सर्दी : साधा फ्लू, अ‍ॅलर्जी की कोरोना? | पुढारी

सर्दी : साधा फ्लू, अ‍ॅलर्जी की कोरोना?

डॉ. अनिल मडके 

बदलत्या वातावरणाबरोबर, थंडी सुरू झाल्यापासून अनेकांना सर्दी – पडसे – शिंका – नाक गळणे – घसा खवखवणे अशा तक्रारी सुरू झालेल्या आहेत. आणि कोरोनाचा विचार आला की अशा सर्दीविषयी शंका येते; पण प्रत्येक सर्दी, शिंका किंवा नाक गळणे हे कोरोनाचे लक्षण असत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका.

थंडी आणि सर्दी यांचे नाते अतूट आहे. थंडी वाढू लागली आहे. थंडीची अजून लाट अशी आली नसली तरी, कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मनात अजूनही कोरोनाविषयी धास्ती आहे. 

जर तुम्हाला अगदी लहानपणापासून किंवा गेल्या दोन- तीन – चार वर्षांपासून सर्दीचा शिंकांचा त्रास नेमक्या थंडीच्या काळात सुरू होत असेल तर, ही सर्दी वातावरणामुळे म्हणजेच अ‍ॅलर्जीची असण्याची शक्यता अधिक आहे. नाक गळणे, शिंका, डोळ्यांतून पाणी येणे, नाक खाजवणे, घसा  खवखवणे, डोळे चुरचरणे, कान खाजवणे अशी याची लक्षणे असतात. शक्यतो ताप नसतो. खोकला क्वचितच असतो. तुम्हाला आधीपासूनच दमा असेल तर, दम लागतो, धाप लागते. याउलट, साध्या फ्लूच्या सर्दीमुळे बारीक ताप, डोकेदुखी, अंगदुखी, कणकण, अशक्तपणा या तक्रारी असतात. नाक गच्च होते, चोंदते. काही लोकांना सायनसचा त्रास होतो. काही वेळा घसा खवखवतो. तुम्ही याला कोरोना समजून घाबरून जायचे कारण नाही.

एखाद्या व्यक्तीला कोरोना आहे की नाही हे ओळखण्याचे काही विशेष घटक आहेत. ज्या व्यक्तीला असा त्रास होतो, ती व्यक्ती  कोरोनाबाधित व्यक्तीच्या सानिध्यात आलेली असली पाहिजे. कोरोनाबाधित क्षेत्रात प्रवास करून येणे, कुटुंबात कोरोनाबाधित व्यक्ती असणे किंवा कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात येण्याची शक्यता असणे – उदा. मिटिंग, जेवणावळी, लग्न समारंभ,  मित्रांसोबत गप्पाटप्पा, मिरवणुकीत सामील होणे, या नाजूक काळात दररोज या ना त्या कारणाने वारंवार प्रवास करणे किंवा स्टोअरमध्ये –  मॉलमध्ये विशेषतः दररोज गर्दीच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींना कोरोनाचा धोका आजच्या अशा परिस्थितीत संभवू शकतो. 

मास्कचा शास्रशुद्ध वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वरचेवर हात धुणे ही त्रिसूत्री ‘विसरणार्‍यांना’ हा धोका अधिक आहे.

जर तुम्ही वरीलपैकी कोणत्याही गटात बसत नसाल तर, तुमची सर्दी ही कोरोनाची असण्याची शक्यता नाही. 

कोरोनाबाधित व्यक्तींना डोकेदुखी, सर्दी, नाक गळणे याबरोबर घसा खवखवणे किंवा घसा दुखणे ही तक्रार तीव्रतेने असते. अशक्तपणा येतो. वास न येणे आणि तोंडाची चव जाणे ही लक्षणे कोरोनामध्ये येतात. कोरडा खोकला आणि दम लागणे ही कोरोनाची धोक्याची लक्षणे आहेत. भरपूर ताप येतो जो साध्या गोळ्यांनी सहज कमी होत नाही. अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन  छातीचा एक्स-रे करून कोरोनाचा न्यूमोनिया झाला आहे का याची खात्री करून घ्यावी. अर्थात कोरोनाची शक्यता वाटत असेल तर ठरळिव अपींळसशप किंवा ठढझउठ चाचणी करून घेणे इष्ट ठरते. कोणती चाचणी करावयाची याचा निर्णय डॉक्टर घेतात. वरीलपैकी काहीही इतिहास नसेल आणि सर्दी शिंका येण्याची तक्रार ही नेहमीचीच असेल, घरात सर्दी-एलर्जी- दमा असलेली व्यक्ती असेल तर हा त्रास नेहमीचाच असू शकतो. अर्थात अशा तक्रारीकडे दुर्लक्ष न करता किंवा स्वतःहून घरातील औषधे घेऊन सेल्फ मेडिकेशनचा मार्ग न अवलंबता, डॉक्टरांचा सल्ला घेणे नेहमीच हिताचे ठरते.

दिवाळीनंतरच्या या काळात आजूबाजूला कोरोनाचे रुग्ण असण्याच्या शक्यता वाढल्या आहेत. अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडताना चांगला मास्क व्यवस्थित नाकावर – तोंडावर लावा. त्याला वारंवार हात लावू नका. डोळ्यांवर चष्मा नसेल तर, गॉगल लावा. कोणत्याही अनोळखी वस्तूला स्पर्श करू नका. हस्तांदोलन करू नका. असे केल्यास हात तातडीने साबणाने स्वच्छ धुवा. साबण नसेल तरच सॅनिटायझर वापरा. नाक, तोंड आणि डोळे या ढ ईशर ( र्ढेीलह ईशर ) वर किंबहुना चेहर्‍यावर कुठेही स्पर्श करू नका. कोणत्याही व्यक्तीच्या निकट – सहा फूट अंतराच्या आत जाऊ नका. तुमची रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवा. वेळेवर आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावरहित दैनंदिनी ही आरोग्य सूत्रे नियमितपणे पाळा, म्हणजे कोरोना तुमच्यापासून दूर पळेल.

Back to top button