वाघ आणि सागुती | पुढारी | पुढारी

वाघ आणि सागुती | पुढारी

एकदा दोन भाऊ व्यापार करण्यासाठी तिबेटला निघाले होते. मोठा भाऊ लोचा अंगापिंडाने मजबूत होता; पण निर्बुद्ध होता. तर माचा अंगाने किरकोळ असला तरी बुद्धिमान होता. दिवसभर अनेक मैल प्रवास केल्यानंतर संध्याकाळी त्यांनी विश्रांती घ्यायचे ठरवले. माचाने लोचाला पाणी आणण्यासाठी पाठवले. लोचा जंगलात पाण्याचा झरा शोधत होता, एवढ्यात त्याला एक वाघ मेलेल्या हरणावर ताव मारताना दिसला. त्याने एक दगड वाघाच्या दिशेने फेकला. त्यामुळे वाघ घाबरून पळून गेला. पोटात कावळे ओरडत असल्याने वाघाने अर्धवट खाल्‍लेल्या हरणाला लोचाने उचलले व तो विश्रांतीस्थळी पोहोचला. माचाने हरणाचे मांस एका भांड्यात शिजवत ठेवले. शिजत असलेल्या सागुतीच्या वासाने पळून गेलेला वाघ त्यांच्या विश्रांतीस्थळी घुटमळू लागला. त्या वाघाला पाहताच लोचा उत्साहित होत म्हणाला, “हेच तेे जंगली मांजर ज्याबद्दल मी तुला सांगत होतो.” यावर माचा रागाने म्हणाला.

“हे जंगली मांजर नाही मूर्खा!, हा वाघ आहे. आता हा आपल्या दोघांना खाणार!” माचाचे वाक्य पूर्ण होण्याच्या आत वाघाने माचावर झडप टाकली. माचा कसाबसा प्रतिकार करू लागला. तेवढ्यात लोचा ओरडला, “वाघाशी तू हवा तेवढा वेळ कुस्ती खेळ; पण, भांड्याला धक्‍का लागून सागुती सांडणार नाही याची काळजी घे.”

‘लोचाला माझ्या जीवापेक्षा सागुतीची जास्त काळजी आहे तर!’ माचा मनाशीच म्हणाला. त्याने मुद्दामहून सागुतीचे भांडे उलथून टाकले. वाघामुळे सागुती वाया गेली असे समजून लोचा अतिशय रागावला. त्याने वाघाच्या शेपटीला धरून गरगर फिरवले. वाघाची शेपटी तुटली. जीव वाचवण्यासाठी वाघ जंगलात पळून गेला. लोचा मात्र जमिनीवर सांडलेल्या सागुतीकडे पाहत दु:ख करत बसला.

संबंधित बातम्या

Back to top button