‘गंधर्वांचे देणे – पं. कुमारजींनीशी संवाद’ : अभिजात ऐवज वाचकांच्या भेटीला | पुढारी

'गंधर्वांचे देणे - पं. कुमारजींनीशी संवाद' : अभिजात ऐवज वाचकांच्या भेटीला

प्रज्ञावंत गायक पं.कुमार गंधर्व यांचा भाषा, साहित्य व संगीताचा गाढा अभ्यास होता. शिवाय नृत्य, चित्रकला, शिल्पकला व वास्तुकला ह्या कलांविषयी सखोल चिंतन होतं. विचारांचा विशाल कॅनव्हास असलेल्या कुमारजींना इतिहासाची जाण व वर्तमानाचे चोख भान होते. ते भविष्याचा वेधही घेऊ शकत होते.  त्यामुळे सर्व क्षेत्रांतील लोक त्यांचे विचार ऐकण्यासाठी उत्सुक असत. हे जाणणाऱ्या ‘ग्रंथाली’ने १९८५ साली त्यांची सलग सहा दिवस मुलाखतमैफल आयोजित केली होती. त्यात त्यांनी स्वर-लय-ताल, रागसंगीत व त्यातील प्रकार, लोकसंगीताचा पैस, त्यांनी ऐकलेले, पाहिलेले गाणे व त्यांचे गाणे यांवर सविस्तर मांडणी केली होती. असा अभिजात ऐवज आता पुस्तकरूपात उपलब्ध होत आहे. त्यावेळचे कुमारजींचे गायन अनुभवता यावे यासाठी चौपन्न क्यूआर कोड पुस्तकात दिले आहेत. अतुल देऊळगावकर यांनी संपादन केलेल्या गंधर्वांचे देणे- पं. कुमारजींनीशी संवाद’ ह्या पुस्तकास प्रतिभावंत तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांची प्रस्तावना लाभली आहे. ४ एप्रिल २०२४ रोजी प्रकाशित झालेल्या ह्या पुस्तकामधील काही अंश.

निर्मिती ऋतुसंगीताची

ऋतुसंगीताबद्दल सांगतो. जीवन आणि संगीत हे कसं निगडित आहे, हे समजावून सांगावं. जीवन म्हणजे काय, याची व्याख्या काय करणार? जीवन आपल्याला माहीत आहे. कुठं कुठं संगीत आहे? काय काय येतं जीवनामध्ये? किंवा काय येत नाही? तर जीवनामध्ये सर्व काही येतं आणि सर्व ठिकाणी संगीतही येतं. असं करायचं ठरवल्यावर ऋतू आलेच. ते कुठे वेगळे आहेत? ऋतू आपलेच आहेत, सण आपले, दिवसही आपलेच. जीवन म्हटल्यावर सर्वच आलं ना. नुसतं रागसंगीत थोडंच आहे? असं नाहीये. जीवन फार मोठं आहे आणि त्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ऋतूंच्या नावानं कसं कसं जीवनामध्ये गाणं फिरतंय? त्याची रूपं कशी आहेत? कारण रागसंगीताचं ध्येय फार वेगळं आहे. रागसंगीतात सारंच आहे. जीवन म्हटलं की सगळंच आलं. ते इथंच संपत नाही. त्याला सर्वच पाहिजे. म्हणजे असं म्हणायचं का, आपल्याला फक्त कमळच पाहिजे? इतकं मोठं फूल मिळाल्यानंतर, मोगरा नको का? असं नसतं. सर्वच पाहिजे. सर्वच छान आहे. त्या त्या ठिकाणी सर्वच चांगलं आहे. मग त्याला सूत्रबद्ध केलं पाहिजे. आपल्याला ते ऐकवता आलं तर मजा आहे. आपण संगीताला जीवनाच्या माध्यमातून बघावं, असं मला वाटलं. फार मौज आहे. जमलं तर ठीकच. ते फार कठीण आहे. त्या एका लाइनमध्ये सर्वांना आणून उभं करून दाखवायचं म्हणजे सोपं नाही. पण म्हटलं, जमेल आपल्याला. जे नसेल ते करून टाकू. बारा महिने, सहाही ऋतू हे सर्व व्यक्त करायचं ठरवलं.

आधी ‘गीतवर्षा’ केलं. वर्षा ऋतूचं गीत ऐकवावं म्हणून. त्यातले सणही कव्हर करावेत, जे काही आहे ते कव्हर करावं, रागही कव्हर करावे. असं करत करत मग वर्षा या प्रकारावर कुठल्या कुठल्या प्रकारची गाणी आहेत, काय काय वर्णनाची गाणी आहेत, याचा अभ्यास, शोध सुरू झाला. कसा कसा पाऊस पडतो? तो काय काय सांगतो? बारीक पडतो, एवढं म्हणून आपण गप्प बसतो. असं करता करता, आमच्या रागसंगीतातल्या वेगवेगळ्या वर्णनांच्या बंदिशी शोधल्या. मग ही बंदिश काय सांगते, ती काय सांगते, याचा अर्थ काय, असं केलं. मग ज्या वर्णनाची लोकगीतं मला पाहिजे होती, ती नव्हती. मग आपणच बंदिशी करू म्हटलं. तेही सोपं होतं. इच्छा झाली की माझी बंदिश होऊन जाते. ज्या नाहीत त्या मी केल्या हं. जबरदस्तीनं केल्या नाहीत. ज्या वर्णनाच्या बंदिश नव्हत्या, या स्पॉटवर बंदिश नाही, त्याच केल्या. तर जीवन समृद्ध करण्यासाठी, जीवनाचं माध्यम घेऊन संगीत समृद्ध करण्यासाठी, माझी ही सर्व धडपड आहे.

