शिक्षण : मुलीच अव्वल का?

शिक्षण : मुलीच अव्वल का?

[author title="संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ" image="http://"][/author]

गेल्या काही वर्षांत अनेक अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी सातत्याने वाढते आहे. यूपीएससी, एमपीएससी, सीए, सीएस यांसारख्या उच्च काठीण्य पातळी असणार्‍या आणि स्पर्धात्मकताही अधिक असणार्‍या परीक्षांमध्येही मुलींची भरारी लक्षणीय असल्याचे दिसते. मुलींची आघाडी ही समाधान देणारी असली तरी मुले मागे का पडतात, याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

नुकतेच बारावी आणि दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यंदाही या परीक्षांमध्ये मुलींच्या निकालाने आघाडी घेतल्याची बाब समोर आली. गेल्या काही वर्षांतील विविध अभ्यासक्रमांच्या तसेच स्पर्धा परीक्षांच्या निकालांवर नजर टाकली असता अनेक अभ्यासक्रमांमध्ये मुलींच्या निकालाची टक्केवारी सातत्याने वाढते आहे. ही बाब अर्थातच स्वागतार्ह असली तरी त्याची मीमांसा होणे गरजेचे आहे. अनेक वर्षे ज्या व्यवस्थेने मुलींसाठी शिक्षणाचे दरवाजे बंद केले होते, त्या मुलींना संधी मिळताच तिचे सोने करण्यास सुरुवात केली आहे. मुलींची गुणवत्ता सर्वत्र वाढते आहे. यूपीएससी, एमपीएससी, सीए, सीएस यांसारख्या काठीण्य पातळी परमोच्च असणार्‍या आणि स्पर्धात्मकताही अधिक असणार्‍या परीक्षांमध्येही मुलींची भरारी लक्षणीय असल्याचे दिसत आहे.

राज्य परीक्षा मंडळाप्रमाणेच नुकताच केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये इयत्ता बारावीचा निकाल 87.33 टक्के लागला असून त्यामध्ये 91.52 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 6.4 टक्के अधिक आहे. दहावीच्या निकालावर नजर टाकली असता त्यातही चित्र बारावीप्रमाणेच आहे. सुमारे 94.75 टक्के मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. म्हणजे दहावीत देखील 2.04 टक्के मुली मुलांपेक्षा अधिक उत्तीर्ण झालेल्या आहेत. राज्य माध्यमिक मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी यंदा 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यातील 7 लाख 28 हजार 11 मुली पास झाल्या आहेत. याचा अर्थ शेकडा 97.21 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत; तर मुलांचे शेकडा प्रमाण 94.56 इतके आहे. म्हणजे राज्यात 2.64 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत.

महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर अशी एकूण नऊ विभागीय मंडळे अस्तित्वात आहेत. या सर्व विभागीय मंडळांच्या निकालांचे शेकडा प्रमाण पाहिले असता कोणत्याही विभागात मुलींपेक्षा मुलांचा निकाल अधिक आहे, असे चित्र दिसत नाही. प्रत्येक मंडळाचे लागलेल्या निकालाचे शेकडा प्रमाण लक्षात घेता मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण एकूण सरासरी निकालापेक्षा अधिक असल्याची बाबही समोर आली आहे. नियमित विद्यार्थ्यांबरोबरच खासगी स्वरूपात अर्ज सादर करून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निकालावर नजर टाकली असता असेच चित्र असल्याचे दिसून येते. राज्यात 25 हजार 894 विद्यार्थ्यांनी खासगी स्वरूपातील अर्ज सादर केले होते. परीक्षेसाठी 25 हजार 368 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यापैकी 9 हजार 734 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली. त्यातील 8 हजार 250 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. म्हणजे इथेही शेकडा प्रमाण 84.75 टक्के आहे, तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 77.73 टक्के आहे. या विद्यार्थ्यांचा शेकडा निकाल 80.45 टक्के लागला आहे.

