फंगल इन्फेक्शन/गजकर्ण एक वाढता त्रास; कशी काळजी घ्याल? | पुढारी

फंगल इन्फेक्शन/गजकर्ण एक वाढता त्रास; कशी काळजी घ्याल?

डॉ. प्रियदर्शनी जाधव

गजकर्ण, बुरशी, रिंगवर्म किंवा फंगल इन्फेक्शन अशा अनेक नावांनी ओळखला जाणारा आजार अर्थातच त्रासदायक झाला आहे. मुळात अलीकडच्या काळात याचे प्रमाण इतके वाढले आहे की, तो पूर्वी जितक्या लवकर बरा करता येत होता तेवढाच आता बरा करायला आव्हानात्मक झाला आहे. त्याचे मुख्य कारण आहे, स्टेरॉईड क्रिम्सचा बेजबाबदारपणे केलेला वापर! मुळात स्टेरॉईडो गजकर्ण बरे करायचे औषध नाहीच! याने फक्‍त त्याची खाज व लालसरपणा कमी होतो, आजार नाही! (fungal infections ringworm a growing problem)

याचे प्रकार : फंगल इन्फेक्शनचे वरचेवर आढळणारे 4 प्रकार आहेत 

सामान्यपणे जांघेमध्ये, काखेत व सिटवर होणारा गजकर्ण; हातांच्या किंवा पायांच्या बोटांमध्ये, लघवीच्या जागी होणारे; ओल, घामामुळे पाठीवर, छातीवर होणारा सुर्मा व नखांचे फंगल इन्फेक्शन. 

गजकर्ण : रिंगच्या आकारात येणारे, लालसर रंगाचे व प्रचंड खाज असणारे असे गजकर्ण हे वर सांगितलेल्या भागांवर सोडून पायावर, हातावर, पाठीवर, पोटावर  चेहर्‍यावर व डोक्यातदेखील उद्भवते. हे लहानांपासून मोठ्यापर्यंत, पुरुषांमध्ये व स्त्रियांमध्ये होते. संसर्गजन्य असल्यामुळे घरात एकाला झाले की, इतरांनादेखील पसरू शकते. याला कारणीभूत निरनिराळ्या प्रकारची सूक्ष्मदर्शक बरशी असते. या आजाराचे निदान सहसा क्लिनिकली व के. ओ. एच. टेस्टनेदेखील केले जाते. 

ओल : सतत ओले राहणारे भाग, उदा. : लघवीची जागा, जांघेत, हाता-पायांच्या बोटांमध्ये ओल होते. ओल होऊन तेथे खाज होते व क्‍वचित दुखतेही. याला कन्डिडिआसिस असेही म्हणतात. व तो कॅन्डिडा अल्बिकस्न या जंतूमुळे होतो. (इंटरट्रायगो, ओरल थ्रश, योनीतून कन्डिडिआसिस हे या जंतूमळे होणारे इतर आजार) 

सुर्मा : पाठ, छाती व दंड या जागेला काळपट किंवा पांढरे डाग ज्याला खाज असू शकते ते म्हणजे सुर्मा. बर्‍याच वेळेला हे डाग उन्हाळ्यामध्येच उद्भवतात आणि या जागेलाच येतात. याचे कारण आहे घाम व मॅलेसेझिया फरफर, नावाचा जंतू उन्हामुळे उत्तेजित होऊन हे जंतू या रंगाचे द्रव्य तयार करतात, ज्यामुळे हे चट्टे येतात.

ओनॅकोमायकोसिस : हे नखाचे फंगल इन्फेक्शन असते. यामध्ये नख पिवळ्या किंवा हिरव्या रंगांची होतात व जाड होतात. इन्फेक्शन वाढेल तसे ती पातळ होऊन तुटू लागतात. पायांच्या नखांना हे जास्त सामान्य आहे; पण हाताच्या नखांनादेखील होऊ शकते. 

याची कारणे : फंगल इन्फेक्शन होते हे घामामुळे किंवा ओल राहिली की. याची सुरुवात जांघेत, काखेत, पाठीवर, छातीवर होते व इतर भागांवर पसरते. संसर्गजन्य असल्यामुळे ते घरातल्या इतरांकडे पसरू शकते. याचा संसर्ग एकमेकांच्या वस्तू,  उदा. टॉवेल, नॅपकीन, कपडे, अंथरूण, चादर वापरल्याने होऊ शकते. याशिवाय, घामाने भिजेलेले किंवा ओले कपडे घातल्यामुळेदेखील होतो. ही समस्या उन्हाळ्यामध्ये जास्त उद्भवते आणि एखाद्याला खूपच घाम येत असेल तर ते त्रासाचे होते. माळी, कामवाल्याबाई, शेतकरी ज्यांचे हात-पाय सारखे पाण्यात असतात व ज्यांना सारखे हात-पाय धुवायची सवय असते, त्यांना ओलीचा बर्‍याचदा त्रास होतो. 