मला ऋतू व्यक्त करायचे होते म्हणून मी पूर्ण प्रोग्रॅम केले.

 ‘गीतवर्षा’ करताना कसं कसं करायचं, काय काय करायचं, हे ठरल्यानंतर मग बंदिशी पाहिजेत. नाहीतर मजा येत नाही. असं करत करत, पावसाळ्याच्या अगोदर अतिशय उकाडा सुरू होतो. याची चिन्हं दिसायला लागतात. आता काय करावं? काही वेळा हे सुचत नाही. काही वेळेला आपली हालत होते. कोणीही भेटला की मग तोच विषय असतो, ‘क्या यार बहोत गरमी है.’ जिथे जाल तिथे हेच. ‘कल से तो मुश्किल हो रहा है.’ पंख्याखाली नुसतं बसलं, तरी बरं वाटत नाही. आमचा तर प्रश्‍नच नाही. आणि हे सर्व चाललं होतं तेव्हा मी चुकून मुंबईलाच होतो.

तर ही मारव्यातली बंदिश आहे. मोठा विलंबित ख्याल आहे. आपल्याला नुसती चुणूक दाखवतो.

घाम परे रे बाऊ ना चाल्यो हे

तपरिया हे अत घणा रे ये भूमरी

थोडं थोडं ऐकवतो सारं. अजून जवळजवळ तेच चाललं आहे, पण आता पाऊस येण्याची लक्षणं जरा बरी दिसताहेत. आल्यानंतर ठीक आहे. पुढच्या गाण्यात ढग आल्यावरचं वर्णन आहे,

नयो नयो मेह जेठ संग निकरे

ताप उमस बहू लागे पिया रे

बाऊ न हाले जिया घबराये

तुम बिन मोहे शोक पिया रे

असं होता होता होता, आला एकदाचा तो पाऊस. वाट बघता बघता, आला.

मेघा को रितू आयो रे मिता

दल बादल बन आवन लागे

रूप सुहावै मन लुभायो रे

मेघा को रितू आयो रे मिता

जनगण को मन हे उछायो

धार झरावन लागे लुभायो री

ही दोन गाणी पुरेशी आहेत. ऋतूंची बंदिशीत कशी परिणती होते ते सांगण्यासाठी, ही उदाहरणं पुरेशी आहेत. आणखी एक ऐकवतो, हेमंतवरचं. पावसाळा संपलेला आहे. सर्व समृद्ध झालेलं आहे. आनंद झालेला आहे, अशी बंदिश ऐकवतो. एकदा काय झाली गंमत, ऋतूसुद्धा नेहमी व्यवस्थित येतात असं काही नाही. लहरीपणा असतो तिथंही. आपल्यातच लहरीपणा असतो, असं नाही. एखाद वर्षी तो व्यवस्थित बोंबलत बोंबलत येत असतो. म्हणजे सांगावं लागत नाही, जाणीव होते, मग तो विषयच होऊन जातो. असं एका वर्षी झालं. तर एका वर्षी गरमीच पडलेली. एवढा रिकामटेकडेपणा का? पाऊसच नाही. का बाबा असं झालं? काही माहीत नाही. ऋतू फुलून आला, त्याची नोंद आहे. तसंच तो फुलून आला नाही, नुसताच हात हलवत रिकामा आला, त्याचीही नोंद का असू नये? त्याची नोंद म्हणून तेही लिहिलं. त्याची ही बंदिश ऐकवतो आता. ऐकलेल्या पुन्हा कशाला ऐकायच्या?

(बहार)

ऐसो कैसो आयो रे रीता रे

तू असा कसा रिकामा हात हलवत आलास? काय मजा, गंमत दिसत नाही, तुझ्यात. तब्येत काहीतरी बिघडलेली दिसतेय.

ऐसो कैसो आयो रे रीता रे

अंबुवा पे मोर ना आयो

कर्यो ना गुंजारे भंवरा रे

तुझी कशावर, काही लक्षणं दिसत नाहीत? असं कसं काय झालंय कळत नाही. असा कसा आलास तू?

 ‘गंधर्वाचे देणे – पं. कुमारजींशी संवाद’, संपादन – अतुल देऊळगावकर, ग्रंथाली प्रकाशन

Back to top button