कडक उन्हापासून शरीराला जपा | पुढारी | पुढारी

कडक उन्हापासून शरीराला जपा | पुढारी

डॉ. सौ. शुभांगी पार्टे

कडक उन्हामुळे शरीराची लाहीलाही होतेच शिवाय मनही व्याकूळ झाल्यासारखे होते आणि हळूहळू शरीराला थकवा जाणवायला लागतो. अतिउन्हामुळे शरीराची काम करण्याची ताकदही कमी होते. म्हणून आयुर्वेदशास्त्रात याला आदान काळ असे म्हटले आहे. 

उन्हाळ्याच्या दिवसात सूर्याच्या प्रखर किरणांनी त्वचेचा दाह होऊ लागतो. 

 सतत घामाने हैराण होऊ लागतो.

 उन्हातून फिरल्याने डोके दुखू लागते. 

त्वचा काळवंडते. अशावेळी शरीराला उन्हाच्या तीव्रतेपासून होणार्‍या त्रासापासून दूर ठेवण्यासाठी पाण्याचे प्रमाण आहारात वाढवावे. फक्‍त पाणीच न पिता त्याऐवजी आवळा सरबत, कोकम सरबत, लिंबू सरबत, शहाळी घ्यावीत. त्यामुळे घामाद्वारे बाहेर पडून गेलेल्या क्षारांच्या कमतरतेमुळे मांसपेशींमधून क्रॅम्स येणे, थकवा येणे अशा गोष्टी होत नाहीत. 

आहारामध्ये जेवणाच्या दोन्ही वेळेस ताकाचा समावेश करावा किंवा नाचणीची अंबीलही घेण्यास हरकत नाही. फळभाज्यांबरोबर आंबाडा, चाकवत यासारख्या पालेभाज्याही घ्याव्यात. 

 कलिंगड, काकडी, मोसंबी, संत्री, अननस यासारखे फळे खावीत.

 आहारामध्ये आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ, तळलेले पदार्थ वर्ज्य करावेत. कारण, अशा पदार्थांमुळे तहान खूप लागते आणि खूप पाणी पिल्याने पोट बिघडण्याची शक्यता असते. 

 गरम मसालेदार पदार्थ, वर्ज्य करावेत. 

  सुती आणि फिक्‍कट रंगाचे कपडे घालावेत. 

  उन्हातून बाहेर पडताना डोक्यावर स्कार्फ , टोपी घालावी. डोळ्यांसाठी गॉगल वापरावा. 

 फ्रिजमधील पदार्थ, पाणी वर्ज्य करावे. शिळे अन्‍न वर्ज्य करावे. 

 माठातील वाळा घातलेले पाणी प्यावे. त्यामुळे शरीराचा दाह आणि लाहीलाही कमी होते. 

  घरामध्ये शक्यतो वाळ्याचे पडदे वापरावेत. आजकाल बाजारात वाळ्यापासून बनविलेल्या टोप्याही मिळतात. त्याही वापरण्यास हरकत नाही. 

 रात्री झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यांना सिद्ध खोबरेल तेलाने मालिश करावे. दाह जास्त असल्यास काशाच्या वाटीने घासावे. 

  डोळ्यांचा दाह होत असल्यास डोळ्यांभोवती देखील व पापण्यांना तेलाने हलके मालिश करावे. 

  तसेच डोक्यालाही तेलाने मालिश करावे. म्हणजे दाह कमी होण्यास मदत मिळते. 

  नाकात सिद्ध तुपाचे किंवा घरच्या साजूक तुपाचे कोमट करून 2-2 थेंब सोडावेत. त्यामुळे डोळ्यांचा दाह, केसांच्या तक्रारी कमी होऊन मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. 

  रोजच्या रोज कपडे धुवून वापरावेत. 

 उन्हाळ्याच्या दिवसात येणार्‍या वेगवेगळ्या बकुळी, मोगरा, चाफा, गुलाब, जाई, जुई यासारख्या फु लांच्या माळा घालाव्यात किंवा घरातही अशी फु ले ठेवावीत, ज्यामुळे वातावरण शांत आणि फ्रेश वाटते. 

या दिवसांमध्ये येणार्‍या वसंत ऋतूमध्ये पंचकर्मांतर्गत वमन करून घ्यावे. जेणेकरून या ऋतूपूर्वीच्या थंडीच्या ऋतूमुळे शरीरात साठलेला कफ उन्हाच्या तीव्रतेमुळे वितळू लागतो आणि तेव्हाच हा वितळलेला कफ पंचकर्मांतर्गत वमनाद्वारे बाहेर काढून टाकला, तर शरीरात कफ साठून कालांतराने होणारे जीर्ण सर्दी, सायनोसायटीस, अस्थमा, नाकातील हाड/मांस वाढणे यासारखे विकार होण्यापासून आपला बचाव होतो. 

अशाप्रकारे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही काळजी घेतली, तर नक्‍कीच उन्हाळा सुसह्य होण्यास मदत मिळेल.

 

Back to top button