सिंहीण व शहामृग | पुढारी | पुढारी

सिंहीण व शहामृग | पुढारी

फार-फार वर्षांपूर्वी शहामृग सिंहाप्रमाणे गर्जना फोडू शकत होते. सिंहिणीला या गोष्टीचा फार राग यायचा. एके दिवशी शहामृग व सिंहिणीची भेट झाली.“माझ्यासारखी गर्जना फोडण्याची तुझी हिंमत आहे का? माझ्याएवढी ताकद तुझ्यात नक्‍कीच नाही!” सिंहीण शहामृगाला खिजवत म्हणाली. 

शहामृगाने लगेच एक जोरदार गर्जना केली. सिंहिणीनेही त्यापेक्षा मोठ्या आवाजात गर्जना करण्याचा प्रयत्न केला; पण दोघांचाही आवाज समान ताकदीचा होता. सिंहिणीनेही ते मान्य केले. तरीही थोडा वेळ विचार करून ती म्हणाली, “माझ्याप्रमाणे शिकार तू नक्‍की करू शकत नाहीस!” 

सिंहीण व शहामृगामध्ये शिकार करण्याची स्पर्धा लागली. परंतु, सिंहिणीने एका हरणाची शिकार करेपर्यंत शहामृगाने धारदार नख्यांद्वारे अनेक हरणांना ठार मारले. यामुळे सिंहिणीच्या मत्सरात अधिकच भर पडली. पण तिने हार मानली नाही. हरणाचे मांस खाण्याची स्पर्धा घेण्याचे आव्हान तिने शहामृगाला दिले. शहामृगाला मात्र ही स्पर्धा मान्य नव्हती. तो म्हणाला,“मी मांस खात नाही. मी केवळ रक्‍त पितो.” त्यामुळे स्पर्धाच रद्द झाली. भोजन करून सिंहीण व शहामृग दोघेही विश्रांती घ्यायला गेले. सिंहिणीची पिल्‍ले शहामृगाच्या आजूबाजूला खेळत होती. शहामृग तोंड उघडे टाकून झोपला होता. पिल्‍लांनी पाहिले, की शहामृगाच्या तोंडात दातच नाहीत. त्यांनी ही गोष्ट जाऊन आईला सांगितली.

संबंधित बातम्या

“आई, शहामृग तुझ्याशी कशी बरोबरी करतो? त्याच्या तोंडात दातच नाहीत.” पिल्‍लांनी सिंहिणीला सांगितले. सिंहिणीने लगेच जाऊन शहामृगाला याबाबत विचारले. शहामृग शरमिंदा झाला व तेथून पळून गेला. आजही जेव्हा शहामृग एखाद्या सिंह किंवा सिंहिणीला पाहतो, तेव्हा तो शरमेने त्याचे तोंडजमिनीत खुपसतो.

Back to top button