दोघांची दिल्लीत एका इव्हेंटच्या कार्यक्रमात ओळख झाली. तो मूळचा बिहारचा, तर ती उत्तराखंडची. दोघांना व्यायामाची आवड… तेथूनच त्यांनी अशा एका कामाची निवड केली की, तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ला तरी समोरच्या व्यक्तीला कोणाला काही सांगता येत नव्हते न् बोलता येत होते. त्याचाच फायदा घेत या दोघांनी अनेकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांची शिकार केली. त्यासाठी दोघे दिल्ली ते मुंबई असा विमानाने प्रवास करत होते. मात्र, सामाजिक सुरक्षा विभागाच्या निदर्शनास हा प्रकार आला अन् दोघांचे बिंग फुटले…
संबंधित बातम्या
डेटिंग अॅपद्वारे संपर्क साधून हनिट्रॅपद्वारे आंबटशौकिनांना लॉजवर बोलावून मारहाण करीत लुटणार्या बंटी-बबलीला गुन्हे शाखेच्या पथकाने तुर्भे (मुंबई) येथून बेड्या ठोकल्या. नितीश नवीन सिंग (वय 28, रा. मूळ बिहार, सध्या दिल्ली) आणि कविता उर्फ पूजा नवीनचंद्र भट (वय 28, रा. उत्तराखंड, दिल्ली) अशी दोघांची नावे आहेत. आतापर्यंत या दोघांनी पुण्यातील तिघांना आपल्या ट्रॅपमध्ये अडकवून लुटले आहे. त्यामध्ये काही व्यावसायिक आणि कर सल्लागारांचा समावेश आहे.
सीकिंग अॅडव्हेंचर या डेटिंग अॅपद्वारे संपर्क करून एका व्यावसायिकाला दोघांनी लुटल्याची घटना खराडी परिसरात घडली होती. याप्रकरणी पूजा नावाच्या महिलेसह तिच्याबरोबर असलेल्या साथीदाराविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याबाबत एका व्यावसायिक तरुणाने फिर्याद दिली होती. दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे हे दोघे आरोपी पुण्यातून मुंबईच्या दिशने निघाल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पथकाने दोघांना तुर्भे (मुंबई) येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या परिसरातून ताब्यात घेतले. खात्री झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
करेक्ट कार्यक्रम!
आरोपी कविता ऊर्फ पूजा ही डेटिंग अॅपद्वारे समोरच्या व्यक्तीसोबत संपर्क साधायची. त्यानंतर फोटो पाठवून समोरच्या व्यक्तीला घायाळ करायची. एकदा का तो जाळ्यात अडकला की, त्याला हॉटेलमध्ये खोली बुक करण्यास सांगत असे. भेटण्याचा दिवस ठरल्यानंतर ती तेथे जात होती. खोलीत तिने प्रवेश करताच, तिचा साथीदार नितीश तेथे यायचा. त्याने आत प्रवेश करताच दोघे समोरच्या व्यक्तीला बेदम चोप देत असत. त्यानंतर त्याला विविध प्रकारच्या धमक्या देऊन त्याच्याकडील रोकड, सोन्याचा ऐवज लंपास करीत होते.
…म्हणून तक्रार नाही
या दोघांनी अनेक आंबटशौकिनांना आपल्या जाळ्यात अडकवून लुटले आहे. प्रश्न डेटिंग अॅप, लॉज-हॉटेल आणि पुन्हा त्यात मारहाणीचा असल्यामुळे तक्रारदार शांत बसत होते. वाच्यता करायची म्हटले तर आपलीच अब्रू जाणार, या भीतीपोटी कोणी तक्रार करण्यास धजत नव्हते. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय या मंडळींकडे पर्याय नसे.
बंटी-बबलीने व्यावसायिक तरुणापासून सीए, अभियंत्यालाही सोडले नाही. खराडी येथे व्यावसायिक तरुणाला लुटल्यानंतर त्यांनी नर्हे येथील एका सीएला आपल्या जाळ्यात अडकवून लुटले. 38 हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने असा त्यांच्याकडील 90 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. विमाननगर परिसरातील एका अभियंत्याच्या घरी जाऊन या दोघांनी तब्बल चार लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेत त्याला मारहाण केली आहे. या 31 वर्षीय तरुणाचा परिचय कविता ऊर्फ पूजा भट हिच्यासोबत डेटिंग अॅपद्वारे झाला. पुढे टेलिग्रामद्वारे तिने तरुणाला संपर्क करून हॉटेलवर बोलावले. बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मोबाईलमधून ऑनलाईन चार लाख रुपये काढून घेतले.
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी यूपीआयद्वारे ऑनलाईन झालेल्या ट्रान्झेक्शनद्वारे बंटी -बबलीचा मोबाईल क्रमांक शोधून काढला. त्यानंतर दोघांचा पत्ता शोधला. त्या वेळी ते पुण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजले. मात्र, ते नेमके कोठे आहेत, हे समजत नव्हते. तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी ते दोघे तुर्भे (मुंबई) येथे असल्याचे शोधून काढले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांची मदत घेत एका पंचतारांकित हॉटेल परिसरातून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत सुरुवातीला दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.