आला उन्हाळा | तुमच्या चिमुकल्याचे गोवरपासून रक्षण कसे कराल? | पुढारी

आला उन्हाळा | तुमच्या चिमुकल्याचे गोवरपासून रक्षण कसे कराल?

डॉ. प्राजक्ता गायकवाड

भारतातून ब्रिटनपर्यंत गोवर या रोगाचा प्रादुर्भाव पसरल्याचे नुकतेच समोर आले आहे. गोवरचा संसर्ग संपूर्ण देशात दिसून येत असला तरी आजही बहुतेक ठिकाणी लोक यावर घरगुती उपचार करताना दिसतात.

वैद्यकीय परिभाषेत गोवरला स्मॉल पॉक्स किंवा चिकन पॉक्स म्हणतात. या रोगाची कारणे स्पष्टपणे वैज्ञानिक आहेत आणि त्याचे संक्रमण व्हायरल श्रेणीमध्ये येते. याला गांभीर्याने न घेतल्याने काहीवेळा जीवही जाऊ शकतो. मध्यंतरी, मध्य प्रदेशात गोवरमुळे दोन मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा विषाणू संसर्ग 17 हून अधिक लोकांमध्ये आढळून आला आहे. या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तेथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. गोवरची चिंता केवळ भारतातच नाही, तर युरोप आणि अमेरिकेतही पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबत इशारा देऊन सावध केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, 2022 मध्ये भारतातील अंदाजे 11 लाख मुलांना गोवर लसीचा पहिला डोस घेता आला नाही. यामुळे कोविडनंतरच्या काळात गोवरच्या लसीकरणात घट झालेल्या दहा देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला. सबब, गोवरचा प्रसार रोखण्यासाठी आणि भविष्यातील उद्रेक टाळण्यासाठी त्याची लक्षणे, योग्य काळजी आणि लसीकरणाबद्दल जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.

गोवरचे स्पष्ट दिसणारे लक्षण म्हणजे लाल डाग, पुरळ उठणे. सामान्यतः याची सुरुवात चेहर्‍यापासून होते आणि नंतर शरीराच्या इतर भागात हे पुरळ पसरत जातात. गोवर टाळण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. गोवर आणि रुबेला लस सामान्यतः दोन डोसमध्ये दिली जाते. पहिला डोस 12-15 महिन्यांच्या वयात दिला जातो, तर दुसरा डोस 4-6 वर्षांच्या वयात दिला जातो. गोवरकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर गुंतागुंत निर्माण होऊ शकते. याचा फुप्फुस आणि मेंदूवरही परिणाम होऊ शकतो. याखेरीज न्यूमोनिया, मेंदुज्वर, अंधत्वही येऊ शकते. 2021 मध्ये गोवरमुळे जगभरात अंदाजे 1,28,000 मृत्यू झाले असून, यामध्ये पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांची संख्या अधिक होती.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण युरोपमध्ये गोवरच्या रुग्णांमध्ये 30 पटीने वाढ झाली आहे. याचे कारण लसीकरणाचे घटते प्रमाण. याखेरीज कोविड-19 चा उद्रेक ओसरल्यानंतर अधिक संख्येने लोक परदेशात प्रवास करत आहेत. त्यामुळे सीमेपलीकडे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे. गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिल्यास, रशिया आणि कझाकिस्तानमध्ये गोवरची स्थिती बिकट बनली आहे.

एमएमआर लसीच्या पहिल्या डोसचे प्रमाण संपूर्ण युरोपमध्ये 2019 मध्ये 96 टक्के होते; ते 2022 मध्ये 93 टक्क्यांवर आले आहे. याच कालावधीत दुसर्‍या डोसचे प्रमाण 92 टक्क्यांवरून 91 टक्क्यांवर घसरले आहे. तथाकथित विकसित देशांत अशी स्थिती असेल तर इतर देशांतील परिस्थितीचा सहज अंदाज बांधता येतो. ही सर्व परिस्थिती पाहता एकूणच लसीकरण मोहिमेमध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे.

पालकांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या पाल्याचे लसीकरण चुकवता कामा नये. भारतात शासकीय आरोग्य विभागातर्फे मोफत स्वरूपात हे लसीकरण करण्यात येते; पण तरीही याबाबत जागरूकता दिसत नाही. पण, लक्षात घ्या, गोवर आजारामुळे केवळ पुरळ उठत नाहीत, तर त्या मुलाची प्रतिकारशक्ती कमी होते आणि पर्यायाने इतर आजाराने मृत्यू होण्याची शक्यता बळावते.

Back to top button