क्रांतिकारक शोध,परम संगणक | पुढारी | पुढारी

क्रांतिकारक शोध,परम संगणक | पुढारी

परम संगणक किंवा महासंगणक घरात किंवा कार्यालयात वापरल्या जाणार्‍या संगणकाहून भिन्न असतो. काही विशिष्ट कार्यासाठी अतिशय वेगवान संगणक असणे गरजेचे असते. महासंगणकाचा वापर क्वांटम मेकॅनिक्स, खगोलशास्त्र, हवामान संशोधन, खनिज तेल व वायू उत्खनन, संरक्षण, अणुऊर्जा, पदार्थाच्या रासायनिक संरचनेचा शोध आदी क्षेत्रांमध्ये होतो. 1960 साली महासंगणकाच्या निर्मितीला चालना मिळाली. कंट्रोल डाटा कॉर्पोरेशनने अनेक संगणक जोडून पहिल्या महासंगणकाची निर्मिती केली. प्राथमिक अवस्थेत असल्याने या संगणकाची प्रोसेसिंग क्षमता जास्त नव्हती. मात्र तंत्रज्ञानाचा जसजसा विकास होत गेला, तसतसा महासंगणकाचा वेग वाढत गेला. अमेरिका, जपान, चीन व भारत या देशांत महासंगणकांच्या निर्मितीला वेग मिळत गेला.

जगात आज 500 हून अधिक महासंगणक असून एकट्या अमेरिकेत 280 महासंगणक आहेत. यातील सर्वात वेगवान संगणक चीनमधील वुक्सी येथे असून सनवे तेहुलाईट नावाच्या या संगणकाचा वेग 93.01 पेटाफ्लॉप्स आहे. भारतातही नुकताच प्रत्युष नावाचा महासंगणक नॉयडा व पुणे येथे कार्यान्वित झाला असून त्याचा वेग अनुक्रमे 2.8 पेटाफ्लॉप्स व 4 पेटाफ्लॉप्स आहे.

संबंधित बातम्या
Back to top button