गरिबी-गुन्हेगारीची सांगड! | पुढारी

गरिबी-गुन्हेगारीची सांगड!

डॉ. प्रदीप पाटील (क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, सांगली)

गरिबी ही एकतर गुन्हे घडविते, नाहीतर क्रांती घडविते, असे अ‍ॅरिस्टॉटलने एका ठिकाणी म्हटलेले होते. पोटाची भूक भागली नाही, तर डोके फिरते आणि फिरलेले डोके पोट भरण्यासाठी हवे ते गुन्हे आणि नको ते गुन्हे करत सुटते!

संबंधित बातम्या 

गरिबी हाच गुन्हेगारीचा पाया

एवढेच नव्हे, तर जो गरीब असतो त्याच्यावर अत्याचार होण्याची शक्यता ही काही पटीने जास्त असते आणि गरिबी ही गुन्हेगारीची बळी ठरते! गरिबीचा परिणाम हा संपूर्ण आयुष्यावर प्रभाव टाकून जातो. मुख्यतः शिक्षण मिळत नाही. अशिक्षितपणा माथी मारला जातो आणि मग त्यातून जे अज्ञान उभे राहते, ते गुन्हेगारीकडे घेऊन जाते. त्यामुळे पुढे आयुष्यभर कौशल्ये स्वत:मध्ये निर्माण न झाल्यामुळे एकाच ठिकाणी कुठेतरी खितपत राहावे लागते. त्यातून मानसिक पातळीवर नैराश्य निर्माण होते, हताशपणा सतत सोबत करीत राहतो आणि आत्मविश्वासाचे तीन तेरा वाजतात. यातून मग एक तर आक्रमकपणा निर्माण होतो, नाहीतर हताशता घालवण्यासाठी व्यसनाच्या अधीन आणि आहारी जावे लागते.

आर्थिक असमानता

समाजातील आर्थिक असमानता जर टोकाची असेल, तर पावलोपावली गरिबीला स्वतःच्या ‘स्व’ला एकतर गहाण ठेवावे लागते, नाहीतर पराभूत होऊन गप्प बसावे लागते. ही मानसिकता गुन्हेगारीकडे सहजपणे घेऊन जाते. तीच गोष्ट म्हणजे जातीजातीत विभागलेली व्यवस्था असेल, तर बर्‍याच वेळा दुसर्‍या जातीकडून स्वजातीवर हल्ले केले जातात आणि गुन्हेगारीकडे वळण्यासाठी प्रवृत्त केले जाते. असे वारंवार घडू लागते तेव्हा एकटेपणा वाढत जातो. समाजापासून तुटलेपण येते आणि समाज विघातक किंवा अँटी सोशल प्रवृत्ती निर्माण होऊन गुन्हेगाराचे व्यक्तिमत्त्व घडते!

गुन्हेगारी सर्वव्यापी

जगात 55 टक्के लोक हे दारिद्य्ररेषेखाली राहतात. तेहतीस टक्के लोक हे गरिबीत राहतात. अकरा टक्के लोक हे मध्यमवर्गीय आहेत आणि एक टक्का हे अतिश्रीमंत वर्गातले आहेत. ही असमानता गिनी कोईफिशियंट या एककाने मोजली जाते. गरिबी, आरोग्यासाठी उपचार सुविधा न मिळणे आणि समाजातील अस्थिर गुन्हेगारी स्वरूपाचे वातावरण, या तिन्हींचा परिपाक म्हणून मानसिक दोष उद्भवतात आणि गुन्हेगारीकडे जाण्यासाठीचे सर्व दरवाजे खुले होतात. युनिसेफची आकडेवारी सांगते की, जवळपास एक दशलक्ष लहान मुले ही दारिद्य्ररेषेखाली राहतात. जगभरात सुमारे वीस हजार मुले रोज गरिबीमुळे मरतात. याचा अर्थ, गुन्हेगारीची मुळे ही सर्वव्यापी आहेत. शासन, प्रशासन, समाजाची मानसिकता, आर्थिक समानता आणि शिक्षण या सार्‍यांच्या एकत्रित प्रयत्नातून गरिबी कमी करता येते; पण हे धोरण भारतात तरी कुठेच दिसून येत नाही. गुन्हेगारी कमी न होण्यामागील हे महत्त्वाचे कारण आहे, एवढे लक्षात ठेवले तरी पुरे!

Back to top button