बारावीच्या निकालावर नजर टाकली असता राज्यात बारावीसाठी 14 लाख 33 हजार 371 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज सादर केले होते. त्यापैकी 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातील 6 लाख 57 हजार 319 मुली परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या. 6 लाख 27 हजार 388 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. हे उत्तीर्णतेचे शेकडा प्रमाण 95.44 टक्के इतके आहे. बारावीमध्ये विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 91.06 टक्के इतकी आहे. खासगी स्वरूपात अर्ज सादर करून परीक्षेला प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या 85 हजार 878 इतकी आहे. त्यापैकी 32 हजार 841 मुली आहेत. यापैकी 28 हजार 29 मुली उत्तीर्ण झालेल्या आहेत. हे उत्तीर्णचे प्रमाण 69.51 टक्के इतके आहे. मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 65.27 टक्के आहे. या विद्यार्थ्यांचा एकूण निकाल 66.89 टक्के आहे.

दहावी आणि बारावीच्या स्तरावर मुलींची गुणवत्ता जशी उंचावलेली दिसते आहे. त्या स्वरूपाची गुणवत्ता प्राथमिक स्तरावर देखील विविध सर्वेक्षणात उंचावलेली आढळून येते. मुलींची आघाडी ही समाधान देणारी असली तरी मुले मागे का पडतात, याबद्दल विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साधारणपणे मुलींवर कुटुंबाची जबाबदारी मुलांपेक्षा अधिक लवकर येते. आपल्या परंपरेमध्ये देखील मुलींवर त्याच स्वरूपाचे संस्कार बालपणापासूनच केली जातात. घरातील कामे मुली जितक्या प्रमाणात करतात त्या प्रमाणात मुलांचा सहभाग असत नाही. पालक, समाजाचे मुलींवर अधिक दडपण असते. आज विविध समाजमाध्यमांमध्ये माध्यमिक स्तरावरील मुले जितक्या मोठ्या प्रमाणात सहभागी असतात अथवा सक्रिय असतात तितक्या प्रमाणामध्ये मुलींचा सहभाग दिसत नाही. त्यामुळे मुलींचा समाजमाध्यमांवर अधिक वेळ खर्च होत नाही. पालकांचा मुलं आणि मुली यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनदेखील भिन्न आहे. त्या दृष्टिकोनाचा देखील परिणाम आहे का, याचाही शोध घेण्याची गरज आहे. मुलींची कष्ट करण्याची वृत्ती, प्रत्येक कामात असणारी सक्रियता, एकाग्रता याचा परिणामदेखील मुलींची गुणवत्ता उंचावण्यात होत असावा, असे अभ्यासकांना वाटते.

शालेय स्तरावर असणार्‍या मुली या समाजमाध्यमाच्या विविध साधनापासून दूर असल्यामुळे अभ्यासाच्या प्रक्रियेत अधिक चांगला सहभाग अधोरेखित होत असतो. अभ्यास करताना मुलींची असणारी एकाग्रता, अभ्यास करण्यात असणारी सक्रियता मुलींना अधिक मार्कापर्यंत घेऊन जाते. याखेरीज तन्मयतेने आणि मन लावून अभ्यास करण्याची वृत्ती, मुलांच्या तुलनेत कमी असणारा उथळपणा यांसारखी गुणवैशिष्ट्ये मुलींना यशस्वी बनवत आहेत. अनेक वर्षे शिक्षणापासून दूर असणार्‍या मुलींच्या मनामध्ये बदललेल्या सामाजिक आणि काहीशा कौटुंबिक वातावरणामुळे महत्त्वाकांक्षा उंचावलेली दिसत आहेत. मुली शिकल्यामुळे त्यांच्या जीवनमानामध्ये आणि जीवन व्यवहारामध्ये झालेले परिणाम शिकू पाहणार्‍या मुलींच्या मनावर परिणाम करत आहेत. आपल्या परिवारातील अथवा समाजातील एखादी मुलगी शिकल्यानंतर तिचे कुटुंबामध्ये उंचावलेले स्थान यामुळे देखील मुलींना शिक्षणामध्ये रस वाढू लागला आहे.

