सिव्हेट कॅट | पुढारी | पुढारी

सिव्हेट कॅट | पुढारी

सिव्हेट कॅट असे नाव असले तरी सिव्हेट हे मार्जार वर्गात मोडत नाही. मुंगसाच्या वंशातील या प्राण्याच्या सुमारे 20 प्रजाती अस्तित्वात आहेत. आफ्रिकेतील सहारा वाळवंट, मादागास्कर बेट, युरोप, चीन, आशिया व दक्षिणपूर्व आशियात हा प्राणी आढळतो. या प्राण्याचे वैशिष्ट्य म्हणजे गर्द वर्षावने, गवताळ प्रदेश व डोंगराळ भाग या सर्वच ठिकाणी हा प्राणी निवास करू शकतो. याचे आयुष्य सुमारे 15 ते 20 वर्षांचे असते. शरीराची लांबी 16 ते 34 इंच असते व वजन सुमारे 11 किलो असते. याचे शरीर लांबलचक असते, तर पाय छोटे असतात. नाकाड एखाद्या कोल्ह्याप्रमाणे लांब व टोकदार असते. कान छोटे असतात. शरीराचा रंग कबरा व करडा असतो. शरीरभर काळे पट्टे असतात. सिव्हेट प्राणी कॉफी उत्पादकांसाठी फार मोलाचा आहे. याचे कारण हा प्राणी कॉफी वृक्षाची फळे खातो. ही फळे खाल्यानंतर त्याच्या विष्ठेतून जेव्हा कॉफीच्या बिया बाहेर पडतात, तेव्हा या बियांना एक विशिष्ट चव व गंध प्राप्त झालेला असतो. या बियांपासून बनलेली सिव्हेट कॉफी अतिशय महाग असते. याशिवाय सिव्हेटच्या ग्रंथीमधून पाझरणार्‍या  स्रावाचा वापर सुगंधी द्रव्ये बनवण्यासाठी केला जातो.

Back to top button