होण्याची शक्यता असते. तसेच बिजाचे फलन व निर्मिती यामध्येही बाधा येऊ शकते.

केमोथेरपी – प्रजननक्षमतेवर होणारा  केमोथेरपीचा प्रभाव हा औषध आणि त्याच्या मात्रेवर अवलंबून असतो. अल्किलेटिंग एजंटस् आणि ड्रग सिस्प्लाटिन हे घटक जास्त नुकसान करतात. ज्या स्त्रियांना जास्त प्रमाणात मात्रा, केमो आणि रेडिएशन थेरपी आवश्यक असते त्यांना प्रजननक्षमतेचे कायमस्वरुपी नुकसान होण्याचा धोका असतो.

रेडिएशन- रेडिएशनमुळे होणारे नुकसान हे रेडिएशन फील्डचे स्थान, आकार आणि दिलेल्या डोसवर अवलंबून असते. जास्त प्रमाणात रेडिएशन अंडाशयातील अनेक किंवा सर्वच अंडी नष्ट करू शकते. त्यामुळे वंध्यत्वाची समस्या तसेच रजोनिवृत्ती लवकर होते. गर्भाशयाच्या किरणोत्सर्गाच्या नुकसानीमुळे गर्भपात होणे, मुदतीपूर्वी जन्माची आणि कमी वजनाच्या बाळांची जोखीम वाढू शकते. 

कर्करोगाची इतर औषधे- स्त्रियांमध्ये स्तनांच्या कर्करोगासह काही विशिष्ट कर्करोगांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या संप्रेरके प्रजनन क्षमतेवर परिणाम करतात.

ऑन्कोफर्टीलिटीसारखे पर्याय वापरून प्रजनन क्षमतेवर होणार्‍या परिणामांना दूर करता येऊ शकते. सद्यस्थितीतील आकडेवारी पाहता कर्करोगाच्या उपचारानंतर झालेल्या गर्भधारणेमुळे कर्करोगाच्या वाढीचा धोका काही अंशी कमी होतो. प्रसूती तसेच नवजात बाळावर याचा गंभीर परिणाम होत नाही.

Back to top button