अनेकदा कुटुंबात मुलगा व मुलगी असेल तर मुलाला शिकवण्यासाठीचा पैसा खर्च करण्याची शक्ती पालक दर्शवतात. मुलीच्या बाबतीत अधिक चांगले महाविद्यालय, चांगला अभ्यासक्रम निवडला गेला तर पैसा द्यावा लागेल म्हणून अनेकदा मुलींना शिकवायचे असले तरी उत्तम दर्जाचे महाविद्यालय अथवा अभ्यासक्रम निवडण्याच्या दृष्टीने पालक फार सक्रियता दर्शवत नाहीत. ही बाब देखील मुलींना चांगले यश संपादन करण्यासाठी प्रेरणा देत असावी. आपल्याला शिकायचे असेल तर अधिक चांगले मार्क मिळवावे लागतील तरच पालक महाविद्यालय प्रवेश घडवून आणतील, ही त्यांच्या मनातील असलेली धारणा मुलींना शिकण्यासाठी प्रेरित करत असावी.

मुलींच्या मनामध्ये जबाबदारीची भावना सातत्याने बालपणापासूनच पेरली जाते. त्या भावनेचा सकारात्मक परिणाम शिक्षणाच्या प्रक्रिया देखील होत असला पाहिजे. त्याचबरोबर भविष्याचा विचार करून मुली आपले कुटुंब आणि भविष्यातील उत्तम जीवनासाठी लागणारी आर्थिक परिस्थिती याचा विचार करू लागल्या आहेत. आपल्याला उत्तम जीवन जगायचे असेल, भविष्यातील पिढीचे उत्तम शिक्षण, आरोग्य जोपासायचे असेल तर दोघांनाही नोकरी करण्याची गरज आहे, ही जाणीवही मनात घर करू लागली आहे. त्यासाठी आपल्या हाती उत्तम पदवी असायला हवी. त्यासाठी अधिक उत्तम शिकायला हवे ही निर्माण झालेली जाणीव मुलींच्या मनात शिकण्याची धारणा अधोरेखित करू लागली आहे. भविष्याची वेध घेणारी क्षमता आणि दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये आपला भोवताल काही अंशी यशस्वी झाला आहे. त्यामुळे मुलींच्या दृष्टिकोनात बदल घडताना दिसतो आहे.

हा घडणारा बदल अधिक सकारात्मक आहे. त्याचे परिणाम म्हणून शिक्षणाच्या गुणवत्तेत मुलींची आघाडी उंचावताना दिसत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिक्षणामुळे येणारे स्वावलंबन, स्वातंत्र्य मुलींना अधिक प्रभावित करत आहे. वर्षानुवर्षे आपल्या आया-आज्यांकडून पुरुषप्रधान व्यवस्थेच्या गोष्टी ऐकत आलेल्या मुलींना आर्थिक सत्तेच्या आधारावर एकाधिकारशाही गाजवणार्‍या पुरुषसत्ताक कुटुंबपद्धतीला शह द्यायचा आहे. आपल्या विवाहानंतर परावलंबित्वाचं जिणं त्यांना नको आहे. इंटरनेटमुळं विश्वाचं अवकाश खुलं झालं आहे. त्या आकाशात त्यांना स्वतःच्या पंखांनी भरारी घ्यायची आहे. त्यासाठी शिक्षणाचं असणारं महत्त्व त्यांनी ओळखलं आहे. त्यातूनच मुलींच्या यशाचा आलेख उंचावत चालला आहे. सावित्रीबाईंनी मुलींच्या शिक्षणाचा पाया घातला त्याला अनेक वर्षे लोटली. आज मुलींची ही शैक्षणिक प्रगती सावित्रीबाईंनी पेरलेल्या बीजांकुराचं फलित आहे, हे विसरता कामा नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news