‘इंटरनेट’ची सवय आणि स्मरणशक्ती | पुढारी | पुढारी

‘इंटरनेट’ची सवय आणि स्मरणशक्ती | पुढारी

व्यक्तीला स्मरणशक्तीचे वरदान आहे. पण, हल्ली कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याऐवजी ती ‘शोधण्याची’ सवय लागली आहे. कारण, एका क्लिकवर सार्‍याच गोष्टी मिळतात. पण, त्यामुळे स्मरणशक्तीचा विकास मंदावत असून त्यावर परिणाम होत आहे. 

व्यक्तीला स्मरणशक्तीचे वरदान आहे. पण, इंटरनेटच्या वापरामुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीवर परिणाम होत आहे. शिवाय, त्याची स्मरणशक्ती अनुपयोगी ठरते आहे. इंटरनेट येण्यापूर्वी लोकांना सर्व माहिती मेंदूत साठवून ठेवावी लागेल आणि ती आठवावी लागेल. कारण आपल्याकडे गुगल नव्हते. गुगल बाह्य स्मरणशक्तीचे कार्य करते. त्यात अनेक प्रकारची माहिती संग्रहित केली जाते. हल्ली कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्यापेक्षा ती इंटरनेटवर शोधण्यात वेळ घालवतो. त्यामुळे अर्थातच स्मरणशक्तीवर परिणाम होतो.

नुकत्याच झालेल्या काही अभ्यासांतून सहकर्मचारी किंवा मित्र यांच्याबरोबर बौद्धिक चर्चा करण्यापेक्षाही लोक इंटरनेटला प्राधान्य देतात, असे दिसून आले. त्यामुळेच बौद्धिक आळस ही समस्या निर्माण होत आहे. इंटरनेटवर सहजपणे माहिती मिळत असल्याने स्मरणशक्ती कमी होत आहे. अनेक अभ्यासातून आठवणीत ठेवणे ही गोष्ट कमी होत चालल्याचा खुलासा केला जात आहे. यातूनच इंटरनेट आपल्या शरीराबाहेर संग्रहित किंवा ट्रान्स अ‍ॅक्टिव्ह स्मरणशक्तीच्या भागाशी खेळतो आहे. त्यामुळे मेंदूला अनुक्रमणिकेच्या पानांप्रमाणे काम करण्यास प्रवृत्त करतो आहे. अर्थात दुष्परिणामाकरिता केवळ इंटरनेटला दोष देणे गैर ठरेल. आपल्या मर्यादित स्मरणशक्तीमध्ये एक संतुलित आणि गरजेवर आधारित माहिती ज्ञानाधारित आहे. ती आपली संपत्ती आहे. 

कोलंबिया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञांनी स्मरणशक्तीमध्ये होणार्‍या बदलांचा अभ्यास केला त्याला ‘गुगल प्रभाव’ असे म्हटले जाते. या संशोधकांनी असे सांगितले की, इंटरनेटवर एखादे ज्ञान किंवा गोष्ट सहजपणे उपलब्ध आहे असे कळल्यावर लोकांना त्यांच्या स्मरणात असलेल्या योग्य ज्ञानावरही शंका निर्माण होऊ लागते. सर्च इंजिन लोकांची स्मरणशक्ती कमजोर करते. कारण, ती माहिती तर इंटरनेटवर सहज उपलब्ध आहे. जुन्या जमान्यात आपण आपल्याला हवी ती माहिती मित्र, सहकारी किवा पुस्तके यांच्यातून मिळवत होतो. पण, गुगलच्या प्रभावामुळे आता लोक मित्र, सहकारी यांच्याबरोबर चर्चा करणे विसरून जात आहेत. ते कॉम्प्युटरवर अधिक अवलंबून राहत आहेत. त्यामुळे संवादाची प्रक्रियाही कमी होत आहे. प्रत्येक गोष्टीची माहिती ऑनलाईन मिळत असल्याने शरीराबाहेर एक नवाच मेंदू विकसित केला आहे जो आपल्या शरीरातील मेंदूपेक्षा अधिक विश्वसनीय वाटतो आहे. इंटरनेटवर दुनियेतील माहिती उपलब्ध होते हे जरी खरे असले तरीही इंटरनेटवरील अवलंबित्व खूप धोकादायक ठरू शकते. कारण ती परिपूर्ण असतेच असे नाही. आपल्या मेंदूवरील विश्वास गमावत असताना एखादा दिवस हा वायर असलेला मेंदू नसला तर माणसाचे काय होणार हा मोठाच प्रश्न आहे. 

काही लोक इंटरनेटवर इतके रमून जातात की त्यांना वास्तवाचे भानच राहत नाही. मग हळूहळू मानसिक आजार शरीरात प्रवेश करतात. इंटरनेटवर अवलंबून राहिल्याने व्यक्ती स्मरणशक्तीचा वापरच करेनासा झाला आहे. त्यामुळे स्मरणशक्तीवर परिणाम होतो आहे. इंटरनेटमुळे कोणतीही गोष्ट लक्षात ठेवण्याची वृत्ती कमी होते. कोणत्याही माहितीसाठी व्यक्ती इंटरनेटवर अवलंबून राहते. एखादा दिवस इंटरनेटच नसेल तर माणसाचे काय होईल याचा विचार करायला हवा.

वास्तविक जगापासून दूर ः ज्या व्यक्ती व्हर्च्युअल जगात जास्तीत जास्त वेळ घालवतात त्या वास्तवापासून हळूहळू दूर जातात. ते काल्पनिक जगातच वावरत असतात. काही काळानंतर ते इंटरनेटवर पूर्णपणे अवलंबून राहतात. तेव्हा त्यांच्याकडे इंटरनेट नसते तेव्हा अशा व्यक्तींची चिडचिड होते त्यांना चिंता वाटते, वाईट वाटते. 

अपुरी झोप ः सर्वांकडे स्मार्टफोन, टॅबलेट आहेत. आपण झोपतानाही मोबाईल घेऊनच झोपतो. काही लोक झोपतानाही तासन तास मोबाईलवर गर्क असतात. अशा व्यक्तींना झोपेच्या समस्या जाणवतात. 

लोकांपासून दुरावा ः इंटरनेटवर जास्तीत जास्त वेळ घालवणार्‍या व्यक्ती ऑनलाईन कम्युनिटीचा हिस्सा होतात. त्यामुळे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो.

Back to top button