लघवीच्या जागी होणारे कॅन्डिडिआसिस इन्फेक्शन अस्वच्छतेमुळे होते. याचे अजून एक कारण आहे अँटिबायोटिकचा अतिवापर, ज्यामुळे शरीरातील लॅक्टोबॅसिली नावाचे चांगले जीवाणू कमी होतात व तिथे हे इन्फेक्शन होते. त्याशिवाय गरोदरपणा, अनियंत्रित मधुमेह, आजार ज्यामध्ये रोगप्रतिकारकशक्‍ती कमी होते, अतिगोड खाल्ल्याने व स्त्रियांमध्ये एम.सी.च्या वेळी इन्फेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. 

यावर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय :  यांच्या उपचारांमधील औषधे 2 प्रकारची आहेत. फॅगिस्टॅटिक जी फंगसची वाढ व पसरण्याची प्रक्रिया तिथेच थांबवतात व फंगिसायडल, जी फंगसचा नाश करतात. ही औषधे गोळ्या, मलम, इंजेक्शन व स्त्रियांमध्ये लघवीच्या जागी वापरण्याची गोळी (पेसरीज) च्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

क्लोट्रायमॅझोल, टरबिनाफिन, फ्लुकोनॅझोल, किटोकोनॅझोल, ललिकोनॅझोल, इट्राकोनॅझोल, ग्रिसोफलवीन इत्यादीही काही औषधे जी उपचारासाठी वापरली जातात. लहान मुलांची व वृद्धांची पचन संस्था बघता ही औषधे त्यांच्या वजनानुसार दिली जातात. गरोदर स्त्रियांमध्ये जरी औषधे देणे वर्ज्य असले तरी इन्फेक्शन जास्त पसरले असेल आणि उपचाराची  गरज असेल तर औषधे दिली जातात.

सहसा या औषधांची अ‍ॅलर्जी/दुष्परिणाम होत नाहीत; मात्र उपचार अर्धवट सोडल्याने ड्रग रेझिस्टंस होऊ शकतो. हे तेव्हा होते जेव्हा दिलेली औषधे नियमितपणे घेतली जात नाहीत किंवा आजार लगेच बरा होत नाही म्हणून ती मध्येच बंद केली जातात! मुळात पेशंट त्वचारोगतज्ज्ञाकडे यायच्या आधी बरेच उपचार करून येतो. उदा : घरगुती उपाय, शेजारच्यांनी सांगितलेले औषध, मेडिकलवाल्याने दिलेली ट्युब, आयुर्वेदिक व होमिओपॅथीची औषधे. या सगळ्यात बर्‍याचदा पेशंट स्टेरॉइड क्रिम्स वापरत असतात. आणि याने खाज पूर्ण जाते; पण आजाराचे काय? तो पसरतच जातो. तसेही गजकर्ण बरा व्हायला जास्त कालावधी जातो. त्यात चुकीचे औषध – उपचार केल्याने बरोबर ट्रीटमेंटचा प्रतिसाद यायला वेळ लागतो. या फंगल इन्फेक्शनमध्ये असलेले ओनॅकोमायकोसिस (नखाचे इन्फेक्शन) ला सर्वात जास्त कालावधी लागतो. हातांच्या नखांसाठी 5-6 महिने तर पायांच्या नखांसाठी 9-10 महिने लागतात.

या आजारावरचे प्रतिबंधात्मक उपाय एकदम सोपे आहेत. हा आजार होण्याची कारणे टाळली तरी तो वारंवार होणे कमी होऊ शकते. स्वच्छता ठेवणे, उन्हाळ्यामध्ये लूज कॉटनचे कपडे वापरणे, हात-पाय धुतल्यानंतर चांगले (बोटांमध्ये) कोरडे करणे, घामाने भिजलेले कपडे बदलणे, पावसाळ्यामध्ये आतले कपडे कोरडे करूनच वापरणे, स्टेरॉइडचा वापर बंद करणे, वेळेवर बरोबर उपचार घेणे व तो पूर्ण करणे ही सगळी काळजी घेतली तर हा त्रासाचा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

Back to top button